महाराष्ट्राला काहीसा दिलासा : तौत्के चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार नाही

Toutke cyclone - Maharashtra Today

मुंबई : अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रिय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. येत्या १२ तासांत चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला होता. परंतु आता दिलासादायक बातमी म्हणजे हे वादळ महाराष्ट्रात धडकणार नाही.

परंतु सर्वाधिक परिणाम सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जाणवेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी भुते यांनी दिली. डॉ. शुभांगी भुते यांच्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत तौत्के चक्रीवादळ कोकणाच्या जवळ येईल. यावेळी ताशी ६० ते ७० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यावेळी पाऊसही पडेल.

मात्र महाराष्ट्रात कुठेच वादळ धडकणार नाही. जीवितहानी होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. आजसारखेच उद्याही मुंबईत ढगाळ वातावरण असेल; शिवाय पावसाचीही शक्यता आहे. गोवा किंवा कोकणजवळ वादळ असेल तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मागील वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे या वादळाचा मुंबई आणि महाराष्ट्रात प्रभाव दिसून पडणार नाही. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्यात मासेमारांना अलर्ट केले असून समुद्रात गेलेल्या होड्या परतल्या आहेत. हे वादळ गोव्यापासून ३५० किलोमीटर अंतरावर आहे. २४ तासांत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत येईल. चक्रीवादळ तयार झाल्यानंतर ते किनारपट्टीपासून ३५०-४०० किमी अंतरावर असेल.

सर्वाधिक परिणाम सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला जाणवेल. ताशी ६० ते ७० प्रति वेग असलेल्या वाऱ्यामुळे कोकण आणि गोव्यातील झाडे तसंच कच्च्या घरांची पडझड होईल. १६ तारखेला रायगड, मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी परिणाम जाणवतील. तौत्के चक्रीवादळ १८ तारखेला विरावळ/पोरबंदर ते नलिया या गुजरातमधील किनारपट्ट्यांमध्ये धडकेल, अशी माहिती डॉ. भुते यांनी दिली. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्यातील एनडीआरएफची पथकं गोव्याला रवाना झाली आहेत.

परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरात मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे तयारी केली असून एनडीआरएफच्या टीम्ससुद्धा विविध ठिकाणी तैनात करण्यात येत आहेत. आपत्कालीनल परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि आपत्कालीन पूर्वतयारीसाठी एनडीआरएफच्या १० टीम्स तैनात करण्यात येत आहेत. या १० टीम्सपैकी २ टीम्स गोव्यात, २ टीम्स सिंधुदुर्गात, २ टीम्स रत्नागिरीत, ४ टीम्स गुजरातमध्ये उद्यापासून सज्ज राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button