सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी

rajesh Kale

मुंबई :आयुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती . त्यानंतर राजेश काळे (Rajesh kale) यांची आज (१३ जानेवारी) भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपाचे शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी याबाबत घोषणा केली. काळे यांच्यावर महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला होता.

भाजपाच्या गोटातून त्यांची उपमहापौर पदावरून आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी होती. त्यामुळे अखेर भाजपाच्या (BJP) कार्यकारिणीने हा निर्णय घेतला . माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूहाच्यावतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यासाठी ई-टॉयलेट, कचरापेट्या आणि अन्य साहित्याची व्यवस्था करण्यासाठी राजेश काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला. प्रशासकीय मान्यतेशिवाय पालिकेची मालमत्ता कुठेही पाठवता येणार नाही.

ई-टॉयलेट, कचरापेट्या आणि इतर साहित्याची व्यवस्था करण्यासाठी पत्रव्यवहार करणं अपेक्षित असल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं मत होतं. अधिकाऱ्यांच्या मतावरून संतापलेल्या उपमहापौर राजेश काळे यांनी पालिका आयुक्त, उपायुक्त, विभागीय अधिकारी यांना फोन करून शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिवीगाळ आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उपमहापौर राजेश काळे हे फरार होते.

त्यांच्या शोधासाठी सदर बझार पोलिसांकडून वेगवेगळ्या ठिकाणी पथकं रवाना करण्यात आली होती. त्यानंतर ५ जानेवारी रोजी अखेर त्यांना टेंभूर्णीजवळ अटक करण्यात आली आहे. राजेश काळे यांच्याविरुद्ध २९ डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यापासून ते  फरार होते. पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यावरून पाठलाग करत काळे यांना टेंभूर्णी परिसरात अटक केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER