म्हणून महादेवी वर्मा यांची ओळख आधुनिक मीरा अशी आहे!

Mahadevi Verma - Maharastra Today

साहित्य जगतात महादेवी वर्मा यांनी स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं. गद्य आणि पद्य या दोन्ही साहित्य प्रकारात त्यांची मजबूत पकड होती. त्यांनी दोन्ही प्रकारात अनेक संवेदनशील कथा, कविता लिहल्या. त्यांच्या प्रत्येक रचनेत विरह आणि समाजातल्या शोषित घटकांचा आवाज जाणवायचा. समाजातल्या शोषित घटकाचा आवाज त्यांच्या साहित्यातून उमटतो. महिलांसोबत होणाऱ्या सामाजिक भेदभावाविरुद्ध त्यांनी लढाई लढली. साहित्य विषयक सामाजिक बंधनांना त्यांनी कधीच जुमानलं नाही, म्हणून त्यांची ओळख आज घडीला आधुनिक मीरा या नावानं केली जाते.

साखळदंडाच्या युगातला जन्म

१९२० हे दशक भारतीय महिलांसाठी परिवर्तनाच दशक होतं. या आधी महिलांना भारतीय समाजात स्वातंत्र्य नव्हतं. त्या जन्म घ्यायच्या. काम करायच्या. मोठ्या व्हायच्या आणि काम करत करत मरुन जायच्या. तेच त्यांचं जग असायचं. महादेवी वर्मा अशाच वातावरणात लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचा जन्म २६मार्च १९०७ ला उत्तर प्रदेशातल्या फारुखाबादमध्ये झाला. भारतात स्वातंत्र्याची भावना उग्र होण्याचा तो काळ होता. हर तऱ्हेच्या शोषणापासून मुक्त होण्यासाठी मुक्तीचे बिगूल वाजायला सुरुवात झाली होती.

साहित्य क्षेत्रात प्रेमचंद, टागोर, शरदचंद्र असे नामी लेखक भारतात स्वतःच्या नावाचा प्रभाव निर्माण करत होते. या प्रभावाचा वापर त्याना समाज सुधारणेसाठी करायचा होता. पितृसत्तेवर प्रश्न उठायला सुरुवात झाली होती. याआधी भारतात भक्ती परंपरा सुरु झाली तेव्हा स्त्रीमुक्तीची गाणी गायली गेली होती. यात प्रभावी भूमिका मीराबाईची होती. मीरा कृष्णाची भक्त होती. ती कृष्णाची उपासना करायची. स्त्री स्वातंत्र्य नाकारणाऱ्या व्यवस्थेरवर तिनं प्रश्नचिन्ह निर्माण केलं होते. मीरेचा हाच वसा आणि वारसा पुढं महादेवी वर्मांनी चालवला. त्यांचा अनेक कविता रहस्यमयी आहेत तर अनेक कवितांमध्ये स्त्री मुक्तीचा हुंकार ऐकू येतो.

महादेवी वर्मा यांचा कालखंड विद्रोहाचा कालखंड होता. त्यावेळचा तो आदर्शवाद होता. साम्राज्यवादी आणि सामंतवादी शक्तींशी चाललेल्या संघर्षाचा तो काळ होता. महादेवी वर्मा स्वतःला या युगात एका कैद्यासारख्या पाहत होत्या. त्यामुळं त्यांच्या रचनांमध्ये अनेकदा बंदिनी हा शब्द आढळतो. त्यांच एकमेव ध्येय होतं बंदीवासातून स्वतःची सुटका करवून घेणं. त्यांना त्यांच्या सारख्या अनेक महिलांना स्वतंत्र झालेलं पाहयचं होतं. त्यांनी वेद आणि उपनिषदांच्या अनुवादाचं ही काम केलं. पण त्यांच साहित्यिक काम मोठं आणि व्यापक होतं. सामंतवादी विचारसरणीत भरडल्या जाणाऱ्या स्त्रीयांचा दाह आणि त्यांचा ओठावर कधीनं उमटलेल्या आक्रोशाला महादेवी वर्मांनी आवाज दिला.

स्त्री उत्थानासाठी कटिबद्ध

महादेवी वर्मांच्या जीवनाचं ध्येय स्त्री मुक्ती हे होतं. त्यांनी फक्त या विषयावर कविता लिहल्या नाहीत तर प्रत्यक्षात काम ही केलं. याच कार्याला मुर्त स्वरुप देत त्यांनी ‘मनीला पीठ’ नावाच्या महिला विद्यालायाला सुरुवात केली. या संस्थेचं एकमेव उद्देश महिला सबलीकरण हे होतं. त्यांच्या शिक्षण संस्थेत येणाऱ्या स्त्रीया शिक्षण घ्यायच्या. ज्या महिला घराचा उंबरा ओलांडून शाळेपर्यंत येऊ शकत नव्हत्या त्यांना शाळेत येणाऱ्या महिला घरात जाऊन शिकवायच्या. या सर्व महिला महादेवी वर्मांना ‘बडी गुरुजी’ नावानं हाक मारायच्या. महिलांना स्वतः प्रमाण बनवणं त्यांच लक्ष्य होतं. त्यांना महिलांना बंडखोर बनवायचं होतं.

उत्तर प्रदेशच्या हिंदी साहित्य सेवा संस्थेने त्यांचा सन्मान ७० च्या दशकात १ लाख रुपये देऊन करण्याचं ठरवलं होतं. त्यांना हा पुरस्कार इंदिरा गांधींच्या हातून मिळाला. तर साहित्यातला सर्वोकृष्ठ ज्ञानपीठ पुरस्कार इंग्लंडच्या प्रधानमंत्री मार्गेट थॅचर यांच्या हस्ते १९८२ साली मिळाला. आधुनिक मीरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महादेवी वर्मा यांनी ११ सप्टेंबर १९८७ ला जगाचा निरोप घेतला.

त्यांची एक हिंदी कविता.
जो तुम आ जाते एक बार ।

कितनी करूणा कितने संदेश
पथ में बिछ जाते बन पराग
गाता प्राणों का तार तार
अनुराग भरा उन्माद राग
आँसू लेते वे पथ पखार
जो तुम आ जाते एक बार ।

हंस उठते पल में आद्र नयन
धुल जाता होठों से विषाद
छा जाता जीवन में बसंत
लुट जाता चिर संचित विराग
आँखें देतीं सर्वस्व वार
जो तुम आ जाते एक बार ।

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER