भाजपा खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Jayadheswara Shivacharya

सोलापूर : सोलापूरचे भाजपा खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय आणि आर्थिक लाभ मिळवण्याच्या उद्देशाने सिद्धेश्वर महाराज यांनी जात लपवली असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. चौकशीअंती त्यांना तत्काळ अटक करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी सोलापूर राखीव जागेसाठी जात लपवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जात पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवला आहे. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, बेडाजंगम जातीचा दाखला सादर केला होता. त्यानंतर जात पडताळणी समितीने खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात अनुसूचित जाती जमातीसाठी असलेले लाभ घेतल्याच्या कारणावरून अक्कलकोट आणि उमरगा तहसीलदारांना न्यायालयात फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले होते.

अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांनी शिवाचार्यांविरोधात फिर्याद दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूरच्या सदर बझार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यासह अक्कलकोट/उमरगा तहसील कार्यलयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.