स्मिता तांबेला आठवला तिचा वेडिंग वीक

Smita Tambe

गेल्या काही दिवसात जर आपण पाहिलं तर सेलिब्रिटी जगतातील अनेक कलाकारांचे दोनाचे चार हात होत आहेत. अनेकांनी बर्‍याच दिवसांच्या रिलेशनशीपनंतर लग्नाचा निर्णय घेत बँड वाजवला आहे. त्यापैकी अनेकांनी पहिल्या लग्नात आलेले कटू अनुभव विसरून दुसरा संसार सुरु केला आहे. त्यामुळे सध्या सेलिब्रिटी जगतामध्ये लग्नाचे ढोल वाजत असताना अभिनेत्री स्मिता तांबे हिलासुद्धा तिच्या लग्नाच्या काही गोष्टी आठवल्या. तिने एका मुलाखतीमध्ये या सगळ्या आठवणी शेअर करत तिचे लग्न कसे आठ दिवस सुरू होते त्याची धमाल-मस्ती चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेमध्ये सध्या मम्मी ही व्यक्तिरेखा साकारत असलेली अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe) तिने धीरेंद्र त्रिवेदी या बुंदेलखंडी मुलाशी गेल्या वर्षी लग्न केले आहे. धीरेंद्र नाट्य क्षेत्रामध्ये अभिनेता म्हणून कार्यरत आहे. तो चांगला चित्रकारही आहे. एका हिंदी मालिकेच्या निमित्ताने स्मिता आणि धीरेंद्र यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्या प्रेमाचं रूपांतर लग्नामध्ये झालं.

स्मिता तांबे ही जन्माने जरी साताऱ्याची असली तरी तिचं सगळं बालपण आणि शिक्षण हे पुण्यात झाले आहे. अस्सल महाराष्ट्रीयन वातावरणात स्मिता वाढलेली आहे. तर तिच्या सासरचं घर हे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर असलेल्या बुंदेलखंडमध्ये आहे. स्मिता आणि धीरेंद्र यांनी जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यामध्ये असलेल्या भाषेचा, एकमेकांच्या घरातील वेगळ्या वातावरणाचा, खाण्याच्या सवयीचा होता.

स्मिता सांगते की, जेव्हा मी लग्न करायचे ठरवले तेव्हा आणि सगळ्यात आधी याच मुद्द्यावर चर्चा केली की आपल्या दोघांच्या कौटुंबिक संस्कृतीमध्ये जो फरक आहे तो कसा भरून काढायचा? यासाठी आपण दोघांनी कशा पद्धतीने तडजोडी केल्या पाहिजेत. यावर जर आपल्या दोघांचे एकमत होत असेल तरच आपण एकमेकांसोबत सहजीवन यशस्वी करू शकतो.

अर्थात स्मिता आणि धीरेंद्र ही दोघं अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे त्या दोघांचे सूर जूळले होते. त्यामुळे एकमेकांच्या कौटुंबिक आणि सांस्कृतिक फरकाचे पूल जोडत आपल्याला संसार करायचा आहे दोघांनी पक्कं ठरवलं होतं. स्मिता महाराष्ट्रीयन आणि धीरेंद्र बुंदेलखंडी असल्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न होता तो लग्न कोणत्या पद्धतीने करायचं. सुरुवातीला तर मुंबईत लग्न करायचं या मतावर स्मिता आणि धीरेंद्र ठाम होते. मग त्यावेळी दोघांनी ठरवले की, लग्न हे दाक्षिणात्य पद्धतीने करायचे. त्याची मजा सांगताना स्मिता म्हणते, आमच्या महाराष्ट्रीयन लोकांना असं वाटलं की ही पद्धत बुंदेलखंडी भागातील असेल. आणि बुंदेलखंडी असलेल्या माझ्या सासरच्या लोकांना वाटलं की ही मराठी पद्धत आहे. त्यामुळे आम्हा दोघांचेही कुटुंबीयानी आमच्या लग्नात खूप छान एन्जॉय केलं. पण मी जेव्हा बुंदेलखंडला सासरी गेले तेव्हा तिकडचे काही मोजकेच लोक मुंबईतल्या लग्नाला आल्यामुळे पुन्हा एकदा माझ्या लग्नाचा घाट घातला गेला.

माझ्या सासरच्या लोकांनी प्रचंड उत्साहाने माझ्या आणि धीरेन्द्रचे पुन्हा एकदा लग्न लावले. त्यामुळे मला परत हळद लागली.माझे परत सगळे विवाह विधी झाले. बुंदेलखंडी प्रथेप्रमाणे सगळ्या पदार्थांची रेलचेलदेखील माझ्या लग्नात होती आणि हे लग्न आठ दिवस सुरू होतं. लग्नाच्या मुख्य दिवशी बुंदेलखंड मध्ये एका भल्या मोठ्या मैदानावर 100 खाण्याचे स्टॉल लागले होते. यामध्ये वेगवेगळे पदार्थ होते. मी माझ्या सासूबाईंना विचारलं होतं की इतके सगळे स्टॉल आहेत आणि जर पाहुण्यानी जास्त खाल्ले नाही तर हे सगळं जेवण वाया जाईल. तेव्हा मला माझ्या सासुबाई म्हणाल्या होत्या की, बुंदेलखंडी लोक खाण्याचे शौकीन आहेत त्यामुळे या शंभर स्टॉल वरचा एकही पदार्थ शिल्लक राहणार नाही.

आमच्या लग्नाचा विधी संपला आणि मी स्टॉलवर फेरफटका मारला. मला दिसले की तिथे एकही खाद्यपदार्थ शिल्लकच राहिला नव्हता त्यामुळे वाया जाण्याचा प्रश्नच नव्हता. ते सगळं बघून मला इतका आश्चर्य वाटले. मला असं वाटायला लागलं की हे लोक थकत का नाहीत. इतका उत्साह त्यांच्यामध्ये आहे. त्यांची आपुलकीची भाषा , पाहुण्यांची सरबराई करण्याची पद्धत ही खूपच भरभरून आहे. माझ्या लग्नाला दीड वर्ष होऊन गेले तरी मला अजूनही तो आठ दिवस सुरु असलेला लग्नाचा थाट आठवतो. मी तर त्याला वेडिंग वीक म्हणते. खरंतर मला बुंदेलखंडी भाषा पूर्णपणे बोलायला येत नाही. मात्र त्या भाषेतील गोडवा आणि त्या भाषेमधला रुबाब शिकून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

असं म्हटलं जातं खरं तर लग्न हे दोन समान कौटुंबिक संस्कृती असलेल्या व्यक्तींनी करावे. पण यालाच छेद देत स्मिता सांगते की, खरंच लग्न ही अशी गोष्ट आहे जी अशा दोन वेगळ्या संस्कृतींना सुद्धा एकत्र आणू शकते . आज , तुमचं आमचं ,आमच्या अशा पद्धती, तुमच्या कशा पद्धती असे बोलतात. दोन संस्कृतीमध्ये ही दरी आलेली आहे. दोन वेगवेगळ्या संस्कृतीतली मुलं-मुली लग्न करतील तेव्हा खऱ्या अर्थाने ती संस्कृती देखील एकत्र येईल. दोन वेगळे समाज एकत्र येतील. मी हा अनुभव सध्या प्रत्यक्ष घेत आहे.

जोगवा, 72 मैल एक प्रवास यासारखे सिनेमे, वेगवेगळ्या हिंदी मालिका तसेच मराठी नाटक यामध्ये दिसणारी स्मिता तांबे ही सध्यातरी बुंदेलखंडची सून बनल्याचा पुरेपुर आनंद घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER