सोनालीला आजही आठवतात सावळेपणाचे टोमणे

Sonali Kulkarni

ज्या गोष्टी खरोखर समाजामध्ये घडत असतात त्याच गोष्टींचे प्रतिबिंब हे माध्यमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या मालिका, सिनेमा, नाटक यामध्ये पडत असते. सध्या ‘रंग माझा वेगळा’ ही मालिकादेखील अशीच सावळ्या रंगाच्या मुलींना कशा प्रकारे दुय्यम वागणूक दिली जाते यावर आधारित आहे. या मालिकेतील नायिकेप्रमाणे खऱ्याखुऱ्या आयुष्यातही अनेक मुलींना त्यांच्या सावळ्या रंगावरून बोलणी खावी लागतात तसेच त्यांना कमी दर्जाची वागणूक दिली जाते. खरं तर माणुसकीला धरून ही गोष्ट योग्य नाही; कारण माणसाच्या वर्णापेक्षा गुण आणि स्वभाव, त्याच्या क्षमता यांना व्यक्तिमत्त्वात महत्त्व येत असते. मात्र अजूनही समाजामध्ये सावळ्या रंगाच्या व्यक्तींकडे चुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते.

सर्वसामान्य मुलींना तर हा अनुभव येतोच; पण सेलिब्रिटी म्हणून जेव्हा आज यश मिळवलेल्या अभिनेत्री आहेत त्यापैकी सोनाली कुलकर्णी हिचा रंगही सावळा आहे. सोनालीला तिच्या सुरुवातीच्या काळात सावळ्या रंगावरून अनेकदा टोमणे खावे लागले आणि त्याची आठवण तिला आजही येते. मात्र तिने अभिनय कौशल्याने सिनेमा, नाटक इंडस्ट्रीमध्ये जे स्थान मिळवले त्याच्यापुढे तिचा सावळा रंग गौण ठरतो हे तिने दाखवून दिले आहे. नुकताच सोनाली कुलकर्णी हिने तिचा ४७ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिने सोशल मीडिया पेजवर अनेक अनुभवांना वाट मोकळी करून दिली. आणि यामध्ये तिने सावळ्या रंगावरून तिला सुरुवातीच्या काळामध्ये कसे वाईट अनुभव आले याविषयीदेखील शेअर केले आहे. सोनाली कुलकर्णीची आई तमिळ आहे तर वडील महाराष्ट्रीय. त्यामुळेच सोनालीचा वर्ण आईप्रमाणे सावळा आहे; मात्र याविषयी तिला कधीच काही वाटलं नव्हतं.

जेव्हा तिने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि तिला ऑडिशनला जावं लागायचं तेव्हा अनेकांकडून तिला सल्ला मिळायचा की, तुझी ऑडिशनमध्ये निवड होणार नाही; कारण तुझा रंग सावळा आहे. खरे तर सुरुवातीला याचा अर्थ तिला समजायचा नाही. ती नेहमी त्यांना असे म्हणायची की, सावळ्या रंगाचा आणि अभिनयाचा काय संबंध आहे? मात्र सिनेमा इंडस्ट्रीमध्ये गोऱ्या रंगाच्या मुली हाच सौंदर्याचा मापदंड अशी चुकीची समजूत होती. सोनालीला जेव्हा या गोष्टीचा अर्थ कळाला तेव्हा तिने स्वतःपासूनच यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. मराठी नाटक-सिनेमा इंडस्ट्रीमध्ये ज्या मोजकं आणि नेटकं काम करत असलेल्या अभिनेत्री आहेत त्यांच्यामध्ये सोनाली कुलकर्णीचे नाव आवर्जून घेतले जाते. सत्यदेव दुबे यांच्या एका नाट्य कार्यशाळेला शालेय वयात सोनाली गेली आणि तिला तेव्हापासूनच नाटकाची गोडी लागली. त्यानंतर एकांकिका , हौशी रंगभूमी यामध्ये ती काम करत राहिली.

सोनालीचा भाऊ संदेश कुलकर्णी हादेखील नाट्य अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. या दोघांनी मिळून नाट्य गट नावाची एक संस्थादेखील स्थापन केली आणि त्या व्यासपीठावरून सोनाली सतत नाट्यप्रयोगांमध्ये कार्यरत होती. ‘चेलुवी’ या कन्नड सिनेमापासून सोनालीने अभिनयाची सुरुवात केली. आजपर्यंत सोनालीने अनेक मराठी नाटक, सिनेमा, मालिका यामध्ये काम केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतही सोनालीने अभिनयाने बोलबाला कायम ठेवला आहे. अभिनय कौशल्याने तिने तिचे स्थान मिळवले असतानाच तिला एकेकाळी सावळ्या रंगावरूनच नकार पचवावे लागले आहेत हे सत्य तिनं समोर आणलं. पुण्याची असलेली सोनाली फर्ग्युसन कॉलेजची विद्यार्थिनी असून तिने राज्यशास्त्रात पदवी संपादन केली आहे. तिने संपूर्ण करिअर हे अभिनयामध्येच केले आहे.

नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत तिचे लग्न झाले होते; पण हे नाते फार काळ टिकू शकले नाही. आणि त्यानंतर नचिकेत पंतवैद्य यांच्यासोबत तिने दुसरा विवाह केला आहे. आता ते वैयक्तिक जीवनातदेखील खूप खूश आहेत. आज यशाच्या शिखरावर असताना तिला मात्र तिच्या उमेदवारीच्या काळात तिच्या सावळ्या रंगावरून मारलेले टोमणे आठवले की, माणसाची विचार करण्याची शक्ती किती खुजी आहे हे ती आवर्जून सांगते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER