असेही काही स्वभावरंग !

मध्यंतरी एक गृहस्थ भेटले. सकाळी फिरायला गेल्यावर दररोज भेटणारी मंडळी, पुढे चांगली परिचित होत जातात. कधीतरी काही जण आपली सुखदुःखेही सांगतात . त्यातलेच हे एक! ते सांगत होते , माझा मुलगा अनिकेत तो आयआयटी इंजिनीअर (IIT engineer) झाला. खूप हुशार! एका रीसर्च डिपार्टमेंटमध्ये नोकरीला लागला. पण आता केवळ त्याचे सहकारी त्याला त्रास देतात म्हणून त्याने नोकरी सोडली आहे. त्याला चारचौघात बोलणे जमत नाही. आज-काल तो उदास
,कंटाळलेला असतो. मी त्याला खूप सांगून बघितलं .

तात्पुरता उत्साही होतो , पण परत येरे माझ्या मागल्या ! वर्तमानपत्र किंवा पुस्तकातल्या सेल्फ हेल्प (Self help) प्रकारचे सगळे लेख मीही वाचतो, त्यालाही देतो. पण त्याचा उपयोग होत नाही .तो दुसरी नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात आहे, पण मिळतच नाही बघा ! काय करावं काही सुचेनासं झालंय. एवढा शिकलेला मुलगा ,एवढा हुशार पण असा उदास बघितला की खूप वाईट वाटतं .अशा प्रकारची अनेक उदाहरणे आपल्याला समाजात वावरताना आजूबाजूला दिसतात. बरीचशी मुले खूप हुशार असतात, चांगल्या पदावर नोकऱ्याही मिळवतात. पण कधी बॉसशी (Boss) तर कधी-कधी कलिगबरोबर त्यांचे खटकत असते.

प्रत्यक्ष संघर्ष त्यांच्याशी केवळ नोकरी टिकावी म्हणून करत नसतील; पण त्याचा त्यांना स्वतःला खूप त्रास होत असतो. याला अनेक कारणे असतात .काही व्यक्तिमत्त्वाचे प्रकारही यासाठी जबाबदार असतात. पण सगळ्यात महत्त्वाचा असतो तो भाग म्हणजे ‘सोशल स्किल्सचा. सामाजिक कौशल्य !’

 • एक्सपोजर नसणे :कारण बरीच मुलं खूप हुशार असतात ,पण ते अभ्यासातच पूर्ण लक्ष देतात . त्यामुळे बाहेरच्या जगात वावरण्याची सवय नसते . पुष्कळदा आई-वडीलसुद्धा केवळ अभ्यासालाच महत्त्व देत असल्याने मुलांना एक्स्पोजर मिळवून देत नाही, म्हणजे ही व्यक्तिमत्त्वाची एकांगी वाढ किंवा विकास होते असं म्हणता येईल. या सगळ्याचा परिणाम एकंदर त्यांच्या हालचालीवर ,उठण्या-बसण्यावरही होतो, मोकळेपणाने  वावरता येत नाही. वागण्या-बोलण्यात सहजता नसते . तर एक प्रकारचा अवघडलेपणा असतो.
 • माणसं वाचता न येणे :  दुसरी गोष्ट असे एक्स्पोजर न मिळाल्याने! बाहेरचे जग, त्यातील लोक ,त्यांचे वागणे, बोलणे, स्वभावविशेष त्याचे निरीक्षण म्हणा किंवा माणसे वाचणे हा प्रकार त्यांना जमत नाही .त्यामुळे सगळे स्वतःसारखेच सरळ असतात, असे समजून ते वागतात आणि तोंडघशी पडतात . म्हणजे लोक या स्वभावाचा फायदा घेऊ शकतात . याचा अर्थ साधेपणा, सरळपणा असणे हा दोष नाही. निश्चितपणे हा गुण आहे .पण समोरची व्यक्ती कशी आहे हे ओळखता येणे हा चतुरपणा असतो. त्यात वाईट काही नाही. साधारण मुलांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी जी एक अपटीट्युड टेस्ट वा कला चाचणी घेतली जाते त्यातदोन  भाग दिलेले असतात . एक म्हणजे ‘सोशल स्किल’ आणि दुसरा भाग म्हणजे ‘सोशल ओरिएंटेशन’. समिधा अत्यंत मनमोकळी ,आनंदी मुलगी . मैत्री करणे तिलाखूप आवडते आणि तिच्या मोकळ्या स्वभावामुळे आणि मदतीस कायम पुढे असणाऱ्या स्वभावामुळे तिला मैत्रिणी मिळतातही खूप ! पण काही कारणांनी तिला ही मैत्री टिकवून ठेवता येत नाही . प्रत्येकीशी काही ना काही कारणावरून तिचे बिनसत जाते. आणि मैत्रिणी नकळत दुरावतात. वरील उदाहरणात जी परिस्थिती आहे ती म्हणजे तिला सोशल ओरिएंटेशन आहे, समाजात वावरण्याची इच्छा आहे, आवड आहे , कल आहे; पण सोशल स्किल्स नाहीत. कौशल्य नाही. मग यामध्ये ॲडजस्टमेंट, चांगले कम्युनिकेशन ,असरटिवनेस यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. पण हाही एक स्वभावाचा प्रकार आहे.
 • ॲडजस्टमेंट ची सवय : मागे बघितल्याप्रमाणे एक्सपोजर नसणे वगैरे बरोबरच समायोजनाची कमतरता म्हणजे ॲडजस्टमेंट पॉवरची कमी हे एक कारण असू शकते; कारण आजूबाजूच्या व्यक्ती या वेगवेगळ्या असणार . त्यात विविधता असणारच ! एकदा मैत्रीण व मित्र म्हटल्यावर ती व्यक्ती जशी आहे तशी स्वीकार करता यायला पाहिजे. कारण सर्वगुणसंपन्न तर कोणीच नसतं . समोरच्यातील चांगले शोधून दुर्गुणांकडे दुर्लक्ष करणे हे यात येते . ॲडजस्टमेंटची सवय घरापासून बाहेर राहणाऱ्या मुलांमध्ये आपोआप येत जाते. घराबाहेर आपली प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होणार नाही ही सवय लागते किंवा घरी राहणाऱ्या मुलांनासुद्धा ही सवय लावणे हे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी
  गरजेचे असते.
 • व्यक्तिमत्त्वाचे पैलू : भिडस्तपणा :बरेचदा व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू किंवा प्रकार पण याला कारणीभूत असतात .काही व्यक्ती भिडस्त स्वभावाच्या असतात .विद्यार्थी असताना फार कुणाशी संवादाची गरज लागत नाही. पण पुढे व्यवहारात नोकरीच्या ठिकाणी लोकांशी संवाद साधावा लागतो .पुन्हा तिथल्या सहकारी जर आक्रमक व्यक्तिमत्त्वाचे असतील तर त्यामुळे निराशा येऊन उदास वाटू शकते .त्रास होऊ शकतो. म्हणूनच त्यासाठी “असरटिवेनेस “चे प्रशिक्षण गरजेचे असते. (यासाठी ची चर्चा माझ्या “आर्ट ऑफ सेइंग नो!”) या लेखात झालेली आहे. म्हणजे कोणी म्हणते म्हणून,, आपल्याला करायची नसलेली गोष्ट करावी लागत असेल तर त्याऐवजी समोरच्याला न दुखावता पण ठाम नकार देता यायला पाहिजे. सोशल स्किल्स मध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो .काही कारणांनी जर न्यूनगंड असेल तरीही समाजात मिसळताना अडचण येते.. स्वतः बद्दल आदर, प्रेम असेल तर दुसऱ्या समोर आत्मविश्वासाने जाता येते.
 • संवाद कौशल्य : तसेच समोरच्याशी योग्य पद्धतीने संवाद साधता येणे ही पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे. सु संवादात उत्तम श्रोता असणे ही महत्वाची गोष्ट! म्हणजे चांगल्या बोलण्यातून ज्ञान आणि ऐकण्याच्या एकाग्रतेतून समंजसपणा ओळखावा असे अमेरिकन गीतकार जिमी हेंद्रिक्स ने म्हटल्याचे आठवते.
  दुसरी गोष्ट म्हणजे आपले म्हणणे दुसऱ्या पर्यंत नीट पोहोचावे यासाठी आधी ते स्वतःला नीट पटावे किंवा समजावे लागते.आणि नंतर ते योग्य व सुस्पष्ट शब्दात समोरच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे असते. संवाद हा नेहमी दोन्हीकडून असावा लागतो .एकतर्फी चे बोलणे संवाद होऊ शकत नाही, सुसंवाद तर नाहीच नाही!
 • बहुश्रुतता नसणे : बरेचदा खूप शिकलेल्या ,डिग्री मिळवलेल्या लोकांमध्ये ,सध्याच्या परिस्थितीत आजूबाजूला काय चालले आहे ?राजकारण ,समाजकारण इथपासून तर नाटक ,मुव्हीज एवढेच काय फॅशनचे ट्रेन्स पर्यंत माहिती असत नाही .असेच आपण झापड लावून शिक्षण घेतले असेल तर समाजात मिसळल्यावर काय बोलावे ?हा प्रश्न पडू शकतो. पण प्रत्येक वेळी बोलायलाच हवं असंही नाही. उलट समाजात मिसळून ऐकत राहिलो तर अनेक गोष्टी कळत जातात.
 • स्वतःविषयी न्यूनगंड असणे : प्रश्न येतो न्युनगंड असेल तर ग्रुपमध्ये बसणे ,ऐकणे, नकोसे वाटते .समाजात मिसळताना जीव गुदमरतो, कुठेतरी लपून राहत राहावेसे वाटते ,अशा भावना मनात येतात .अशा वेळी “समोरच्या मध्ये काही गोष्टी नाहीत ज्या माझ्या मध्ये आहेत ,मला जी माहिती आहे ते समोरच्याला नाही “असा विचार करून एक्सपोजर चा फायदा घेऊन बहुश्रुत बनता येते. फक्त यासाठी आवश्यकता आहे स्वतःचा स्वीकार करण्याची ! मी आहे तो असा आहे /अशी आहे. आपण स्वतःवर प्रेम करत नसेलात, तर जग नक्कीच करणार नाही !
  त्यामुळे स्वतःवर प्रेम करा !

 

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

ही बातमी पण वाचा : दोघांतील तिसरा पाहुणा : आनंदाचे केंद्र की वादाचा विषय ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER