विजयाकडून पराभवाकडे; हैदराबादने केला उलटा प्रवास

Snatching defeat from jaws of victory, hyderabad style.jpg

29 चेंडू शिल्लक, 8 फलंदाज बाकी आणि विजयासाठी हव्यात 43 धावा, अशात आयपीएलसारख्या (IPL) उच्च दर्जाच्या व्यावसायिक स्पर्धेचा सामना कुणी जिंकेल की हरेल…जिंकेल असेच वाटणे स्वाभाविक आहे पण अशा स्थितीतूनही सामना कसा हरावा याचे प्रात्यक्षिकच काल डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) हैदराबाद (SRH) संघाने दाखवून दिले. पुढच्या 26 चेंडूत फक्त 32 धावांची भर घालून त्यांनी आठ गडी गमावले आणि रॉयल चॕलेंजर्स बंगलोरला (RCB) 10 धावांनी विजय बहाल केला.

2016 नंतर प्रथमच बंगलोरची आयपीएलच्या अभियानाची विजयी सुरुवात झाली. त्यावेळीसुध्दा त्यांनी सनरायजर्सलाच मात दिली होती. सोमवारच्या सामन्याला कलाटणी मिळाली ती डावातील 16 व्या षटकात.

युझवेंद्र चहलचे (Yuzvendra Chahal) हे शेवटचे षटक होते आणि 15.1 षटकात 2 बाद 121 असा सनरायजर्सचा संघ सुस्थितीत होता. चार-चार जीवदानांसह 61 धावा करुन स्थिरावलेला जॉनी बेयरस्टोसारखा फलंदाज खेळपट्टीवर होता. पण काय दुर्बुध्दी झाली कुणास ठाऊक…

बेयरस्टोला पुढे सरसावुन चेंडू उंच फटकारण्याचा मोह झाला, तो फसला आणि दांडी उडाली. दोनच चेंडूनंतर चहलने एका अप्रतिम गुगलीवर विजय शंकरचाही त्रिफळा उडवला आणि हैदराबादची फलंदाजी फळी संपली. नंतर फलंदाज येत गेले,आणि बाद होत गेले. 16, 17 व 18 व्या षटकात दोन-दोन फलंदाज बाद झाले. अवस्था एवढी वाईट की, मिशेल मार्शला जायबंदी असल्यानंतरही फलंदाजीला उतरावे लागलेतरीसुध्दा हैदराबादचा संघ पूर्ण षटके खेळुन काढू शकला नाही. दोन चेंडू शिल्लक असताना डाव 153 धावांत आटोपला.

जाॕनी बेयरस्टो 61, मनिष पांडे 34 व प्रियम गर्ग 12 हे तिघेच दोन आकडी धावा करु शकले. डेव्हिड वॉर्नरसह इतर सर्व फलंदाज एकेरी धावात बाद झाले आणि हैदराबादची टॉप आर्डर वगळता फलंदाजी ठिसूळ आहे हे दिसून आले. फलंदाजीबाबत हीच गोष्ट बंगलोरलाही लागू होती.

त्याआधी, हैदराबादच्या गोलंदाजांनी कोहली, फिंच, डिविलियर्ससारख्या स्फोटक फलंदाजांचा भरणा राहिलेल्या बंगलोरच्या धावसंख्येला वेसण घालण्यात यश मिळवले होते. पाॕवर प्लेमध्येच त्यांनी 53 धावा केल्या होत्या आणि पदार्पणातच अर्धशतक झळकावणारा देवदत्त पडक्कल व आरोन फिंच यांनी 66 चेंडूत 90 धावांची सलामी दिली होती. त्यामुळे बंगलोर 180 च्यावर धावा करेल हे अपेक्षित होते पण डीविलीयर्स (30 चेंडूत 51) वगळता त्यांचेही नंतरचे फलंदाज धावगती वाढविण्यात अपयशी ठरले.

मधल्या काळात चार षटकात ते एकदाही चेंडू सीमापार करु शकले नव्हते. भुवनेश्वर कुमार (4 षटकात 25धावा), राशिद खान (4 षटकात 31 धावा) आणि टी. नटराजन (4 षटकात 34 धावा एक बळी) यांनी फलंदाजांना जखडून ठेवले.

देवदत्त पडक्कलने पदार्पणातच 42 चेंडूत 56 धावांची खेळी करुन लक्ष वेधुन घेतले. आपल्या आतापर्यंतच्या प्रत्येक मर्यादीत षटकांच्या स्पर्धेसह रणजी सामन्यातही अर्धशतकासह सुरुवात करण्याचा लौकिक त्याने कायम ठेवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER