काही श्रीमंत मराठे करत आहेत मागासवर्गीय अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखण्याचा प्रयत्न; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Prakash Ambedkar

पाटणा :- मागासवर्गीय अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळू नये म्हणून काही श्रीमंत मराठे प्रयत्न करत आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. आरक्षण अंतर्गत महाराष्ट्र सरकारने किती पदे भरली, याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने मागवली होती. मात्र, राज्य सरकार ही माहिती द्यायला तयार नाही. मागासवर्गीयांच्या प्रगतीत अडथळे आणणाऱ्या अशा लोकांचा आम्ही निषेध करतो, असे ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) सध्या बिहारमध्ये आहेत. त्यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून, महाराष्ट्र शासन मागासवर्गीयांना फसवते आहे. सुप्रीम कोर्टाने मागासवर्गीयांच्या पदोन्नतीबद्दल मागितलेली माहिती तयार असूनही दिली जात नाही. आता सरकारने समिती वगैरे स्थापन करणे, हा श्रीमंत मराठ्यांचा मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या विरुद्ध डाव आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.

दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने एका समितीचे गठन केले असून ही समिती मागासवर्गीयांच्या आरक्षणासंदर्भात माहिती घेणार आहे. हा सर्व प्रकार फसवा असून मागासवर्गीय अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळू नये, यासाठी काही श्रीमंत मराठ्यांचा एक गट सक्रिय आहे. पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील सर्व मागासवर्गीय अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात आंदोलन सुरू करावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

यापूर्वी प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, राज्यातील श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नको आहे. महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण करून गरीब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेच्या बाहेर ठेवतात. गरीब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा; अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER