सोलापुरातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे चार नेते भाजपमध्ये जाण्याची शक्यता!

Sanjay Shinde

सोलापूर : लोकसभा निवडवणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून शरद पवारांना मोठा धक्का दिला होता. विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्वत: भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरीही लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्याच उमेदवाराच्या बाजूने स्वत:ची ताकद झोकून दिली.

मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेतल्याने माढ्याची जागा राष्ट्रवादीला गमवावी लागली. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही मोहिते पाटलांनंतर सोलापुरातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे चार मोठे नेते शिवसेना-भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे भाजपत जाण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेसचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सिद्धाराम म्हेत्रे आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भारत भालके आगामी विधानसभेला भाजपमार्फत शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ विधानसभेचे विद्यमान आमदार रमेश कदम हे आगामी विधानसभेसाठी शिवसेनेतून लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.