दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सोलापूरचा जवान शहीद

Sunil Kale

सोलापूर : सीमारेषेवरून एकीकडे चीनसोबत तणाव सुरु असताना, इकडे पाक सीमेवरही दहशतवाद्यांकडून कुरघोड्या सुरुच आहेत. पुलवामाच्या बंडजू भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मात्र, त्यात भारताचा एक जवानाला वीर मरण आले आहे. पुलवामाजवळ बंडजु या भागात भारतीय जवान आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या चकमकीत, बार्शी तालुक्यातील पानगावचे वीर सुनील काळे हे शहीद झाले आहे. सुनील काळे हे केंद्रीय राखीव संरक्षण दलामध्ये कार्यरत होते. सुनील काळे यांना वीरमरण आल्याची बातमी कळताच बार्शी शहरासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

भारतीय जवानांना जम्मू काश्मीर येथे पुलवामा विभागात बंडजु या गावी काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती आज पहाटे मिळाली होती. यावेळी केंद्रीय राखीव संरक्षण दलाच्या एका तुकडीने बंडजु परिसराची पाहणी केली. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या अतिरेक्यांना जवानांनी घेरल्यानंतर, अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये सुनील काळे हे शहीद झाले.

दुसरीकडे भारतीय जवानांनीही दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी जागच्या जागी ठार झाले. मात्र या चकमकीत महाराष्ट्राचा वीर शहीद झाल्याने राज्यावर शोककळा पसरली. शहीद जवान सुनील काळे हे मूळ बार्शी तालुक्यातील पानगाव येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER