सोनाली विचारतेय ” आज काय स्पेशल,”

Sonali Khare

लॉकडाउन काळातील सगळ्या सेलिब्रिटीचे सोशल मीडिया पेज जर आपण पाहिले तर प्रत्येकानेच त्यांच्या घरातल्या स्वयंपाकघराची सफर आपल्याला घडवली आहे. यामध्ये अभिनेत्री सोनाली खरे हीदेखील मागे नव्हती. तिच्या लॉक डाऊन काळात तिने वेगवेगळे पदार्थ करत पाक कलेची पावती दिली. तिची मुलगी सनायाने केलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे व्हिडिओ देखील सोनाली शेअर करत होती. काळातल्या या लॉकडाउनमध्ये पाककलेतून प्रेरणा घेऊनच सोनाली लॉकडाऊन नंतर पाककलेत निपुण असलेल्यांना “आज काय स्पेशल” असे विचारत प्रेक्षकांना खवय्येगिरीचा आस्वाद देत आहे .

एक तरी शो पाककलेचा असावा असा नियम नसला तरी प्रत्येक वाहिनी खवय्या असलेल्या प्रेक्षकांसाठी अशा पद्धतीचा कार्यक्रम दाखवत असते. आजपर्यंत अशा अनेक चॅनेलवर विविध रेसिपी शो आयोजित केले जातात. आणि विशेष म्हणजे या प्रत्येक रेसिपी शोला प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील तुफान मिळत असतो. असाच शो घेऊन अभिनेत्री सोनाली खरे (Actress Sonali Khare) बऱ्याच दिवसांनी छोट्या पडद्यावर दाखल झाली आहे. मुळात सोनाली हिला वेगवेगळे पदार्थ करण्याची, खाऊ घालण्याची आणि स्वतःही खाण्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळेच ती सांगते की, आपल्याला जे काम आवडतं तेच करायला आपल्याला मजा येते आणि मला देखील असेच स्वयंपाक घरात वेगवेगळे प्रयोग करायला खूप आवडतं. मी खूप वेगवेगळ्या रेसिपीज करून पाहिल्या. माझ्या मुलीला देखील असे वेगवेगळे पदार्थ करण्याची आवड असल्याने आम्ही दोघींनी लॉकडाउनमध्ये पदार्थ, रेसिपीज केल्या. आता मात्र, आज काय स्पेशल या रेसिपी शोची निवेदिका म्हणून पाककलेत पारंगत असलेले शेफ, सुगरणी आणि घराघरातील प्रेक्षक यांची गाठभेट घालून देण्याची ही संधी मला मिळाली. मला हे काम खूप मनापासून आवडले आहे.सोनाली देखील पट्टीची खवय्यी असून तिला सगळे पदार्थ खूप आवडतात. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आपण फिरायला जातो त्याच्या प्रांतातले स्थानिक पदार्थ खाल्ल्याशिवाय सोनाली कधीच तिच्या भटकंतीचा परतीचा प्रवास करत नाही. मुंबईची मुलगी असल्याने ती टपरीवरच्या चटपतीट पदार्थांपासून ते कौशल्याने करण्याच्या पदार्थांपर्यंत खूप शौकीन आहे .

सोनाली सांगते, घरात एखादा पदार्थ करणे आणि एखाद्या रेसिपी शोची निवेदिका म्हणून कॅमेऱ्यासमोर उभं राहणं खरच खूप फरक आहे. कारण अशा शो मध्ये लोकांचे लक्ष या पदार्थावर असतं तितकं हा कार्यक्रम कंटाळवाणा होणार नाही यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद सुरू ठेवायचा असतो. जे पदार्थ या कार्यक्रमात दाखवले जात आहेत त्या पदार्थाच्या अनुषंगाने प्रेक्षकांना काही माहिती देणं, काही अनुभव शेअर करणे अशा पद्धतीने हा कार्यक्रम होस्ट करावा लागतो. निवेदनच्या बाबतीत म्हणाल तर मी पहिल्यांदाच अशा प्रकारचं काम करत असल्यामुळे सुरुवातीला एक दडपण होतं . पण मी स्वतः प्रेक्षक म्हणून आमच्या कार्यक्रमात तयार होणारा पदार्थ अनुभवताना मला खूप छान वाटले.

अभिनेत्री सोनाली खरे ही गेल्या आठ वर्षापासून छोट्या पडद्यापासूनच नाही तर सिनेमापासूनही लांब होती. अर्थात तिची मुलगी लहान असल्यामुळे तिला कुटुंबासाठी वेळ द्यायचा होता म्हणून ती रुपेरी दुनियेपासून लांब राहिली हे जरी खरे असले तरी गेल्या काही दिवसांपासून ती एका चांगल्या संधीच्या शोधात होती आणि तिचं पुनरागमन हे एका रेसिपी शो च्या माध्यमातून होतय याचे तिलाही खूप कौतुक वाटते.

सोनालीचे, सावरखेड एक गाव या सिनेमा तून मराठीमध्ये पदार्पण झाले. त्यापूर्वी तिने तेरे लिये हा हिंदी सिनेमा केला होता. बऱ्याच वर्षांच्या विश्रांतीनंतर सोनाली हृदयांतर आणि चेकमेट या सिनेमात देखील दिसली. दहा वर्षापूर्वी बे दुणे ही मालिका सोनालीने केली होती. यामध्ये दोन घटस्फोटित व्यक्ती मुलांसह एकत्र येण्याचा विचार करतात या एका सामाजिक विषयावर ही मालिका बेतलेली होती. सुनील बर्वे आणि सोनाली खरे या दोघांचाही अभिनय या मालिकेमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता .मात्र या मालिकेनंतर सोनाली पूर्णपणे गृहिणी म्हणून कॅमेरामागे गेली. अभिनेता बिजय आनंद याच्याशी सोनालीने लग्न केलं. आता सोनालीने नव्याने पदार्पण करायचे ठरवल्यानंतर रेसिपी शोची निवेदिका म्हणून ती छोट्या पडद्यावर दिसत आहे. आणि चाहत्यांकडून देखील तिच्या या नव्या रूपाचं स्वागत होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER