मृत्यूनंतर 14 चित्रपट प्रदर्शित झाले होते स्मिता पाटीलचे

Smita Patil

बॉलिवूडमध्ये (Bollywood) एक तर चित्रपट सुरु होऊन तो पूर्ण होणे तसे अवघडच असते. निर्मात्यापुढ अनेक अडचणी जशा असतात तशा नैसर्गिक अडचणींचाही सामना त्यांना करावा लागतो. आर्थिक अडचणींमुळे अनेक चित्रपट काही काळ डब्यातही जातात. कधी कधी कलाकार आजारी पडतात आणि चित्रपटाचे शूटिंग थांबते. तर कधी चित्रपट 90 टक्के पूर्ण झाला असताना मुख्य नायकाचे अपघाताने किंवा आजाराने निधन होते आणि चित्रपट पूर्ण होत नाही. पैसे आल्यानंतर डब्यात गेलेले चित्रपट निर्माते पुन्हा सुरु करतात. कलाकाराचे निधन झाले असेल तर चित्रपटाच्या कथेत बदल करतात आणि चित्रपट पूर्ण करतात. असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या मृत्यूनंतर एक दोन नव्हे तर पाच-पाच वर्षांनीही त्यांचे चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत.

या यादीत संजीव कुमार चा क्रमांक फार वरचा आहे. संजीव कुमारच्या मृत्यूनंतर त्याचे सात चित्रपट प्रदर्शित झाले होते. प्रख्यात अभिनेता संजीव कुमार बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता. कोणत्याही प्रकारची भूमिका साकारण्याची त्याची हातोटी होती. त्यामुळे अनेक चित्रपट त्याच्याकडे होते. परंतु हृदयविकाराच्या झटक्याने 6 नोव्हेंबर 1985 ला त्याचे निधन झाले. त्यावेळी जवळ जवळ आठ दहा चित्रपटात तो काम करीत होता. त्यापैकी सात चित्रपट संजीव कुमारच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाले होते. यात ‘राही’, ‘कत्ल’, ‘कांच की दीवार’, ‘लव्ह अँड गॉड’, ‘प्रोफेसर की पडोसन’ चित्रपटाचा समावश आहे. ‘प्रोफेसर की पड़ोसन’ तर संजीव कुमारच्या मृत्यूनंतर आठ वर्षांनी म्हणजे 20 डिसेंबर 1993 ला प्रदर्शित झाला होता.

राजेश खन्नाने एक काळ गाजवला होता. बॉलिवूडमधील पहिला सुपरस्टार म्हणून राजेश खन्नाची ओळख आहे. एकाच वेळेस अनेक चित्रपटांमध्ये राजेश खन्ना काम करीत असत. मात्र नंतर वयामुळे कमी चित्रपट मिळू लागले होते. अशोक त्यागी यांनी राजेश खन्नाला घेऊन ‘रियासत’ चित्रपटाची सुरुवात केली होती. परंतु चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच त्याचे 18 जुलै 2012 ला निधन झाले. अशोक त्यागी यांनी चित्रपट जवळ जवळ पूर्ण केला होता. चित्रपटात काही बदल करून अखेर राजेश खन्नाच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी म्हणजे 18 जुलै 2014 ला प्रदर्शित केला.

याहू स्टार शम्मी कपूर यांनी एक काळ गाजवला होता. त्याचे प्रत्येक चित्रपट हिट होत असत. वय झाल्यानंतर शम्मी कपूरने चरित्र भूमिका साकारून त्यातही यश मिळवले होते. सुभाष घईंच्या विधातामध्ये त्यांनी दिलीपकुमारसोबत आपल्या अभिनयात अजूनही दम असल्याचे दाखवून दिले होते. रुपेरी पडद्यावरील शम्मी कपूर हा खराखुरा रॉकस्टार होता. कदाचित त्यामुळेच त्याचा शेवटचा चित्रपटही ‘रॉकस्टार’ असावा हा योगायोग म्हणावे लागेल. शम्मी कपूरने नातू रणबीर कपूरसोबत रॉकस्टार चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र शूटिंग दरम्यानच 14 ऑगस्ट 2011 ला त्याचे निधन झाले. मात्र चित्रपटातील त्याचे शूटिंग पूर्ण झालेले असल्याने निर्मात्यांना त्रास झाला नाही. शम्मीच्या निधनानंतर चार महिन्यातच रॉकस्टार प्रदर्शित झाला आणि यशस्वीही झाला.

शोलेमुळे घराघरात गब्बरच्या रुपात पोहोचलेल्या अमजद खानने अनेक चित्रपट केले. सुरुवातीला खलनायक म्हणून काम करणाऱ्या अमजद खानने नंतर चरित्र भूमिकाही केल्या. एका अपघातानंतर वजन वाढू लागल्याने अमजद खानने खलनायक साकारण्यापेक्षा चरित्र भूमिकांवरच जोर दिला होता. ‘चमेली की शादी’, ‘दोस्ताना’ अशा काही चित्रपटांमधील त्याच्या भूमिका गाजल्या होत्या. अमजद खान ‘सौतेला भाई’ चित्रपटात काम करीत असतानाच 27 जुलै 1992 ला त्याचे निधन झाले. बी. आर. इशारा दिग्दर्शित या चित्रपटात राजेश खन्ना आणि राज बब्बर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अमजद कान ठाकूरच्या भूमिकेत होता. इशार यांनी चित्रपट पूर्ण करून अमजद खानच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी म्हणजे 21 जून 1996 ला प्रदर्शित केला.

मृत्यूनंतर जास्तीत जास्त चित्रपट प्रदर्शित होण्याचा विक्रम स्मिता पाटीलच्या नावावर आहे. कला आणि व्यावसायिक चित्रपटात यश मिळवणारी एकमेव अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. आपल्या गंभीर अभिनयाने स्मिता पाटीलने अनेक चित्रपटातील भूमिका अक्षरशः जीवंत केल्या होत्या. त्यामुळेच स्मिता पाटीलकडे अनेक चित्रपट होते. 1986 मध्ये बाळंतपणानंतर स्मिताचे निधन झाले. तिच्या मृत्यूनंतर एक दोन नव्हे तर तब्बल 14 चित्रपट प्रदर्शित झाले होते. यात शेवटचा चित्रपट होता 1989 मध्ये प्रदर्शित झालेला ‘गलियों का बादशाह’ होता.

1990 च्या दशकात दिव्या भारती आघाडीची नायिका होती. अनेक यशस्वी चित्रपट तिने दिले होते आणि अनेक चित्रपटात ती कामही करीत होती. 5 एप्रिल 1993 ला दिव्या भारतीचा इमारतीच्या गॅलरीतून खाली पडून मृत्यू झाला. ही आत्महत्या की हत्या याचा उलगडा अजूनही झालेला नाही. दिव्या भारतीकडे मृत्यूपूर्वी तीन-चार चित्रपट होते. त्यापैकी दोन चित्रपट मात्र निर्मात्यांनी पूर्ण केले आणि प्रदर्शित केले. यापैकी ‘शतरंज’ चित्रपट लगेचच तिच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यातच प्रदर्शित झाला होता. तर त्याच वर्षी दिव्या भारतीचा शेवटचा चित्रपट ‘अंधा इंसाफ’ प्रदर्शित झाला होता.

त्यापूर्वी सौंदर्याची देवी असलेल्यया मधुबालाचा शेवटचा ‘ज्वाला’ तिच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी म्हणजे 1971 मध्ये रिलीज झाला. मधुबालाचे निधन 23 फेब्रुवारी 1969 ला झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER