सोनाक्षीने सुरु केले ‘फॉलन’ वेबसीरीजचे शूटिंग

Sonakshi Sinha - Fallen

सैफ अली, अभिषेक बच्चन, नवाजुद्दीन, सुष्मिता सेननंतर आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही (Sonakshi Sinha) वेब सीरीजमध्ये काम करण्यास होकार दिल्याचे आम्ही आमच्या वाचकांना सांगितलेच होते. ‘फॉलन’ नावाने तयार होत असलेल्या या वेब सीरीजचे सोनाक्षीने कालपासून शूटिंग सुरु केले. प्रख्यात दिग्दर्शिका रीमा कागती या वेब सीरीजचे दिग्दर्शन करीत आहे. खरे तर सोनाक्षीने कोरोना (Corona) लॉकडाऊन (Lockdown) सुरु होण्यापूर्वीच ही वेबसीरीज साईन केली होती. सप्टेंबरमध्ये या वेब सीरीजचे प्रसारण करण्याची योजना होती. परंतु लॉकडाऊनमुळे याचे शूटिंग होऊ शकले नव्हते.

सोनाक्षी सिन्हाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फॉलनच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाचे फोटो शेअर केले आहेत. “फॉलन”मध्ये सोनाक्षीसोबत गुलशन देवय्या, विजय वर्मा आणि सोहन शाह यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. शूटिंगसाठी दक्षिण मुंबईत एक सेट तयार करण्यात आलेला आहे. या सेटची माहिती देत सोनाक्षीने पोस्टमध्ये म्हटले आहे, “अॅमेझॉन प्राइम व्हीडियोसाठी (Amazon Prime Video) तयार होत असलेल्या वेबसीरीजचे मी आजपासून शूटिंग सुरु केले. लॉकडाऊननंतर शूटिंगचा माझा हा पहिलाच दिवस आहे. या पहिल्या दिवसाबाबत माझ्या मनात काय भावना आहेत त्या मी व्यक्तच करू शकत नाही. यासोबतच सोनाक्षीने आणखी एक पोस्ट टाकली असून तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधील एक व्हीडियो पोस्ट केला आहे. यात तिच्यासोबत यूनिटचे लोक दिसत आहे. त्यांनी मास्क आणि ग्लोव्हज घातलेले दिसत आहे. यासोबत सोनाक्षीने लिहिले आहे, “माझ्या देवा, मी पुन्हा सेटवर परत आले आहे.”

या वेबसीरीजचे पहिले शूटिंग शेड्यूल मार्च महिन्यात राजस्थानमध्ये पार पडले होेते. सोनाक्षी यात पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारीत आहे. राजस्थानमधील शूटिंगदरम्यानचे बुलेटवरील इन्स्पेक्टरच्या वेषातील सोनाक्षीचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER