…तर लॉकडाऊनबाबत भाजप सकारात्मक विचार करेल, प्रवीण दरेकर यांचे स्पष्टीकरण

Praveen Darekar

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Crises) प्रचंड प्रमाणात वाढत चालला आहे. विविध शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येचा आलेख चढतच चालला आहे. अशावेळी कडक निर्बंध लावूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. त्याबाबत उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Praveen Darekar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली.

आज एमपीएससी परीक्षेबाबत बैठक बोलावण्यात आली होती. पण या बैठकीत लॉकडाऊनबाबत (Corona Lockdown) चर्चा सुरु झाली. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अन्य पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्याशिवाय हा निर्णय घेतला जाऊ शकत नाही. तसंच हातावर पोट असलेली गोरगरीब जनता, व्यापारी, छोटे व्यवसायिक यांच्यासाठी सरकारने ठोस भूमिका घेतल्यास लॉकडाऊनच्या निर्णयाला भाजप सकारात्मक प्रतिसाद देईल, असं दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

प्रविण दरेकर यांनी राज्यपालांची भेट घेत राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध आणि लॉकडाऊन लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पण आधीच संकटात सापडलेला व्यापारी, छोटे व्यवयासिक देशोधडीला लागतील. त्यांच्यासाठी राज्य सरकारने काही ठोस भूमिका घ्यायला हवी. हातावर पोट असणाऱ्यांसाठी राज्य सरकारने पॅकेज जाहीर करावं. त्यांच्या खात्यावर प्रत्येकी ५ हजार रुपये टाकावे, अशी मागणी यावेळी प्रविण दरेकरांनी केली.

राज्यात कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहे. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे कोरोना लसीबाबत पाठपुरावा करावा. महाराष्ट्राला कोरोना लसीचा जास्तीचा साठा मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे, अशी विनंती आपण राज्यपालांकडे केल्याचं दरेकरांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस हे देखील केंद्रीय आरोग्य विभागाच्या सातत्याने संपर्कात आहेत. मात्र, राज्य सरकारमधील काही लोक लसीचं राजकारण करत असल्याचा आरोप दरेकरांनी यावेळी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button