… तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाब विचारणार का? भाजप नेत्यांचा सुप्रिया सुळेंना सवाल

BJP leaders question Supriya Sule

मुंबई :- देशभरात उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेचे पडसाद उमटले आहे . या घटनेच्या निषेधार्थ सत्ताधारी काँग्रेस, शिवसेना आंदोलन करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. यावरून भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

यूपी सरकारवर टीका करण्याचे अधिकार जरूर आहेत पण महाराष्ट्रातील लेकी-सुनांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्याच्या समोर कधी प्रश्न उपस्थित करणार? गेल्या सहा महिन्यांत महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचे काय? असा प्रश्न उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

हाथरस प्रकरण (Hathras Case) दुर्दैवीच आहे आणि त्याची दखल घेत तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करत प्रकरण सीबीआयकडे दिले, पण इथे गेल्या सहा महिन्यांत ज्या घटना घडल्या त्यांवर किती कारवाई झाली? इतर ठिकाणची उठाठेव जरूर करा पण आपल्या अंगणात काय सुरू आहे हे कधी पहाणार? असा टोला त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

हाथरस येथील घटनेविरोधात आंदोलन करण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेला अधिकार आहे. मात्र त्याच बरोबर हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रातील सरकारमध्ये सहभागी आहेत, त्या सरकारने गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात महिला, तरुणी, अल्पवयीन मुली, बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात काय केले आहे, हे ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारण्याचे धाडस दाखवावे. महाराष्ट्रात कोरोना (Corona) उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रूग्णांवर बलात्कार, विनयभंगासारख्या संतापजनक घटना घडलेल्या आहेत. पनवेल, पुणे, इचलकरंजी, नंदुरबार, चंद्रपूर येथे विलगीकरण केंद्रात महिला, तरुणींवर अत्याचार, विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत याकडे भाजपाने लक्ष वेधले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER