सोलापुरात राष्ट्रवादीला धक्का; आमदार दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याच्या तयारीत

Dilip Join Shivsena

सोलापूर :सोलापुरात राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बार्शीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते दिलीप सोपल यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत बोलावलेल्या बैठकीला दांडी मारली आहे. तर सोपल यांनी बार्शीत आपल्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतला आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी चर्चा करून दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

बार्शीचे शिवसेनेचे माजी आमदार राजा राऊत भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांचा विचार ऐकून पक्षांतराबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती दिलीप सोपल यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.

दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यास सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला दुहेरी धक्का बसणार आहे. कारण राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवलेले संजयमामा शिंदे हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे संकटावर राष्ट्रवादी कसा मार्ग काढणार हे  पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईत नेत्यांची बैठक घेत आहेत . या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती आणि आगामी विधानसभा निवडणुका यावर चर्चा होणार आहे. तसंच ईव्हीएमविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे. यासंदर्भातदेखील राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.