
हिवाळा सुरु झाला की ताकद वाढविणारे तसेच थंडीपासून रक्षा करणारे पदार्थ आपल्या घरांत बनविले जातात. भारतीय खाद्य संस्कृतीची ही विशेषता आहेच. ऋतुनुसार आहारात बदल करणे त्यानुसार आहाराचे सेवन करणे हे अगदी आपल्या अंगवळणी पडले आहे. म्हणूनच डिंकाचे लाडू असो वा सुंठीवडी ही हिवाळ्यात बनविली जाते. या दिवसात आवळ्याचे लोणचे आवळ्याचा मुरब्बा, गाजर हलवा, आहारात सहजरित्या सामील होतात. अशाच काही वेगळ्या पण गुणकारी बल वाढविणाऱ्या पाककला आपण बघूया-
साळीच्या लाह्याचे लाडू ( प्रीणन मोदक)
साहित्य – साळीच्या लाह्या, जेष्ठमध, मध, साखर, चारोळ्या.
कृती – साळीच्या लाह्या स्वच्छ निवडून थोड्या तूपावर भाजून घ्याव्या. त्याची पूड करावी. त्यात चवीनुसार जेष्ठमध, खडीसाखरेची पूड, चारोळ्या मध ( याऐवजी गुळ वापरू शकतो) एकत्र करावे. छोटे छोटे लाडू बांधावे.
हे विशेषतः लहान बाळांकरीता उपयोगी आहे. बाळांना वरचा आहार सुरु केल्यावर हे लाडू देतात. वजन वाढत नसल्यास हे लाडू अतिशय उपयुक्त ठरतात. मोठ्यांना देण्याकरीता यात दूधापासून बनविलेला मावा टाकता येतो. साखर कमी करावी.
लहान मुलांना भूक लागत नसेल तर बेलफळाचा गर, विलायची चूर्ण साखर आणि साळीच्या लाह्यांचे भाजून केलेले चूर्ण असेदेखील लाह्यांचे लाडू बनवून खाण्यास द्यावे. हे पचायला हलके पण ताकद व पाचन चांगले करणारे, भूक वाढविणारे आहे.
कुष्मांड मोदक –
कोहळ्याचे साल बिया काढून बारीक काप करावे. चुन्याच्या पाण्यात उकळून घ्यावे. मऊ झाल्यावर चाळणीवर टाकून पाणी निथरावे. पूर्ण पाणी निघाल्यावर कोहळ्याचे शिजलेले बारीक बारीक काप तूपावर चांगले परतून घ्यावे. खमंग वास सुटला की ताटात काढून खडीसाखरेची पीठी टाकावी व छोटे छोटे लाडू बांधावे.
गुण- हे कुष्मांड मोदक पित्त कमी करणारे बल वाढविणारे, रुचिवर्धक, वातशामक आहेत. शरीरात उष्णता कमी करणारे आहे.
सांजोरी –
कणिकेत तूपाचे मोहन घालून पाण्याने भिजवावे.
सारण – नारळाचा कीस, मनुका खजूर यांचे बारीक काप, सुंठ दालचिनी मिरे पावडर चवीकरता, यांना एकत्र करुन घेणे.
कचोरीप्रमाणे सारण भरून गाईच्या तूपात मंद आचेवर तळावे.
हेमंत ऋतु मधे या सांजोरीचे सेवन करण्यास सांगितले आहे. बल, रक्त वाढविणारी असूनही सुंठ मिरे असल्याने कफ वाढू न देणारी, अग्नि वर्धक, रुचिवर्धक व थंडीपासून रक्षण करणारी.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला