सोशल मीडिया आणि ट्रोलयुग

Social media and troll

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे (Social media ) युग आहे. दुनिया मेरी मुठ्ठी में याप्रमाणे, व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यासारखी समाजमाध्यमं जगातल्या सर्वांसाठी मुक्त आणि खुली आहेत. इथे अकाउंट उघडणे आणि त्यावर काहीही पोस्ट करणं सहज आणि सोपं आहे. एवढेच काय आपल्या दिनक्रमातील जास्तीत जास्त वेळ हा या समाजमाध्यमांभोवती जातो. एक प्रकारे हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक बनत चाललेला आहे. अर्थात बऱ्याचशा लोकांसाठी ही माध्यमं म्हणजे वेळामध्ये काही तरी करमणूक किंवा मनोरंजन हवं यासाठी खूप सोयीची झालेली आहेत. कारण फेसबुकसारख्या माध्यमातून आपल्याला अख्ख्या जगातल्या आपल्याला आवडणाऱ्या अशा अनेक गोष्टींशी कनेक्ट होताहेत आणि अशा लोकांबरोबर जोडल्याही जाता येते.

पण त्याचबरोबर अलिबाबाच्या गुहेतल्यासारखं आपण खोलातच जात राहतो आणि वेळ किती गेला याचं भान राहात नाही. हेही सर्वज्ञातच आहे . बरेचसे लोक याचा उपयोग व्यक्त होण्यासाठी करतात तर काही आपल्या विचारांचा किंवा कामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी याचा उपयोग करतात. सध्या परिस्थितीमध्ये तर एकूणच सगळ्या गोष्टींसाठी ऑनलाईनचे माध्यम वापरण्यावर खूप भर आहे. यात विविध प्रकारचे वर्कशॉप्स, क्लासेस यातून घरबसल्या अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत. असं जरी असलं तरी सकारात्मक गोष्टीसोबतच काही नकारात्मक गोष्टीसुद्धा त्याच्यासोबतच येतात. कारण समाजमाध्यम हे खुले व्यासपीठ आहे. या खुल्या व्यासपीठाचा फायदा घेऊन सध्याच्या काळात ट्रोलिंग करण्याचा प्रकार भरपूर प्रमाणात वाढत आहे. मागील काही वर्षांमध्ये अनेक कलाकार, लेखक, विचारवंत, मंत्री राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या सेलिब्रिटिजना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

या प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या कोणीही आणि कुणाचीही एखादी कृती, एखादी घटना किंवा समाजमाध्यमांवर एखादी पोस्ट, एखादा फोटो, केलेले विधान याच्यावरून अचानक ट्रोलिंग सुरू होतं. आणि मग अगदी थोड्या वेळामध्येच हजारो ट्रोल्स किंवा कमेंट्स प्रतिक्रियांचा पाऊस पडतो. मध्यंतरी प्रसाद शिरगावकर या मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक व वक्ते यांचा लेख वाचनात आला . त्यात त्यांनी या ट्रोलिंगबद्दल सुंदर माहिती दिली होती. हे असं ट्रोलिंग विशेषतः सेलिब्रिटी लोकांबाबत जास्त प्रमाणात घडतं. याचे कारण देताना ते म्हणाले की, “त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे ,समाजमाध्यमांवरची त्यांची प्रोफाईल्स ही कुणीही बघू शकतो, त्यांनी टाकलेल्या पोस्टवर कमेंट करू शकतो. त्यांना लाखो फॉलोअर्स असल्यामुळे त्यांना पाठवलेल्या पोस्ट हजारो-लाखो लोकांपर्यंत पटकन जाऊन पोहचू शकतात. आणि आपोआपच ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला एका क्षणात स्वतः सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटायला लागतं. सेलिब्रिटी म्हटल्यावर हे होणारच असं जरी म्हटलं तरी काही ट्रोल्स मात्र थोड्या वेळाच्या आनंदासाठी न करता त्याहीपुढे जाऊन फोन करून , धमक्या देणे, प्रत्यक्ष गाठून मारहाण करणे इथपर्यंत जाऊन पोहचतात.

त्यात ती व्यक्ती स्त्री असेल तर मानसिकदृष्ट्या हिंसा किंवा चारित्र्यहनन तिच्या वैयक्तिक आयुष्यावर हवे तसे बोलणे असे सुरू केले जाते. यात कुठे तरी सुप्त मत्सर, काहीसा राग किंवा आपल्याला न ऐकणाऱ्या, वेगळा विचार मांडणाऱ्या, यशस्वी, दुर्लक्ष करणाऱ्यांना जास्तीत जास्त ट्रोल केल्या जातात. कधी कधी तर खुनाच्या किंवा बलात्काराच्या ऑनलाईन धमक्याही दिल्या जातात, असे आपल्या वाचण्यात येते. त्याचबरोबर आपल्या अस्मितेवर विचारांनी घाला घालणारी व्यक्ती किंवा आपली आवडती विचारधारा किंवा राजकीय पक्षाला विरोध करणारी व्यक्ती त्यांच्यावर ट्रोलिंग केले जाते. एकूणच काय तर ट्रोलिंगच्या पद्धती, त्यांचे प्रमाण वेगाने वाढते आहे.” बरेचदा वैयक्तिक आयुष्यात असलेलं नैराश्य किंवा वैफल्यग्रस्तता किंवा काही यशस्वी व्यक्तींबद्दल असणारा मत्सर ,राग काढण्याचे खुलेआम माध्यम म्हणून आणि हायपर कनेक्टेड युगातील एक कटू आणि भीषण वास्तव म्हणजे ट्रोलिंग ! ट्रोलिंग म्हणजे नेमके काय ?

तर एखाद्या व्यक्तीविरुद्ध ,विविध समाजमाध्यमांमध्ये एकत्रितरीत्या अतिशय वाईट असे भाष्य करणे, मनात काही राग ठेवून किंवा कधी पूर्वग्रहामुळे किंवा केवळ गंमत म्हणूनही एखाद्या माणसाविरुद्ध बदनामीचे काहूर उठणे आणि त्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर शिव्याशाप बदनामी धमक्या यांचे आक्रमण करणे, जेणेकरून समोरच्या माणसाची मानसिक भावनिक किंवा शारीरिक आणि होईल असे वर्तन म्हणजे ट्रोलिंग. पण असे ट्रोलिंग का केले जात असावे ? यामागे काय मानसिक आणि सामाजिक कारणे असावी ? यासंबंधी विचार करण्यासारखा आहे. तसं म्हटलं तर बरेचदा उगीचच कुणाचा तरी राग करत असताना “कसली मस्ती जिरवली !” एखाद्याचं या पद्धतीनं एका क्षणासाठी सूड घेणारा आनंद मिळवणं यापलीकडे बरेचदा काही नसतं. नाही तर अशा प्रतिक्रिया देऊन, “स्वतः मोठेपण टेंभा मिरवण्यात” यापलीकडेही काही नसतं.

परंतु यात जमेची बाजू एक असते की, समाजमाध्यमांवर खोट्या ओळखीचा मुखवटा घालून अनेक गोष्टी करता येतात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या समोर जाऊन बोलण्याचे धारिष्ट्य नसेल किंवा चारचौघातसुद्धा उघडपणे बोलता येत नसेल, पण डोक्यात जर काही राग किंवा खुन्नस असेल तर ती कुठल्याही चुकीच्या भाषेत कमेंट्स रूपाने सोशल मीडियावर करता येते. अनामिकतेमुळे मत्सर काढून टाकण्याला यातून वाट मिळते. दुसरी गोष्ट अलीकडे जात, धर्म, देव, भाषा-प्रांत राजकीय पक्षाविषयीच्या विचारांच्या अस्मिता, त्यांना जर इतर काही माणसांच्या विचारांनी त्याला विरोध होत असेल तर आपल्या विचारांची माणसं एकत्र येऊन त्या विरोधी माणसावर ट्रोलिंगचे माध्यम वापरले जाते.

याची एक दुसरीही बाजू अशी आहे की, बरेच लोक “अटेंशन सिकिंग बिहेविअर” असणारे असतात. त्यामुळे सगळ्याच वेळी ट्रोलिंग करणारेच दोषी नसतात. बरेच लोक स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी काही तरी टीका किंवा विचारांचे वादळ उठेल, अशा पोस्ट जाणीवपूर्वक टाकतात आणि मग त्यावर टीकाटिपणी यांचे वादळ, ट्रोलिंग उठते. असे जरी असले तरी या ट्रोलयुगात थोडे जबाबदारीने वागून, यापासून थोडाफार बचाव करता येतो. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजमाध्यमांचे व्यासपीठ एक खुले व्यासपीठ आहे ,तिथे जे व्यक्त होतं ते हजारो लोकांपर्यंत पोहचतं, याची जाणीव ठेवून प्रत्येक पोस्ट प्रतिक्रिया अत्यंत जबाबदारीने पोहचत्या करायला हव्यात.

आपण जे काही विचार मांडतो आहे ते काही वेळेस तिढा निर्माण करणारे किंवा कुणाच्या अस्मितेला दुखावणारे आहेत का ? याचा सखोल विचार करून मगच अत्यंत विचारपूर्वक ते मांडायला हवेत. आगीत तेल न ओतणे, पोस्ट किंवा एखादा विचार विचारपूर्वक जर मांडले आहेत, तर ट्रोल करणाऱ्या लोकांशी वाद घालणे किंवा परत पोस्ट टाकणं किंवा कुठलीही चर्चा करायची गरज नाही. त्याऐवजी अशा पोस्ट डिलीट किंवा ब्लॉक करणे. नाही तर तक्रार खटले असे कायदेशीर मार्ग आहेतच, चक्क दुर्लक्ष करणे हा उत्तम मार्ग आहे. शेवटी समाजमाध्यम हा सामाजिक संवादाचा एक मार्ग आहे. जिथे कुठे सकारात्मकता आहे तिथे नकारात्मकताही कुठे तरी येणारच आहे, म्हणूनच या ट्रोलयुगाचा समर्थ स्वीकार करून, योग्य ती सावधगिरी बाळगणे आणि सक्षमपणे वापर करणे हीच गरज आहे.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER