म्हणून विराजसचा निबंध ठरला वेगळा

Virajas & Mrinal Kulkarni

आपण आयुष्यात कर्तृत्वाने कितीही मोठे झालो, यशस्वी झालो, जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी शाळेतले दिवस, आठवणी कधीच विसरत नाही. म्हणूनच तर आता शाळेतल्या मित्रांच्या व्हॉटसग्रुपवर जेव्हा गप्पा रंगतात तेव्हा त्यात वर्गातील चित्रकलेच्या गंमती, मैदानावरचे खेळ, परीक्षेतील मार्क, सुटी संपवून शाळेत येण्याची ओढ हे सगळं नव्याने आठवतं. शाळेत असताना निबंध लेखनात तर वेगळीच मज्जा असायची. मी पंतप्रधान झालो तर, दूरदर्शन..शाप की वरदान, माझी आई, माझे बाबा असे विषय निबंधातून मांडताना कल्पनाशक्तीचा कस लागायचा. सेलिब्रिटी झालेल्या कलाकारांनाही त्यांच्या शालेयवयातील किस्से सांगायला आवडतं ते यामुळेच. अभिनेता विराजस कुलकर्णीलाही (Virajas Kulkarni) त्याच्या आयुष्यातील हा किस्सा सांगितल्यावाचून राहवलं नाही आणि माझी आई या निबंधाचा किस्सा विराजसने सांगितला. सगळ्यापेक्षा विराजसचा निबंध वेगळा का होता हे सांगत त्याने आई मृणाल यांच्यासोबतचा फोटोही शेअर केला आहे.

विराजस लहान असताना त्याची आई अभिनेत्री मृणाल यांच्या अभिनयाची कारकीर्द यशोशिखरावर होती. सिनेमा, मालिका, नाटक या तीन्ही माध्यमात मृणाल एक आघाडीच्या अभिनेत्री होत्या. विराजसचे आजोबा आणि बाबाही अभिनयाच्या क्षेत्रात असल्याने त्यांचाही मृणाल यांना घरातून पाठिंबा होता. साहजिकच विराजस लहान असताना मृणाल शूटिंगसाठी सकाळी लवकर जायच्या आणि रात्री उशीरा यायच्या. विराजसच्या शालेय वयातही त्यांच्या घरात हेच रूटीन होतं. विराजसनेही आईचे कामानिमित्ताने बाहेर असणे स्वीकारले होते. यावरूनच विराजसने निबंधाची आठवण सांगितली आहे.

विराजसने या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की, शाळेत असताना आम्हाला, माझी आई या विषयावर मराठीच्या शिक्षकांनी निबंध लिहून आणायला सांगितले होते. पण आम्ही खूप लहान होतो म्हणून सरांनी काही टिप्स दिल्या. त्यामध्ये त्यांनी असं सांगितले होते की, आई तुम्हाला जेवण भरवते, तुम्ही जेवला नाही तर तुमच्या मागे फिरून ती घास भरवते. तुम्हाला शाळेत सोडायला येते, शाळेत येताना तुमचा डबा भरते इतकच नव्हे तर तुम्ही सकाळी लवकर उठला नाहीत तर पाठीत धपाटा घालून उठवते, अभ्यास केला नाही तर तुम्हाला ओरडते या गोष्टी लिहा. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी शिक्षकांनी दिलेल्या टिप्स वापरून निबंध लिहिला पण मी मात्र त्या टिप्समधली एकही गोष्ट आईसाठी लिहिली नाही कारण आई माझ्यासाठी त्यापैकी एकही गोष्ट करायला घरीच नसायची. कधीकधी शूटिंगमधून एक दिवसाची सुट्टी घेऊन ती घरी यायची, मग त्या एक दिवसात आम्ही फक्त खेळायचो. तिने मला सकाळी उठवायचा क्षण खूप कमीवेळा यायचा कारण मी झोपलेलो असताना माझी पापी घेऊन ती शूटिंगसाठी जायची. घरी असली की मीच शाळेला दांडी मारयचो त्यामुळे ती मला शाळेत सोडायला यायचा प्रश्नच यायचा नाही. घरातून विमानतळावर जाताना ती मला सोबत न्यायची आणि त्या तासाभराच्या प्रवासातच आईने मला अनेकदा गोष्ट सांगितली आहे, त्यामुळे झोपताना तिच्याकडून गोष्ट ऐकण्यापेक्षा मी तिच्याकडून अशाप्रकारे गोष्टी ऐकल्या आहेत. हे सगळं मी माझी आई या निबंधात लिहिलं. आई मला नेहमी म्हणायची, मी तुला किती वेळ देते यापेक्षा तो वेळ आपण कसा आनंदात घालवतोय हे महत्त्वाचं. त्यामुळेच मी कधी आईकडून मला मिळालेल्या वेळेबाबत लहानपणी कधीच तक्रार केली नव्हती. निबंध लिहितानाही माझ्या तक्रारीचा सूर नव्हता तर माझ्या आईच्या कामाचा मला अभिमान वाटायचा. आपली आई मला वेळ न देता कुठे जाते याविषयी माझ्या मनात प्रश्न येऊ नयेत म्हणून ती मला शूटिंगच्या ठिकाणी घेऊनही जायची. एकेका शॉटसाठी सगळेजण किती मेहनत घेतात हे तिने मला दाखवले आहे. हे सगळं माझ्या निबंधात मी लिहिलं होतं, त्यामुळेच माझा निबंध वेगळा तर ठरला.

विराजस आणि मृणाल यांचे बॉंडिंग संपूर्ण मनोरंजन इंडस्ट्रीला माहिती आहे. मायलेकाच्या खूप कमी जोड्या मनोरंजन क्षेत्रात यशस्वी आहेत. मृणाल यांनी एका लघुपटातही काम केलं आहे ज्याचे लेखन व दिग्दर्शन विराजसने केलं असून त्याचा अभिमान वाटत असल्याचंही मृणाल नेहमी सांगतात. विराजसने माझी आई हा निबंध लिहिताना शिक्षकांनी दिलेला साचा न वापरता त्याचे खरे अनुभव लिहिले आणि तो निबंध वेगळा ठरला तो या मायलेकांच्या केमिस्ट्रीमुळेच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button