मराठा आरक्षणासाठी फडणवीसांच्या हातात सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो – उदयनराजे

Udyanraje Bhosale-Devendra Fadnavis

सातारा :- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती दिल्यानंतर राज्याचे वातावरण चांगलेच तापू लागलेले आहे. राज्य सरकारच्यावतीने कुठल्याही हालचाली होत नसल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. आता या वादात थेट राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी उडी घेतली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मराठा समाजाचं आरक्षण हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलं. यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत. तेच नेते आता सत्तेत आहेत. अजून किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहणार आहात, असा सवाल उपस्थित करून त्यांनी पवारांवर निशाणा साधला.

यावेळी उदयनराजे म्हणाले की, मी मराठा म्हणून जन्माला आलो असलो तरी मराठा म्हणून बोलत नाही. शिवाजी महाराजांच्या विचारांचा आधार घेऊन, प्रत्येक समाजाला न्याय मिळायला हवा या भूमिकेतून आज मुद्दे मांडत आहे. आपल्या आधीची जी पिढी राजकारणात आहे त्यांना मला प्रश्न वाचारायचा आहे की, तुम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित का ठेवला? हा प्रश्न त्यांनी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला आहे. मराठा समाजानंही तुम्हाला मतदान केलं आहे. त्यामुळे अन्य समाजाच्या आमदार-खासदारांचीही जबाबदारी असून, त्यांनीसुद्धा मराठा आरक्षणासाठी आवाज उठवण्याची गरज आहे. अजून किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहणार आहे? आपली पुढची पिढी आपल्याला जाब विचारेल तेव्हा शरमेने मान खाली घालावी लागेल. या नेत्यांनी याचं उत्तर द्यावं; कारण आजही तेच सत्तेत आहेत.

शरद पवार यांचं नाव न घेता सूचकपणे टीका करताना उदयनराजे म्हणाले, मंडल आयोग लागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही? विश्वासघात झाला तर लोक तुम्हाला खाली खेचतील. तुमची इच्छा असेल तर हो म्हणा, नाही तर लोक तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाहीत. क्रियेला प्रतिक्रिया झाली तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल. आता कोरोनाचा (Corona) काळ आहे म्हणून लोक घरात आहेत. जातीचं राजकारण कधीपर्यंत करणार? समस्यांवर राजकारण करणार आहात की नाही?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा आरक्षणासाठी काम केलं तरीही आपण त्यांनाच नावं ठेवतो. जातीचं राजकारण करायचं असेल तर घरी बसा. देवेंद्र फडणवीस जे आपल्याच पिढीतले आहेत त्यांनी मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. मग आता तुम्ही सत्तेत आहात ना, तर मग ते करून दाखवा, अशा शब्दांत त्यांनी फडणवीस यांची पाठराखण केली. तसेच ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो.’ अशा शब्दांत उदयनराजे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

ही बातमी पण वाचा : पवार मातब्बर नेते, पक्षवाढीसाठी काय करावे याची त्यांना संपूर्ण माहिती – देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER