‘ताराराणी’साठी सोनाली सज्ज

Sonali Kulkarni ready for Tararani

प्रत्येक कलाकाराला आयुष्यात अशी एक भूमिका करण्याची जबरदस्त इच्छा असते जी भूमिका केवळ भूमिका नसते तर ती व्यक्ती इतिहासात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून होऊन गेलेली असते. अशा भूमिका करण्यासाठी एक कलाकार म्हणून किंवा एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून आपले सर्वस्व पणाला लावावे लागत असते. फक्त मनोरंजन हा एकमेव उद्देश अशा भूमिकांमध्ये नसतो तर एक जबाबदारीदेखील येत असते. आजपर्यंत अनेक अभिनेते आणि अभिनेत्री यांनी इतिहासातील शूरवीरांच्या भूमिका साकारत त्यांचे कार्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. याच पंक्तीत आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सामील झाली आहे. छत्रपती ताराराणी साकारण्यासाठी सोनाली सज्ज झाली आहे . ‘छत्रपती ताराराणी’ या सिनेमात मी लवकरच ताराराणीच्या भूमिकेत दिसणार, असे तिने सोशल मीडिया पेजवर जाहीर करताच तिला मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अर्थात आनंद तर आहेच; पण जबाबदारीची जाणीवही आहे, असं म्हणत सोनाली ताराराणी साकारण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर ताराराणी यांनी मराठा साम्राज्याची धुरा समर्थपणे सांभाळली. छत्रपती ताराराणी यांचा वाटा फार मोठा होता. छत्रपती राजाराम यांच्या पत्नी ताराराणी भोसले ही तर त्यांची ओळख होतीच; शिवाजी महाराजांची नातसून म्हणून, संभाजीराजे यांची सून म्हणून छत्रपती ताराराणी यांनी शौर्याने मोगलांशी दोन हात केले. इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती ताराराणी यांच्या शौर्यावर लिहिलेल्या ग्रंथाचा संदर्भ घेऊन या सिनेमाची पटकथा तयार करण्यात आली आहे. आजपर्यंत इतिहासपट खूप आले; पण ताराराणी यांचा इतिहास चित्रित माध्यमांमध्ये कमी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ताराराणी यांचा आयुष्यपट कसा होता, त्यांनी कशा पद्धतीने भोसले घराण्याच्या शौर्याचा वारसा जपला हे या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

सोनाली कुलकर्णी हिची छत्रपती ताराराणीच्या भूमिकेसाठी वर्णी लागली आहे. यापूर्वी सोनालीने ‘हिरकणी’ या ऐतिहासिक सिनेमात काम केलं होतं. या नव्या सिनेमात ती थेट छत्रपती ताराराणी यांची भूमिका साकारणार असल्याने तिला या रूपात पाहणं ही तिच्या चाहत्यांसाठी एक खास ट्रीट असणार आहे. सोनाली सांगते, छत्रपती ताराराणी यांची भूमिका करायला मिळणे ही केवळ एक संधी नव्हे तर माझ्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे. ताराराणी यांचा इतिहास समोर आला पाहिजे. मुद्रित लेखनातून तो आतापर्यंत आलेला आहे; पण आजपर्यंत चित्रित माध्यमात फारसे काही दाखवण्यात आले नाही. या सिनेमासाठी माझी निवड झाली हे जेव्हा मला कळले तेव्हा पहिल्या क्षणी खूप आनंद झाला; पण दुसऱ्याच क्षणी मी खूप जबाबदारीचे काम करणार आहे याची जाणीव झाली. ताराराणी या शूर महिला होत्या. तो करारीपणा, तो घरंदाजपणा, शत्रूशी लढताना असलेला कणखरपणा हे सगळे मला साकारायचे आहे. मी आतापर्यंत केलेल्या भूमिका आणि ताराराणी यांची भूमिका यात निश्चितच खूप फरक आहे. यासाठी मी स्वतःला अभिनेत्री म्हणून कुठेही कमी पडू देणार नाही हे मी स्वतःला वचन दिलं आणि मगच या सिनेमाच्या प्रक्रियेत सहभागी झाले.

या सिनेमासाठी ताराराणीची भूमिका साकारण्यासाठी ज्या काही गोष्टी शिकाव्या लागणार आहेत त्या शिकण्यासाठी सध्या सोनाली मेहनत करत आहे. ‘नटरंग’ या सिनेमातील ‘अप्सरा आली…’ या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली सोनाली कुलकर्णी त्यानंतरही अशा टिपिकल नायिकेच्या भूमिकेत अडकली होती. तिने साकारलेल्या ‘अजिंठा’ सिनेमातील भूमिकेने तिच्या भोवती असलेल्या प्रतिमेचं कडं भेदलं. ‘धुरळा’ या सिनेमातही तिची वेगळी भूमिका दिसून आली. ‘पोस्टर गर्ल’ या वेगळ्या धाटणीच्या सिनेमात सोनालीने तिची हटके भूमिका समर्थपणे पेलली. गेल्या काही दिवसांपासून सोनाली चर्चेत होती ती लंडनस्थित उद्योगपतीशी लग्न ठरल्यामुळे. सोनाली आता लग्न कधी करणार ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही अभिनयामध्ये आपला ठसा उमटविणाऱ्या सोनालीने मध्यंतरी अनेक नृत्य आधारित रियालिटी शो तसेच कॉमेडी शोची परीक्षक म्हणूनही छाप पाडली. फक्त ती छानछौकी भूमिकाच करत नाही तर अजिंठा, हिरकणी यासारख्या सिनेमात दमदार भूमिका करू शकते हे तर सोनालीने दाखवून दिलेच आहे. तर आता छत्रपती ताराराणी यांच्यावर आधारित सिनेमात सोनाली ताराराणीच्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी अभिनेत्री म्हणून तिचं सगळं कसब पणाला लावण्यासाठी तयार झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER