‘गृहमंत्र्यांना हप्ते द्यावे लागतात !’ पोलीस निरीक्षकाकडून पाच लाखांची मागणी केल्याचा आरोप

demand-bribe-in-name-of-home-minister

सोलापूर : गृहमंत्र्यांचं नाव घेत बार्शी पोलिसांनी आपल्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली, असा खळबळजनक आरोप सोलापुरातील सराफा व्यापाऱ्याने (Solapur traders) केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी पैसे मागितल्याचा आरोप सराफ व्यावसायिक अमृतराव गुगळे यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या आरोपानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध घातले आहेत. तरी पण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अमृतराव गुगळे या सराफ व्यावसायिकाने चांगमल ज्वेलर्स हे आपलं सोन्याचं दुकान उघड ठेवलं होतं.

राज्य सरकार आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचं दुकान सील केलं. दरम्यान, बार्शी शहरचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी आपल्याकडे तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केली. ते देण्यास नकार दिल्याने दुकान सील केल्याचा आरोप सराफ व्यापारी अमृतराव गुगळे यांनी केला आहे. हे सर्व हप्ते गृह मंत्रालयापर्यंत द्यावे लागतात, असंही पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावींनी म्हटल्याचा आरोप सराफ व्यावसायिकाने केला आहे.मात्र बार्शी पोलिसांनी सराफा व्यावसायिकाने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

अमृता अमृतराव गुगळे यांनी सराफ दुकान उघडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृतराव गुगळे यांचे सराफ दुकान चालू असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही कारवाई केली. १५ दिवसांपूर्वी अमृतराव गुगळे यांच्या दोन पुतण्यांविरुद्ध जबरदस्ती जमीन हडपणे आणि सावकारी संबंधित गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पूर्वग्रहदूषित होऊन हे खोटे आरोप केल्याचा दावा पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी केला. त्यांच्यावर चारित्र्यहनन केल्याबद्दल लवकरच कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button