
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका बॉलिवुड (Bollywood) गायीकेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यातच रेणू शर्मा (Renu Sharma) नावाच्या महिलेने हा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या दुस-या लग्नाची गोष्टही सर्वांना सांगून आश्चर्याचा धक्का दिला आहे. या सर्व प्रकरणानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादीची प्रतिक्रिया आल्यानंतर आता महाराष्ट्र करणी सेनेनीही धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना दोन पत्नींसंदर्भातील द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होऊ शकत नाही. धनंजय मुंडे यांनी कायद्याचे उल्लंघन केले नाही, असे महाराष्ट्र करणी सेनेचे (Maharashtra Karni Sena) प्रमुख अजय सिंह सेंगर (Ajay Singh Sengar) म्हणाले आहेत.
मुस्लिम नागरिक चार विवाह करु शकतात, मग हिंदू व्यक्तीने दुसरे लग्न केले, तर चुकीचे काय? असा सवाल सेंगर यांनी विचारला
भारताच्या राज्यघटनेने सर्व धर्म समभाव तत्त्व स्वीकारले आहे. तेव्हा द्विभार्या प्रतिबंधक कायदा निरर्थक ठरला आहे. त्यामुळेच सर्व धर्मांना विवाह बंधनाचे वेगवेगळे कायदे असू शकत नाहीत, असले तरी ते निरर्थक ठरतात, फक्त हिंदू धर्मीयांनाच द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होऊ शकत नाही. कारण राज्यघटना सर्व धर्म समभाव आहेत, असं अजय सिंह सेंगर म्हणाले.
मुस्लिम 4-4 विवाह करु शकतात, मग हिंदू व्यक्तीने दुसरे लग्न केले, तर चुकीचे काय? पहिल्या पत्नीपासून सकारात्मक सुख मिळत नसेल, तर मुस्लिमांप्रमाणे हिंदू दूसरे लग्न करु शकतात, असं मत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी व्यक्त केलं. द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचे बंधन मुस्लिम, ख्रिस्ती धर्मीयांना का नाही? असा सवालही सेंगर यांनी विचारला.
धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये करुणा शर्मा यांच्याशी लग्न केल्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. करुणा शर्मा आपली पत्नी असल्याचा कोणताही दावा त्यांनी केलेला नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केल्यानुसार त्यांचे एकच लग्न झाले आहे.
धनंजय मुंडे काय म्हणाले –
समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्रं प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणू शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्ख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहेत. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत.
करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे, असेही धनंजय मुंडेंनी सांगितले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला