काही ‘अनवट’ वाटेवरचे प्रवासी

unfamiliar travelers on the road

काही काही लोक आपल्या आयुष्यासाठी अगदीच वेगळ्या वाटा निवडताना दिसतात. मला बरेचदा त्यांच्याकडे बघितलं की, खूप कौतुक व अभिमान वाटतो. कारण विशेषतः जेव्हा मुले दहावी-बारावीला असतात तेव्हा मुलांची आणि त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्या पालकांची उलघाल होत असते. aptitude test मधून त्यांच्या मुलांचे भविष्य जाणून घ्यायला ते उत्सुक असतात .मग अमुक एक विषय आवडत नाही, इंजिनीअरच व्हायचंय पण गणित अजिबात जमत नाही, अशा परिस्थितीत मोठ्या स्किलने प्रकरण हाताळावे लागते. डॉक्टर, इंजिनीअर यांना पहिले प्राधान्य ! नाही जमलं तर मग… अशा वेळी कुठे तरी ही मुले आणि पालक दोघांनाही उगीचच खजील व्हायला होतं, अपराधी भाव जाणवतात. परंतु जेव्हा डोळे उघडे ठेवून इकडेतिकडे पाहतो , ऐकतो , वाचतो त्यावेळी लक्षात येतं की, तरुण पिढी काय काय करते? मागील एका लेखात आपण ‘फूड फोटोग्राफी आणि फूड्स स्टायलिस्ट’ यांच्याविषयी वाचलं आहे. अशाच एका वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका तरुणीचा परिचय नॅशनल जिओग्राफीच्या यु-ट्यूबवरून मला झाला.

तसं म्हणाल तर visual storytelling sksh क्षेत्रात काम ती करते. तसं म्हणाल तर ती एक पत्रकार आणि छायाचित्रकार. एवढीच तिची ओळख! पण असे लेबल लावले की, माणसाला ते नकळत एका चौकटीत टाकतात. मुख्य वर्तमानपत्राकडे किंवा मासिकाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात एकच प्रोजेक्ट करण्यासाठी वेळ आणि पैसा हे दोन्ही नसतं. पण ती ज्या प्रकारे कथा सांगते , या सत्य घटनांवर आधारित , नदी, डोंगर ,माणसं आणि माणसांच्या त्यांच्याबद्दलच्या सांस्कृतिक खुणांच्या कथा ती सांगते. ज्या फोटो स्टोरीज भारतातल्या अनेक प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्येनियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. तिच्या मते तिच्या कथा म्हणजे शब्द ,चित्र, छायाचित्र यांच्या पलीकडे जाणाऱ्या असतात आणि एकाच वेळी अनेक माध्यमांचा वापर करून ती गोष्ट फुलवत असते. त्यातून त्या गोष्टी सर्वांपर्यंत पोहचायला मदत होते. ती पण तुमच्या-माझ्यासारखी. विद्यार्थिदशेत असताना करिअर करण्यासाठी पहिल्यापासून हे क्षेत्र निवडलं वगैरे काही नव्हतं. परंतु व्हिज्युवल स्टोरी टेलिंगची आवड नॅशनल जिओग्राफिक या मासिकामुळे तिला लागलेली होती . मुंबईच्या सेंट झेविअर महाविद्यालयातून बी.एस्सी. फिजिक्समध्ये पदवी घेतली.

पुढे पुणे विद्यापीठातून फिजिक्समध्ये तिने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मुख्य म्हणजे आताच्या शिक्षणप्रणालीप्रमाणे , त्या वेळेला ही सवलत नव्हती. त्यामुळे फिजिक्स, लेखनकौशल्य आणि पत्रकारिता हे विषय एकत्र शिकणं अशक्यच होतं. नाही काय तिने प्रयोगशाळेतही काम केल्यावर सगळे आयुष्य प्रयोगशाळेत काढणे तिला नकोसं वाटत होतं. मग धडाडीने एका रात्रीतून ते काम सोडून तिने लेखनाची आवड जोपासण्यासाठी ‘नॅशनल ग्लोसी’ या मासिकात नोकरी करायला सुरुवात केली. नंतर अमेरिकेत लग्नानंतर गेली . तिथे शिक्षण घेतलं. आठ वर्षे कार्पोरेट जगतात काम केलं .नंतर ही नोकरी सोडून आवडीच्या कामात तिने उडी घेतली. परंतु सध्याच्या कामाच्या पद्धतीमुळे तिला महिन्याच्या महिन्याला पगार मिळत नाही. काही संस्था जगभरातून फेलोशिप किंवा अनुदान देतात आणि त्यातूनच सगळा प्रवास खर्च भागवायचा असतो. त्यामुळे सुरुवातीचा कार्पोरेट जगतात मिळवलेला पैसा तिला कामी आला. पुढे स्लो जर्नालिझमला मदत करणाऱ्या संस्था खूप कमी आहे. म्हणून सहकार्यांसकट यांनी ‘पीपली प्रोजेक्ट’ या संकेत स्थळाच्या माध्यमातून लोकांना आपलं काम प्रसिद्ध करण्याची संधी मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

कारण आजच्या ब्रेकिंग न्यूज जमान्यामध्ये केवळ पैसा ओढण्यासाठी म्हणून, म्हणून अनेक न्यूज, चॅनेल्स खरपूस बातम्या प्रसिद्ध करतात. परंतु अशाही अनेक घटना आज देशात घडतात की ज्या सांगायला कोणी नाही, ज्या गोष्टी लोकांना सांगितल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे एखादा मुद्दा शांतपणे ऐकायचा, बघायचा, मतं बनवायची, मांडायची, त्यातून हळूहळू चर्चा करून परिस्थितीत नेमका कोणता बदल करता येईल ते बघायचं हे या स्लो जर्नालिझमचे वैशिष्ट्य. आता मात्र माध्यम त्याचीच मतं जनतेवर थोपवताना दिसतात. आणि वारंवार तेच सांगितल्यामुळे मेंदू गहाण ठेवून जनता तीच आपली मतं म्हणून स्वीकारते. खरं तर नदी ही आपल्या या भारतीयांसाठी अतिशय पवित्र गोष्ट मानली जाते , सगळ्यांनाच या नदीची एक ओढ असते. एवढंच काय तर मानवी संस्कृतीचा विकासही बघितला तर तो नद्यांच्या आसपास झालेला दिसतो .हीच ओढ म्हणूनच आरती कुमार राव यासारख्या अभ्यासू पत्रकार आणि छायाचित्रकार हिच्यामध्ये नाही दिसली तरच नवल .एका ठिकाणी म्हणते की, “मी सांगते त्या कथा शब्दचित्र, छायाचित्र यांच्या पलीकडे जाणाऱ्या असतात आणि एकाच वेळी अनेक माध्यमांचा वापर करून गोष्ट पुरवत असते.

त्यातून त्या गोष्टी सर्वांपर्यंत पोहचायला मदत होते.” ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांना वर , त्यांच्या आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या संबंधांवर ती काम करते . स्टोरी किंवा काही विषय किंवा वैशिष्ट्यपूर्ण एखादा प्रश्न त्याच्या पलीकडे फक्त नद्या , डोंगर आणि संबंधित माणसं एवढ्यावरच तिचा फोकस आहे. कुठल्याही नदी आणि त्याच्या परिसरात काम करत असताना त्या नदीच्या काठी वसलेल्या वाड्या-वस्त्या यांचा अभ्यास करणे, नदी ज्या बदलांना सामोरे जाते आहे, उदाहरणार्थ धरणे इत्यादी. त्यामुळे तेथील जैवविविधतेवर होणारा परिणाम, बदलणारी रोजगाराची साधने आणि मानवनिर्मित किंवा पर्यावरणामधल्या बदलांमुळे आसपासच्या लोकांवर नक्की काय परिणाम होतो, अशा प्रकारचा तिचा प्रकल्प असतो. यापूर्वी वाळवंटामध्ये राहणाऱ्या लोकांच्या बरोबर काही स्टोरीस तिने केल्या. तिथल्या वेगळ्या पद्धतीची शेती, कमी पाण्यामध्ये राहणारे लोक, धुळीची वादळं याबरोबरच भारतातल्या मान्सूनची सुरुवात, तसेच कलकत्तामधील रस्ते, हत्तींचा कळप भारतामध्ये असलेला दुष्काळही तिचे विषय आहेतच. तसेच बेंगळुरू शहराचा अभ्यास करताना पाण्याचा इतिहास म्हणजे एकेकाळी समृद्ध साम्राज्य समजले जाणारे, ४० वर्षांमधल्या सर्वांत वाईट दुष्काळाला कसे तोंड देत आहे यावरही तिने काम केले आहे .अनेक ठिकाणी तिचे काम सुरू असून, सध्या तिचे स्वतःचे एक पुस्तक लिहिणे सुरू आहे.

अतिशय हसऱ्या आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची आरती कुमार राव इंटरनेटमुळे अशा स्टोरीज लोकांपर्यंत पोहचवण्यात यश आहे याचा त्यांना आनंद वाटतो. खरं तर त्यांच्या कामाचं स्वरूप अतिशय जिकिरीचे आणि अनेक वेळा शारीरिक क्षमतांचा कस लावणारे असेच आहे. दऱ्याखोऱ्यामधील काम करताना, त्यांना येणाऱ्या सकारात्मक अनुभवाबद्दल त्या एका ठिकाणी म्हणतात की, शहरात चार भिंतींमध्ये असे अनुभव कधीच येत नाहीत. बाहेर पडल्यावरच तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय हवे याची जाणीव होते. अधिकाधिक वर्तमानात राहायला आपण शिकतो.

फ्रेंड्स ! आज-काल बरीचशी अशी उदाहरणे आहेत की, ज्यांचे शिक्षण वेगळ्या क्षेत्रांमध्ये झालेले आहे, जीवनाच्या गरजेनुसार सुरुवातीला नावडत्या क्षेत्रात कामही केलं जातं; पण नंतर आपल्या आवडलेल्या क्षेत्रामध्ये उडी घेण्यासाठी धैर्य दाखवणारेही बरेच लोक दिसून येतात. फक्त उडी घेताना योग्य ती वेळ साधावी लागते आणि सोबत हवी थोडीशी धडाडी ! अगदी दहावी-बारावीपासूनच आपल्याला आपली आवड निश्चितपणे कळेल असेही नाही किंवा काही कारणास्तव जर हव्या त्या क्षेत्रात काम करत नसू तर नाराज होण्याची गरज नसते . विचारपूर्वक नवे आवडते क्षेत्र निवडून आपले नवे ध्येय आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर समोर ठेवता येते आणि अशा अनवट bवाटेवरील प्रवासीही बनता येते.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशन व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER