म्हणून लारा दत्ताने अक्षयसोबत साईन केला बेल बॉटम

Maharashtra Today

बॉलिवूडमध्ये नायिकांचे करिअर लवकर संपते. ज्या अभिनेत्यासोबत या नायिकांनी काम करण्यास सुरुवात केलेली असते ते या नायिका सिनेमातून बाहेर फेकल्या गेल्या तरीही नायकाची भूमिका करताना दिसतात. आणि त्यांच्या नव्या नायिका या तरुण मुली असतात. नायिकांची नवी पिढी येत असल्याने जुन्या नायिकांना लवकर रिटायर व्हावे लागते. त्यांनी सिनेमात काम करायचे म्हटले तरी त्यांना कॅरेक्टर रोल ऑफर केले जातात. आणि काम हवे असल्याने त्या नायिका अशी कामे करण्यास तयारही होतात. लारा दत्ताच्या (Lara Dutta) बाबतही असेच घडत आहे. लारा दत्ताने ‘अंदाज’ सिनेमात अक्षयकुमारच्या (Akshay Kumar) नायिकेची भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. अक्षय आजही मुख्य नायकाच्या भूमिका करीत आहे तर लारा दत्ताकडे सिनेमे नाहीत. मात्र लारा आणि अक्षय बऱ्याच काळानंतर पुन्हा एकत्र येत असले तरी या सिनेमात लारा त्याची नायिका नाही. हा सिनेमा अक्षयमुळे साईन केला असे लाराने नुकतेच पत्रकारांशी (Lara Dutta signed Bell Bottom with Akshay) बोलताना सांगितले.

लाराने २००३ मध्ये ‘अंदाज’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच सिनेमात तिने बेस्ट डेब्यू हीरोईनचा पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर ‘मस्ती’, ‘भागमभाग’, ‘नो एंट्री’, ‘पार्टनर’, ‘बिल्लू बार्बर’ असे काही सिनेमे केले. नंतर सिनेमे मिळणे कमी झाल्यानंतर तिने प्रख्यात टेनिसपटू महेश भूपतीसोबत (Mahesh Bhupathi) लग्न केले. त्यानंतर एका मुलाची आई झाल्यानंतर तिने बराच काळ बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता. २०१६ मध्ये आलेल्या ‘अझहर’ सिनेमात ती वकिलाच्या भूमिकेत दिसली होती. हा तिचा शेवटचा सिनेमा होता. त्यानंतर गेल्या वर्षी तिनेही ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘हंड्रेड’ वेबसीरीजमधून एंट्री केली होती. आणि आता ती अक्षयकुमार सोबत ‘बेल बॉटम’मध्ये दिसणार आहे. लाराने सांगितले, ‘बेल बॉटम मोठ्या बजेटचा कमर्शियल सिनेमा आहे. अक्षयने मला या सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. करिअरच्या या टप्प्यावर माझी भूमिका किती मोठी आहे यापेक्षा ती वेगळी आणि चांगली असणे महत्वाचे आहे. प्रेक्षकांनी मला फक्त ग्लॅमरस भूमिकेतच बघितले आहे. त्यामुळेच मी कॉमेडी करण्यास सुरुवात केली होती आणि आता वेगळ्या भूमिका करीत आहे. ‘बेलबॉटम’ एक स्पाय सिनेमा असून त्याची कथा ८० च्या दशकातील आहे. अक्षय कुमार सिक्रेट एजंट असून माझी वेगळी भूमिका आहे. माझी भूमिका काय आहे ते तुम्ही सिनेमातच बघा असेही लारा म्हणाली.

‘बेलबॉटम’ याच वर्षी २८ मे रोजी रिलीज होणार आहे. सिनेमात अक्षयच्या नायिकेच्या रुपात वाणी कपूर दिसणार आहे. लाराची भूमिका ती म्हणते तशी खरोखरच वेगळी आहे का हे सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल. तोपर्यंत लाराच्या शब्दावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER