कधीतरी असेही होते !

Sometimes it happens

सकाळचीच गोष्ट ! सायलीच्या लक्षात आलं कालपासूनच आपली चिडचिड होते आहे. स्वयंपाकाच्या मावशी दोन दिवसापासून आल्या नव्हत्या .आजही टिफिनची वेळ झाली तरी त्यांचा किंवा त्यांच्या साध्या फोनचा पण पत्ता नव्हता.” गेल्या दोन-तीन दिवसापासून मीच आपली फोन करुन विचारते येतात की नाही ते आणि मग कामे अाटपून टाकते “सायलीच्या मनात आलं . हळूहळू करत कामे भरपूर लांबली नेहमीच्या वेळेचे बजेटच बिघडले. तसंच काहीसं कालपासूनच होतं आहे. काल ऑफिस मधून घरी यायला जरा उशीरच झाला . तसं काम आटपली असती तरीही ठीक होतं, परंतु एका क्लायंट बरोबर मीटिंग ठरली होती आणि नंतर ती कॅन्सल झाली. आपण मीटिंगसाठी केलेली प्रॉपर तयारी आणि त्यासाठी घालवलेला वेळही वाया गेला. असं बरेचदा होते की लोकांना समोरच्या माणसाच्या वेळेची देखील किंमत नसते. स्वतःतर वेळेवर, हिशोबाने ,शिस्तीत चालायचंच नसतं .पण त्यांना दुसऱ्यांचे ही असे काही प्रोग्राम असू शकतात याची देखील त्यांना जाणीव नसते. हे मात्र सायलीला मुळीच आवडत नसे.

थोडी काम आटोपून सायली फेसबुक बघत बसली होती. तिला जाणवलं की तिची चिडचिड अजूनही होतेच आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी दोघांनीही व्हॅक्सिनेशन घेतलं होतं .सायलीला काही त्रास झाला नव्हता, पण सुमितला मात्र टेंपरेचर आलेलो होत .आता नॉर्मलला आहे, पण थोडी सर्दी आणि बॉडी पेन आहेच. एखादा दिवस सुट्टी टाकून आराम कर म्हटलं तर ऐकलं नाही त्याने. गेलाच ऑफिसला ! ती विचार करीत होती .तेवढ्यात काल नाश्ता पोचवला होता त्या मैत्रिणीचा फोन आला थँक्स म्हणून ! अगं मैत्रिणीला कुठला आलाय thanks ! हक्काने सांगायला हवं. असं म्हणाली ती !ती १४ दिवस घरीच quarantine होती. थोड्यावेळ गप्पांनी छान ही वाटलं. पण अजून दोन चार मैत्रिणी ऍडमिट आहेत. आणि एका मैत्रिणीच्या सासूबाई कोरोनाने गेल्याची न्यूज तिने सांगितली .

समोरच क्रिकेटचा डाव रंगात आला होता. एकदम मधूनच गोंगाट करत होती ती .सायलीच्या मनात आलं, कॉलेजेस आत्ता कुठे सुरू झाली होती .परत “ह्या “आजाराचा प्रभाव वाढला त्यामुळे ही सगळी मुलं परत घरी आलेली ! ऊमेंदीची वर्षे असलेल्या , ज्यांची उभी आयुष्य उभी होणार आहेत, त्यांच्यासाठी ही अशी वर्षे वाया जाणे म्हणजे……..!!! सायली अस्वस्थ झाली.

आणि….yes !!! आत्ता सायलीला तिच्या नाराजीचे, चिडचिडेपणामागचे कारण लक्षात आले.

“हा” आजार, कोरोना ज्याने परत हाहा:कार माजवायला सुरुवात केली आहे. तोच मला त्रास देतो आहे हे सायलीने ओळखले. समोर पेपर पडले होते. पुन्हा लॉगडाऊन जाहीर झाला होता.

स्वतःला खूप खंबीर समजत होती ती, तरी मागची गोष्ट वेगळी होती. मागच्या वेळेला लॉक डाऊन नवीन होतं. थाल्या वाजवणे, दिवे लावणे, मुले नवरा कधी नव्हे ते घरी सापडल्याने खूप बरही वाटत होतं कुठेतरी ! त्यातल्या त्यात बरेच जणांचे खूप हाल झाले. तरीपण बऱ्याच लोकांनी त्यांच्या वेळेचा चांगला उपयोगही करून घेतला होता. विद्वस, जीवितहानी ,विरहाच दुःख ,आर्थिक घडी उस्कटने,बेरोजगारी, विस्थापितांची दुःख, शेतकरी व कुटुंबीयांची होरपळ हे सगळं बघितलेलं असताना आता परत सगळं तेच. ….! कल्पनेनिही भीती वाटत होती. आता मृत्यूंची संख्या कमी असली तरी या वेळेच्या लाटेमध्ये फैलाव खूप आहे. घरोघरी आजारी व्यक्ती दिसू लागल्या आहे.

“ठीक आहे! माझ्या चिडचिड होणे हा भावने मागचं कारण मी ओळखलं .” सायलीला बरं वाटलं नाहीतर ,”वड्याचं तेल वांग्यावर” निघायचं ! असं होतं बरेचदा ! कारण आपली नेमकी भावना आपण ओळखलेली नसते.

आता गरज होती ती” स्वीकाराची !”सायलीला परत येत असलेल्या लॉकडाउनेही निराश वाटत होतं. ती कंटाळवाणी झाली होती. कुणाशीही बोललो ,कुठेही वाचलं ,की तेच विषय आणि त्याच बातम्या होत्या ! आणि हे सगळं अगदी नकोनकोस होतं !सगळं चुकीचं होतंय, वाईट होत आहे, भविष्यकाळ अंधकारमय आहे, अनिश्चित आहे, हे नकारात्मक विचार आणि निराशा, दुःख, चिंता, भीती या भावनांनी हे विचार ग्रासलेले होते.

तिने एक दोन मोठे दीर्घ श्वास घेतले. आणि सोबतच स्वतःला कामात गुंतवून ठेवलं. स्वतःची संवाद, सेल्फ टोक सुरू ठेवला. आपण सगळेच एकटे असताना विशेषतः स्वतःशी बोलत असतो. तिने काम करता करता, घर झाडता झाडता, कपडे धुताना विचार सुरू ठेवला. एकीकडे काम करताना व्यायाम होत असल्याने ” डोपामाइन सिक्रेशन” वाढलं आणि तिची निराशा हळूहळू दूर व्हायला मदत होत होती .त्याबरोबरच संवादही सुरू होता.

* त्यासाठी तिने सर्वप्रथम येणाऱ्या नकारात्मक विचारांना ओळखून त्याचा स्वीकार केला.

फ्रेंड्स ! आपण असे विचार फक्त नाकारून चालत नाही. आपल्याला असं वाटतं की मला कळतंय हा चुकीचा विचार आहे आणि तरीही तो येतो. म्हणून आपण विचारांना दूर लोटण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगते. एकशिष्य एका ऋषी कडे आला आणि म्हणाला मला ईश्वराचे ध्यान करून त्याला प्राप्त करायचे आहे. पण काय करू माझ्या मनात नकारात्मक विचार येतात, कितीही ठरवलं की हे विचार येऊ नाही द्यायचे तरीही ध्यान लागू शकत नाही. त्या वेळेला ऋषी त्याला म्हणाले,” हे बघ ! एवढेच कर .डोळ्यासमोर फक्त तुझ्या ईश्वरात कल्पून प्रार्थना सुरू कर. मात्र त्यावेळी माकडाचे विचार तेव्हढे अजिबात येऊ देऊ नको “. तो शिष्य म्हणाला ,”एवढंच ना !जमेल आता मला.” थोड्या दिवसांनी तोच परत धावत आपल्या गुरूकडे आला. आणि म्हणाला “मुनिवर, आधी तरी माझे ध्यान बर्‍यापैकी लागत असे. पण आता मी जसा विचारही करत नाही ते माकड मात्र माझ्या सतत डोळ्यासमोर येतं.”

गोष्टीचा मतितार्थ एवढाच की जी गोष्ट आपण नाकारायला बघतो, दूर सारायला बघतो तेच विचार परत आपल्या मनात येत राहतात. म्हणून विचारांना दूर न सारखा त्यांचा स्वीकार करायचा आहे. कोरोना ,त्याच्यामुळे येणारे लॉक डाऊन , त्यामुळे वाटणारी भीती ,चिंता ,निराशा सायलीने स्वीकारली.

*मागच्यावेळी पंतप्रधान मोदीजींनी एकाच वेळी दिवे लावणे, थाली वाजवणे यासारख्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या. आणि बरेच जणांना वाटलं की त्यांनी काय होणार ? किंवा गो ! कारोना गो ! म्हणून काय होणार ? याचं सरळ मानसिक कारण म्हणजे जेव्हाही देशावर संकट येते किंवा असा प्रश्न उभा राहतो, त्यामध्ये परिस्थिती फारशी आमच्या आटोक्यात नसते, त्या वेळी आपलं मनोधैर्य कायम राखून आपण एकजुटीने या प्रश्नावर लढा देतो आहोत, आपण एकटे नाहीत ही भावना निर्माण होण्यासाठी याचा उपयोग होतो. पूर्वी देशभक्तीपर गीत ,सांघिक गीते होती .त्यातून हेच साधल्या जात होते ना.

म्हणूनच सायलीने विचार केला हे आलेले संकट माझ्या कंट्रोलच्या बाहेरच आहे .आणि हे फक्त माझ्यापुरतं किंवा माझ्या मुलाच्याच आयुष्यावर, करिअरवर परिणाम करणार नाही. आज सगळ्यांचे जे होणार तेच माझं होणार आहे.

*सायलीने “तरी बरं ! ” या मंत्राचा उपयोग करायला सुरुवात केली.

तरी बरं ! आता आजाराची तीव्रता खूप कमी झालेली असल्याने तो जास्त जीवावर बेतणार नाही.
तरी बरं !आता आता यावर लस उपलब्ध झालेली आहे. वगैरे.

*मागच्या चुकातून शिकणे. इच्छा तिथे मार्ग ! मनुष्याच्या स्वप्रयत्नातुन काही ना काही मार्ग तो शोधून काढतो. मागच्या लाटेमध्ये ज्या चुका झाल्या त्या आता व्हायला नकोत. जर मागल्या वर्षी मी माझा वेळ केवळ झोपा काढून घालवला असेल तर या वेळी मी तसा घालणार नाही. डिजिटल गोष्टी शिकण्यावर भर देईन. मागल्यावेळी मला खूपच स्वयंपाक करावा लागला. त्यामुळे माझे पदार्थ सुंदर जमू लागले. कदाचित मी त्याचा फायदा घेऊन यावेळी फुड्स चा बिझनेस सुरू करू शकेल.

*वाईटातुन चांगले काय ते शोधायचे ! याचा विचार करताना सायलीने विचार केला की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप विचारपूर्वक महत्त्वाचे नीतिनियम घालून दिलेले आहेत. आम्ही जुनाट म्हणून ते “टाकावू “ठरवले होते. बाहेरून आल्याबरोबर हातापायावर पाणी घेणे, बाहेरचे कपडे बदलून घरचे कपडे घालने ,चहा ही न ठेवता किंवा स्वयंपाका पूर्वी अंघोळ आणि नित्यकर्म आटोपून कामाला लागणे. परिचय करून घेताना अंतर ठेवून हात जोडून नमस्कार करणे ,शेक हॅन्ड किंवा’ हग’ करण्याची पद्धत आपली नाही. खातांना खूप बडबड न करणे म्हणजे खाताना थुंकी न उडू देणं, शिंका ,खोकला ,जांभई आल्यावर तोंडावर रुमाल ठेवणे, फक्त सॉरी म्हणून काम भागणार नाही .त्याचप्रमाणे रस्त्याने थुकल्यास एक हजार रुपये दंड लावल्याने तर आमचे पूर्वज स्वर्गात सगळ्यात खूष होतील झाले असतील असे सायलीला वाटू लागले.

असा विचार करता करता सायली पूजेसाठी फुले आणायला बागेत गेली. तिने हौसेने लावलेल्या झाडांना भरपूर कळ्या आल्या होत्या .कुठे फुलांची पखरण होती .ती फुले हसून तिच्याशी खेळायला उत्सुक होती. एक फुलपाखरु देखील भिरभिरत बाजूनी पिंगा घालून गेलं. त्यांच्यापैकी कोणीही तिच्याकडे रडगाणं गायलं नाही. फुलांनी लगडलेल्या त्या फांदीवर बसून सायलीच मनही मग झोके घेऊ लागलं !

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button