सदैव सैनिका तु सज्ज राहायचे !

Body Immunity - Coronavirus

अकोला (Akola) ,अमरावती (Amravati), यवतमाळ (Yavatmal) या जिल्ह्यांमध्ये परत लॉक डाऊन (Lockdown) सदृश्य निर्बंध जाहीर झाले आहेत, इतरही जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक फरकाने हीच परिस्थिती आहे. सगळीकडेच सावधगिरीच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. परत कोरोना (Corona) चे रुग्ण वाढत आहेत. जरा कुठे सगळे लोक सैलावले होते. तसेही कोरोनाची दुसरी लाट येणार आणि ती पहिल्या पेक्षा जास्त भयंकर असेल असे बोलल्या जात होते आणि त्या पद्धतीने ती येण्याची चिन्हे दिसत आहेत.

पण आम्ही हरणारे नाहीच ! म्हणून आता आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणे खूप गरजेचे झाले आहे. रोगप्रतिकारशक्‍ती शरीराची आणि मनाचीही. मनाची अशासाठी की या संकटाला तोंड देताना परत याचा परिणाम होणार आहे आपल्या दैनंदिन जीवनावर. आपल्याला फिजिकल डिस्टन्सइन पाळावा लागणार, लोकांना भेटता येणार नाही, बोलता येणार नाही. वर्क फ्रॉम होम चालूच राहील. व्यवसायावरही परिणाम होईल. या सगळ्या सगळ्याचा परिणाम मानसिकतेवर कसा होत असतो ते आपण अनुभवले. शक्यता अशीकी कदाचित ते मागच्या अनुभवांमुळे लवकर अंगवळणी पडेल, त्या सर्व गोष्टीचा स्वीकार लवकर होईल आणि मुख्य म्हणजे त्यासाठी पूर्वतयारीने आपण सज्ज राहु. परंतु हे सगळं झाल्यावरचा विचार करण्यापेक्षा आजार होऊच नाही म्हणून प्रिकॉशन घेण्याची गरज आहे.

यासाठी आपल्याजवळ रोगप्रतिकारक्षमता वाढवणं हा महत्त्वाचा इलाज आहे. न्यूट्रिशन म्हणजे पोषण आणि फार्मास्युटिकल म्हणजे औषध. आपण खातो ते अन्न पोषक असावेच पण काही पोषक पदार्थ असे असतात, जे औषधांचे ही काम करतात. त्यांना “न्यूट्रास्युटिकल “म्हणतात. अलीकडे डिझायनर फुड, फंक्शनल फूड किंवा नेहमीचे न्यूट्रिशन सप्लीमेंट असेही म्हणतात. औषधांपेक्षा अन्नाने रोग बरे होणे केव्हाही चांगले. जसे हळदीमध्ये कर्क्युमिन ज्यामुळे अल्जाइमर होण्यावर प्रतिबंध बसू शकतो. अँटीओक्सिडेंट मुळे आतड्याचे कर्करोग टाळता येणे शक्य होतं. पॉलिफिनॉल ग्रीन टी मध्ये घटकांनी कॅटाचिन मुळे वजन कमी व्हायला मदत होते.

परंतु महत्त्वाची गोष्ट, आज काळाची गरज ओळखून कोरोनाच्या थैमानाचा गैरफायदा घेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या घटकांचे मुळी पेवच फुटले. विविध चहा, काढे, औषधे, इम्युनिटी बुस्टींग बाजारात धडकले.

आणि म्हणूनच खरं काय हे बघण्यासाठी रोगप्रतिकारशक्‍ती बाबत सगळी कार्य शरीरात कशी चालतात ?कशा मार्फत चालतात? हे जाणून घेण्याची गरज वाटते. म्हणजे खरं तर ही यंत्रणा मूळ शरीरात आहेच. परंतु आपल्या आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, आजूबाजूचे वातावरण, आपले वागणे, संस्कार, खातो ते अन्नघटक, विहार आणि शरीराची जडणघडण जी वंशपरंपरेने मिळालेली आहे, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

रोग प्रतिकार शक्तीचा विचार करताना शरीरात, मानवी रक्तामध्ये तीन प्रकारच्या पेशी निर्माण होतात. लाल आणि पांढऱ्या पेशी तसेच खूप लहान लाल पेशी म्हणजे प्लेटलेट्स ज्या रक्त गोठण्यासाठी मदत करतात आणि गर्भाची वाढ ज्या मूळ पेशींपासून होते त्या स्टेम सेल्स असतात, ज्याच्यापासून वरील तीन पेशी निर्माण होतात. त्यापैकी प्राणवायूची देवाण-घेवाण करणाऱ्या लाल पेशी चार महिने जगतात, तर रोग जंतूशी लढणाऱ्या पांढऱ्या पेशी, काही दिवस तास किंवा मिनिटं इतक्या कमी जगतात. परंतु त्यांच्यामध्ये स्मरण शक्ती असते म्हणजे लहानपणी जर गोवर कांजिण्या झाल्या असतील तर जन्मभर ्या विषाणूला नष्ट करण्याची पद्धत प्रतिकारशक्‍ती शरीरात या स्मरण शक्ती असलेल्या श्वेता पेशींमुळे निर्माण होते .विविध रोगांवरच्या लसी याच तत्त्वावर कार्य करतात. पण रोग जंतू देखील तेवढेच हुशार असतात. ते रूप पालटून, म्यूट होवून शरीरात प्रवेश करतात. कोरोनाचे भय असण्याचे कारण की तो सहज रूप बदलतो आणि रोगी बरा झाल्यावरही त्याला परत होऊ शकतो.

श्वेता पेशींचे तीन प्रकार आहेत. त्यापैकी “लिंफोसाइट “यांचा प्रतिकारशक्ती निर्माण करण्यात सर्वात महत्त्वाचा सहभाग असतो. या दोन्ही कानाच्या खाली जबड्या खाली मानेजवळ असतात. यातील लिंफ द्रव्य वाहून नेणाऱ्या लसा म्हणजे शरीरातील लष्करी दलांची वाहतूक करणारे रस्ते किंवा वाहन. ते मोकळे नसतील तर लढाई कशी जिंकणार? सैनिक असलेल्या श्वेता पेशींना रसद पुरवली पाहिजे, जखमी आणि मृत पेशींना बाहेर काढलं पाहिजे, तरच फौजा शत्रूवर तुटून पडू शकतील. मग त्यासाठी त्यांच्या छावण्या विविध ठिकाणी असतात, त्या म्हणजे घशात टॉन्सिल्स, छातीत थायमस, पोटात प्लीहा.

कोरोना बाबत महत्वाचे म्हणजे शरीराच्या समोरचे शत्रू रोगजंतू आणि विषाणू. जंतू सजीव असल्याने औषधांनी मारता येतात. विषाणू म्हणजे बहुतेक वेळा प्रथिनांची बनलेली विशिष्ट रचना. ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते सजीवपेशी मध्ये शिरून त्या पेशींच्या डीएनए वर ताबा मिळवून स्वतः सारखे हजारो-लाखो रेणु ही बनवतात ,याने पेशी फुटून मरते आणि लाखो विषाणू रक्तातून नव्या पेशीमध्ये शिरतात .कोरोना संसर्गजन्य असल्याने बाधित व्यक्तीने स्पर्श केलेले पृष्ठभाग देखील रोग पसरवतात .ते हिमोग्लोबिन वर अटॅक करत असल्याने प्राणवायूच्या अभावाने श्वास विकार होऊन रुग्णाचा मृत्यू होतो. त्यासाठी शरीरातील यंत्रणा म्हणजे शरीराचे शत्रू हवेतून आले तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी नाकातील ओलसर त्वचा “म्युकॉसाच्या “आवरणाने तर श्वासनलिकेत केसांची लव “सिलिका “यामुळे सूक्ष्मजंतू कण शरीरात पोहोचत नाहीत.

फ्रेंड्स ! आता शरीराच्या लढाऊ रचना आपण पाहिल्या. आता त्याला आपण काय मदत करू शकतो हे थोडक्यात बघू. वर सांगितल्याप्रमाणे म्युकॉसा आणि सिलिया निर्माण करण्याचे काम सी व्हिटॅमिन करते. म्हणूनच श्वसन विकारांसाठी सी व्हिटॅमिन चा उपयोग होतो की जे स्ट्रॉबेरी आवळा लिंबू पेरू संत्र किंवा आंबट फळात भरपूर असतं. रोगांमध्ये प्लेटलेट्स कमी होतात अशा काही आजारांमध्ये आपलं शरीर स्वतःच्याच पेशींना शत्रु पक्षाची प्रथिने समजून नष्ट करतं. प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी प्रथिनयुक्त आहार महत्त्वाचा असतो. विटामिन के असलेले खाद्यपदार्थ प्लेटलेट्स वाढवायला मदत करतात उदाहरणार्थ पालेभाज्या किवी आणि डाळिंब. तसंच विटामिन डी आणि बी युक्त पदार्थ म्हणजे पालेभाज्या ब्रोकोली चवळी सोया भात अंडी मासे. प्रथिनयुक्त आहार महत्त्वाचाअसला तरी फुड ऍलर्जी ही फक्त प्रथिनांची असते त्यामुळे एकदम नवीन किंवा परदेशी धान्य खाण्यापूर्वी आपल्याला एलर्जी नाही ना याची खात्री करावी. गव्हातील प्रथिनांची ऍलर्जी असेल तर त्या ऐवजी ज्वारी बाजरी नाचणी ची भाकरी असा आहार घेता येतो. तसेच कोणत्याही एका धान्यामध्ये शरीराला अति सर्व अमिनो आम्ले नसतात म्हणून मल्टीग्रेन खाद्यपदार्थ चांगले सगळ्यांना मानवणारी मुगडाळ चांगली.

लिफ्ट द्रव्याचे महत्त्व आपण पाहिले आहे .लिंफद्रव्य वाहुन नेणाऱ्या लसिका मध्ये प्रवाह हा गुरुत्वाकर्षणामुळेच होतो ,त्यासाठी कोणताही पंप नाही आणि म्हणूनच श्वेतपेशी योग्य त्या प्रमाणात वाढण्यासाठी पौष्टिक आहार जितका महत्त्वाचा तितकाच स्नायूंची हालचाल सुद्धा आवश्यक आहे. शारीरिक हालचाल, उठबस, वाकणे, चालणे, आणि योग्य व्यायामाने लिंफद्रव्य शरीरभर खेळत राहणे महत्त्वाचे आहे. दररोज एक तास घाम येईल असा व्यायाम असेल तर वेगळं काही करण्याची गरज नाही. ते शक्य नसेल तर साधे सोपे व्यायाम मानेचे, बटरफ्लाय, आणि प्राणायाम, कपालभाती भस्त्रिका ,चवड्यावर चालणे. समतोल आहार ,व्यायाम आणि पुरेशी झोप नैसर्गिक शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवितात. आहारात भरपूर आणि विविध फळे ,भाज्या, धान्य ,डाळी, कडधान्य आलटून पालटून असावेत. मिताहार जेवणाने एक तृतीयांश पोट भरले पाहिजे, उरलेले एक तृतीयांश पाणी आणि पाचक रस. एक तृतीयांश हवा राहण्यासाठी म्हणजेच जठराचे आकुंचन-प्रसरण नीट होण्यासाठी. या सगळ्या ग्रंथी उत्तेजित राहण्यासाठी .एरोबिक्स ,योगासन ,वजन उचलणे आणि स्ट्रेचिंग यामुळे आपण शरीराला शत्रुसंगे लढण्यासाठी मदत करू शकतो .त्यासाठी स्वतः ला म्हणू या सदैव सैनीका तू सज्ज राहायचे. (संदर्भ : डॉ. स्मिता लेले आरोग्य विज्ञान )

ही बातमी पण वाचा : ” तेणे माझ्या चित्ता समाधान ! “

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER