काही अनुत्तरित प्रश्न, रक्ताचे आणि खाटांचे…

Coronavirus Patient - Plasma Donation

Shailendra Paranjapeउन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्यामुंबईतून अनेक विद्यर्थी आपापल्या गावी जातात आणि रक्तपेढ्यांना रक्ताचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या विशेषतः एप्रिल-मे महिन्यात रक्तदान शिबिरं घ्या, असं रक्तपेढ्या विविध समाजसेवी संस्थांना सुचवतात कारण अचानक रक्ताची किंवा रक्तघटकांची गरज एखाद्या अत्यवस्थ रुग्णाला पडल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो.

करोना संसर्गामुळे (Corona) गेलं संपूर्ण वर्ष पुण्यातले विद्यार्थी आपापल्या गावी निघून गेलेत आणि गेल्या पंधरवड्यात विविध राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक संस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांमधून मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन झाले आहे. यासंदर्भात वृत्तपत्रातून आलेली एक बातमी फारच धक्कादायक आणि धंदेवाईक प्रवृत्ती सार्वकालिक अस्तित्व दाखवत असतात, हेच पुन्हा एकदा समोर आणणारी आहे. करोना काळात करोना होऊन गेलेले आणि बरे झालेले अनेक जण प्लाझ्मादान करताहेत. त्यातून अनेक करोनाग्रस्तांना जीवदानही मिळत आहे. पण सामान्य माणसाचा म्हणजे करोना न झालेल्या माणसाचा प्लाझ्मा पाचशे रुपयांना मिळतो तर करोना होऊन गेलेल्या माणसाच्या प्लाझ्माची किंमत दहा अकरा पटींनी जास्ती आकारली जातेय. करोना झालेल्या माणसाचा प्लाझ्मा दुसऱ्या करोनाग्रस्ताला हवा असल्यास रुग्णांना साडेपाच हजार रुपये आकारले जात आहेत.

यासंदर्भात आलेल्या वृत्तानुसार पुणे शहरात असलेल्या एकूण रक्तपेढ्या आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रक्ताची किंवा विलगीकरण केलेल्या रक्तघटकांची माहिती एकत्रितपणे मिळूच शकत नाही. औषध नियंत्रकांच्या कार्यालयातले संबंधित अधिकारी वृत्तपत्रांना दाद देत नाहीत. त्यामुळे या संदर्भातली एकत्रित माहिती मिळू शकत नाही, असं संबंधित वृत्तात नमूद करण्यात आलंय.

पुण्यात कोणत्या रुग्णालयात करोना रुग्णाला बेड उपलब्ध आहे, प्राणवायू सोयीसहित बेड आहे का, व्हेंटिलेटर सोय असलेला बेड आहे का, आदी तपशिलाची माहिती एका क्लिकवर मिळावी, यासाठी प्रशासनाने डँश बोर्डची व्यवस्था निर्माण केली. पुण्यातले कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेनेचे नेते तसेच वैद्यकीय क्षेत्रातले काही तज्ज्ञ यांनी पाच जिल्ह्यांच्या पुणे महसुली विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. डँश बोर्डवर अद्यावत माहिती मिळत नसल्याने नागरिकांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयाकडे रुग्णाला घेऊन रुग्णवाहिकेसह वणवण करावी लागत आहे. बहुतांश नागरिक हताश होऊन स्थानिक पुढाऱ्यांकडे जातात आणि कोणत्या रुग्णालयात बेड आहे, हे डँशबोर्डवरून समजू शकत नाही, ही या शिष्टमंडळाची तक्रार होती. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी या शिष्टमंडळाला दिलेलं उत्तर धक्कादायक आहे. खासगी रुग्णालये माहिती द्यायला टाळाटाळ करतात, असं राव यांनी सांगितलंय. माहिती न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केलीय. ती योग्यही आहे.

करोना काळात रुग्णालयांवरचाही ताण वाढलाय, हे खरं आहे. पण रुग्णालयातून एखादा रुग्ण मरण पावला तर त्याची माहिती पालिकेला कळवली जाते पण रुग्णाला करोना उपचारानंतर घरी सोडल्यानंतर आता रुग्णालयात बेड आहे किंवा नाही, याबद्दलची अद्ययावत माहिती खासगी रुग्णालयांकडून दिली जात नाही.

खासगी रुग्णालये ही माहिती का देत नसावीत…अनेक कारणं असतील पण त्यामुळे घरातली व्यक्ती करोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर आधीच घाबरलेल्या कुटुंबांना केवळ बेड मिळवण्यासाठी रुग्णालयांचे उंबरठे झिजवावे लागतात, हे योग्य नाही.

वास्तविक, रक्तपेढ्यांची माहिती किंवा रुग्णालयातल्या सद्यस्थितीची अद्ययावत माहिती ठेवणं, ती महापालिका किंवा जिल्हा किंवा प्रशासनाला कळवणं, या गोष्टीला काही रॉकेट सायन्सची गरज नसते. इच्छाशक्तीची गरज मात्र खचितच असते. त्यामुळे तुलनेने खूप सोपेपणाने मोबाईलवरून एका क्लिकवर आपल्या घरातल्या करोनाग्रस्ताला कोणत्या रुग्णालयात हवा तसा बेड उपलब्ध आहे, हे रुग्णांच्या घरच्यांना समजू शकण्यासारखं तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही ते वापरलं जात नाहीये, याचा अर्थ इच्छाशक्तीचा अभाव हेच आहे.

ही इच्छाशक्ती नसण्याचं कारण अर्थपूर्ण तर नाही ना, अशी शंका यावी, असे प्रकार सध्या सगळीकडे घडताहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तींचा निषेध करत महापालिका आणि जिल्हा प्रशासनानेच सर्व रुग्णालयांमधली माहिती एका क्लिकवर मिळेल, ही व्यवस्था कोणत्याही उणिवा न ठेवता सिद्ध करायला हवी.

जाता जाता…
करोना झालेल्या सर्वांना उमेद मिळेल अशी बातमी आज प्रसारित झालीय. ती म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातले अंबादास जाधव या ८९ वर्षांच्या आजोबांनी  अस्थमाचा त्रास असूनही करोनावर मात केलीय. त्यांनी लशीकरणातली पहिली लस घेतलेली आहे आणि त्यामुळेच माझी प्रतिकारशक्ती वाढली, असं त्यांनी सांगितल्याचं प्रसिद्ध झालं आहे. अंबादास जाधव सकारात्मकतेने करोनावर ८९ व्या वर्षी मात करतात तर तुम्ही का नाही करू शकणार…

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button