…तर मी हॉलिवूडमध्ये दिग्दर्शिका होणार होते -कंगना रनौत

Kangana Ranaut

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) गेल्या एक-दीड वर्षांपासून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती अशा काही पोस्ट करते ज्यामुळे वाद निर्माण होतात. समाजातील प्रत्येक गोष्टीवर ती प्रतिक्रिया देत असते. यातही बॉलिवूडमधील काही कलाकार तिच्या टार्गेटवर असतात.

मात्र असे असले तरी ती केवळ सोशल मीडियावरील पोस्टमुळेच चर्चेत आहे असे नाही तर ती एक चांगली अभिनेत्रीही आहे. आणि तिने काही सिनेमात हे सिद्धही करून दाखवले आहे. अगदी ‘क्वीन’पासून ते ‘मणिकर्णिका’पर्यंत तिने हे सिद्ध केले आहे. अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. आताही ती अशाच नायिकाप्रधान सिनेमातही दिसणार आहे. पण कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट करीत, काही काळापूर्वी अभिनय सोडून हॉलिवूडमध्ये जाऊन दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरणार असल्याचे म्हटले आहे.

कंगनाच्या ‘क्वीन’ सिनेमाला सात वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने या सिनेमाबाबत बोलताना कंगनाने ही माहिती दिली आहे. कंगनाने म्हटले आहे, ‘जवळ जवळ दशकभराच्या संघर्षानंतर ब़ॉलिवूडला जशी हवी तशी एक चांगली अभिनेत्री असल्याचे माझ्याबाबत म्हटले गेले. ‘क्वीन’ सिनेमा मी जेव्हा साईन केला तेव्हा हा सिनेमा रिलीज होणारच नाही असे मला वाटत होते. केवळ पैशांसाठी मी तो सिनेमा केला होता. सिनेमा साईन करून जे पैसे मिळाले त्या पैशात न्यूयॉर्कमधील फिल्म स्कूलमध्ये मी प्रवेश केला. न्यूयॉर्कमध्ये स्क्रीनरायटिंगचा अभ्यास केला. 24 वर्षांची असताना कॅलिफोर्नियात मी एका छोट्या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. तो सिनेमा पाहून हॉलिवूडमध्ये मला ब्रेक मिळाला. माझे त्या सिनेमाचे काम पाहून एका मोठ्या एजंसीने मला एका सिनेमाचे दिग्दर्शन करण्यासाठी साईन केले. मीसुद्धा अभिनय सोडून दिग्दर्शनच करण्याचा विचार सुरु केला. भारतात परतायची हिंमत होत नव्हती. लॉस एंजेलिसमध्ये मी एक छोटे घरही खरेदी केले होते. याच दरम्यान ‘क्वीन’ रिलीज झाला आणि माझे आयुष्यच बदलले. सिनेमा हिट झाला आणि माझ्याकडे काही सिनेमांच्या ऑफर आल्या. तेव्हा मात्र मी मुंबईला परत आले. ‘क्वीन’ माझ्यासाठी फक्त सिनेमा नाही तर माझ्यासाठी एक धमाका होता. मला पूर्ण विश्वास आहे की, तुमच्या नशिबात जे असेल ते होतेच. त्याला कोणीही हिसकावू शकत नाही असेही कंगनाने पोस्टमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER