म्हणून चिरंजीवीने सोनू सूदला मारण्यास नकार दिला

Chiranjeevi - Sonu Sood

कोरोना (Corona) काळात सोनू सूदने (Sonu Sood) सुरुवातीला महाराष्ट्रातील श्रमिकांना महाराष्ट्राबाहेरील त्यांच्या घरी जाण्यास मदत केली. त्यांच्यासाठी बस, ट्रेन आणि कधी कधी तर विमानाचीही सोय करून दिली. त्यानंतर सोनूला देशभरातून लोकांचे मदतीसाठी मेसेज येऊ लागले. आणि सोनूने देशभरातील नागरिकांना त्यांच्या संकट काळात मदत करण्यास सुरुवात केली. पडद्यावरचा हा खलनायक वास्तव जीवनात मात्र खराखुरा नायक ठरला. सोनूला देव मानणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून त्याचे मंदिरही बांधण्यात आले आणि त्याच्यावर आरतीही रचण्यात आली आहे. सोनूने मदत केलेल्यांनी नवा व्यवसाय सुरु करताना त्याला सोनूचेच नाव दिले आहे. त्यामुळे देशभरातील जनतेच्या मनात सोनूबाबत एक आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. सोनूच्या या कार्याची दखल घेत, लंडनमधील साप्ताहिक ईस्टन आयने आशियातील टॉप 50 सेलिब्रिटींच्या यादीत सोनू सूदला पहिला क्रमांक दिला होता. काही दिवसांपूर्वी मुंबईत एका मर्सिडीज चालकाने दुचाकीस धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील 19 वर्षीय सतीश गुप्ता नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच सोनूने त्या मृत तरुणाच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि त्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. सोनूच्या या इमेजमुळेच त्याला पडद्यावर मारण्यास चिरंजीवीने (Chiranjeevi) नकार दिला आहे.

सोनू सूद साऊथचा मेगास्टार अभिनेता चिरंजीवीसोबत ‘आचार्य’ नावाचा एक सिनेमा करीत आहे. या सिनेमात सोनू सूद नेहमीप्रमाणे खलनायकाची भूमिका साकारीत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचे हैदराबादमध्ये शूटिंग झाले. यात चिरंजीवी सोनू सूदला मारतो. त्यानंतर खाली पाडून त्याच्या डोक्यावर पाय ठेवतो असा सीन होता. मात्र शूटिंगच्या वेळी चिरंजीवीने सोनू सूदला मारण्यास नकार दिला. चिरंजीवी म्हणाला, देशभरातील लोकांमध्ये सोनू सूदची प्रतिमा चांगली आहे. मी त्याला मारलेले प्रेक्षकांना आवडणार नाही. मी जर सोनूला मारहाण केली तर प्रेक्षक मला नावे ठेवतील आणि माझ्या इमेजलाही धक्का बसेल. त्यामुळे तो सीन वेगळ्या पद्धतीने शूट करण्यात आला. एवढेच नव्हे तर सोनू सूदच्या डोक्यावर चिरंजीवी पाय ठेवतो हे शूट केलेले दृश्यही पुन्या नव्याने बदलून शूट करण्यात आले.

दुसरीकडे निर्मातेही आता सोनूला नायकाच्या भूमिका ऑफर करू लागले असून सोनूनेही निगेटिव्ह भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER