… म्हणून सगळे आरक्षणच रद्द करून टाका – उदयनराजे

udayan raje

सोलापूर :- आरक्षणामुळे लोकशाही संपुष्टात येत आहे. सगळे आरक्षणच रद्द करून टाका. उगाच शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सर्वधर्मसमभावाची शिकवण देऊ नका, अशा शब्दांत  खासदार उदयनराजे भोसले आरक्षणाच्या मुद्यावरून संतापले. सोलापूर येथे सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी चर्चा केली.

ही बातमी पण वाचा : राजेशाही असती तर केव्हाच दुष्काळावर निर्णय घेऊ शकलो असतो – उदयनराजे

यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून त्यांचे मत नोंदवले. धनगर, लिंंगायत, मराठा, मुस्लिम समाजातील नागरिकांना आरक्षण लागू करा, अन्यथा सर्वांचे रद्द करा. आरक्षणामुळे जाती-धर्मात भांडणे लागली आहेत. त्यामुळे प्रत्येक धर्मातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या व्यक्तींना आरक्षण लागू करा, अशी मागणीदेखील साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली. अन्यथा आरक्षणच रद्द करून टाका, असा आक्रमक सल्लाही त्यांनी दिला.

ईव्हीएमवर बोलताना म्हणाले, लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर ईव्हीएम तोडा आणि माणसे जोडा, असे आवाहन उदयनराजे यांनी केले. तुम्ही ईव्हीएमवर झालेल्या मतदानातून निवडून आलात, तरीही त्यावर संशय घेताय, असे विचारले असता उदयनराजे म्हणाले, माझं ठाम मत आहे की निवडून येणं महत्त्वाचं नाही. मी यापूर्वीचा पराभव पचवला आहे. पण यावेळी माझ्या मताधिक्यात दोन-सव्वा दोन लाखांनी घट झाली. सोलापुरातही ज्यांच्या जाहीर सभांना गर्दी झाली ते पराभूत झाले. ज्यांना कोण ओळखत नाही, असे लोक निवडून आले. सगळीकडे दोन-अडीच लाखांचा फरक आहे. फेरनिवडणूक व्हावी, अशी माझी मागणी आहे.