उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा हे आघाडीतील नेत्यांचेच षडयंत्र – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil & Uddhav Thackreay

पुणे :- महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मिळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळानं राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र हा प्रस्तावच बेकायशीर असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आमदारकीच्या पेचप्रसंगातून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडावे, हे आघाडीतल्याच काही असंतुष्ट नेत्यांचं षडयंत्र आहे. त्यात आम्हाला कशाला घालता, असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकीचा महाविकास आघाडीनं राज्यपालांकडे पाठवलेला प्रस्ताव मुळातच घटनाबाह्य आहे. त्यात आम्ही कशासाठी पुढाकार घ्यायचा. आमदारकीचा पेचप्रसंग निर्माण होऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल, हे महाविकास आघाडीतीलच काही असंतुष्ट नेत्यांचं षडयंत्र आहे. त्यात आम्हाला कशाला बोट लावता?” असा धक्कादायक खुलासा पाटील यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : लोकांना १० दिवस पुरेल इतक्या अत्यावश्यक वस्तू मोफत द्या – चंद्रकांत पाटील

पीएम केअर फंडाला मदत करण्याचं आवाहन केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करण्यात आलं होतं. त्याविषयी बोलताना पाटील म्हणाले, आम्ही भाडोत्री ट्रोलर्सला घाबरत नाहीत. माझ्या ट्विटमुळेच १४ जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री गेले. हे माझं यश आहे. पुण्यातील एका बिल्डर्सच्या ऑफिसमधून ट्रोलिंग होतं आहे. त्याचबरोबर परप्रांतीय मजुरांना महामंडळाच्या बसेसनं त्यांच्या राज्यात सोडावं. प्रत्येक वेळी केंद्राकडं बोट का दाखवता? मुंबईत कोरोनामुळे गंभीर स्थिती असताना मजुरांचं स्थलांतरण कितपत योग्य आहे? कोरोना आटोक्यात आणण्यासाठी निमलष्कर, लष्कराला पाचारण करण्यात यावं, अशी आमची सूचना आहे. राज्य सरकारनंही मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून किती खर्च केला त्याचा हिशेब द्यावा, अशी मागणीही पाटील यांनी केली.


Web Title : It is a conspiracy of the leaders of the alliance that Uddhav Thackeray should resign as the Chief Minister – Patil

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)