
आयुर्वेदात इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने औषधी निर्माण सांगितले आहेत ते इतर कोणत्याच शास्त्रात सांगितलेले नाही. वटीगुटी स्वरस काढे आसव अरिष्ट चूर्ण रसौषधी तैल घृत निर्माण अवलेह मलम लेप असे विविध पद्धतीने औषध निर्माण आयुर्वेदात आहेत. हे कशा पद्धतीने कोणते द्रव्य वापरायचे किती प्रमाणात घ्यायचे याचे विस्तृत वर्णन आचार्यांनी केले आहे. हे औषध निर्माण त्या पद्धतीने केले तर फायदा नक्कीच होतो. व्याधी चिकित्सा करतांना आयुर्वेदतज्ज्ञ औषधी निर्माण करण्यावर भर देतच असतो. त्यापैकी एक आहे हिम फाण्ट निर्माण. सरबताप्रमाणे बनविण्यात येणारे हे कल्प ऋतुनुसार व्याधीनुसार देखील वापरता येतात.
बघूया त्यापैकी घरच्या घरी करता येणाऱ्या उपयुक्त कल्पना !
धान्यक हिम – हिम या शब्दावरूनच लक्षात येते हे थंड करणारे पेय आहे. हिम कसे बनवावे तर १० ग्रॅम धणे जाडसर बारीक करून ६ पट म्हणजेच ६० मिली पाण्यात मातीच्या भांड्यात रात्रभर भिजवावे. सकाळी नरम झालेले धणे भरड हाताने कुस्करून पाणी गाळून घ्यावे. यात थोडी मिश्री ( खडी साखर) घालून दिवसातून 3 वेळा घ्यावे. थंडावा आणणारे हे पेय शरीरातील उष्णता, जळजळ कमी करणारे, मूत्रदाह कमी करणारे, लघवीची आग होणे लघवी कमी होणे हे त्रास दूर करणारे आहे. ज्यांना वारंवार तहान लागते पाणी पिऊनही समाधान होत नाही तोंड कोरडे पडते अशा सर्वच तक्रारींवर उत्तम उपाय आहे धान्यक हिम.
खर्जुरादि मंथ – खजूर डाळींबदाणे काळ्यामनुका आवळा फालसा पिकलेली चिंच यांना सम मात्रेत एकत्र करून ४ पट पाण्यात भिजत टाकावे. सर्व द्रव्य मऊ झाल्यावर छान घसळून घ्यावे व गाळून घ्यावे. पाण्याचे प्रमाण थोडे वाढवू शकता. हे आंबट गोड चवीचे सरबत अतिमद्यपानाच्या सर्व तक्रारींना दूर करते. शरीरातील उष्णता दूर करणारे आहे. तसेच आजारामुळे, अतिश्रमाने उन्हामुळे आलेला अशक्तपणा दूर करणारे आहे. पित्तज्वरात याचा खूप फायदा होतो.
लाजमण्ड – साळीच्या लाह्या १४ पट गरम पाण्यात भिजवून ठेवाव्या. थंड झाल्यावर त्यात सैंधव सुंठ घालून प्यावे. अतिसार झाल्यास हे मण्ड अतिसार कमी करणारे ताकद देणारे पेय आहे. ताप कमी करणारे, तहान भागविणारे तसेच कफपित्त व्याधींमधे उत्तम कार्य करणारे आहे. भूक वाढविणारे तसेच पाचन करणारे लाजामण्ड आहे.
अशाच काही औषधी कल्पना पुढील लेखात बघूया.
क्रमशः
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला