या गाण्याच्या शूटिंगनंतर रडली होती स्मिता पाटील

Smita Patil - Amitabh Bachchan

हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत ज्या नायिकेने सगळ्यात जास्त यश, नाव आणि लोकप्रियता मिळवले ती नायिका म्हणजे स्मिता पाटील (Smita Patil). स्मिताने फक्त आर्ट फिल्म्सच नव्हे तर कमर्शियल सिनेमातही काम करून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. स्मिताच्या अभिनयाचे कोट्यावधी दिवाने होते. अभिनयासोबतच स्मिताचे सावळे सौंदर्यही अनेकांना लुभावणारे ठरले होते. दुर्देवाने स्मिताचे लवकर निधन झाले म्हणून, नाही तर तिने बॉलिवूडवर (Bollywood) अनेक वर्ष राज्य केले असते हे नक्की.

‘भूमिका’, ‘अर्थ’, ‘आक्रोश’, ‘चक्र’, ‘मिर्च मसाला’, ‘जैत रे जैत’, ‘उंबरठा’ अशा आर्ट फिल्ममध्ये काम करणाऱ्या स्मिताने हिंदीतील अनेक कमर्शियल सिनेमातही काम केले होते. मात्र एका सिनेमातील एका गाण्याच्या शूटिंगनंतर स्मिता पाटील घरी जाऊन रडली होती. दुसऱ्या दिवशी सेटवर तिच्या नायकाला तिची ही अडचण समजली आणि त्याने तिला समजावले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. आर्ट फिल्ममध्ये काम करणाऱ्या स्मिता पाटीलला प्रकाश मेहरा यांनी सर्वप्रथम कमर्शियल सिनेमात संधी दिली होती. हा सिनेमा होता नमक हलाल आणि यात तिचा नायक होता अमिताभ बच्चन. 1982 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या सिनेमातील गाणी आजही प्रेक्षकांना आठवतात. या सिनेमात अमिताभ (Amitabh Bachchan) आणि स्मितासोबत शशी कपूर आणि परवीन बाबी यांच्याही भूमिका होत्या.

या सिनेमात ‘आज रपट जाएं तो हमे ना उठाईयो’ हे एक अत्यंत रोमँटिक इरॉटिक गाणे होते. हे गाणे अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्यावर शूट करण्यात आले होते. पावसात भिजत अमिताभ आणि स्मिताने हे गाणे केले होते. पांढऱ्या साडीतील स्मिताने प्रेक्षकांवर गारुड केले होते. पण आर्ट फिल्म्समध्ये काम करणाऱ्या स्मिताला हे गाणे काही भावले नव्हते. गाण्याचे शूटिंग तर तिने केले पण तिचे मन तिला खात होते. स्वतः स्मितानेच एका मुलाखतीत या गाण्याची आठवण सांगितले होती. मुलाखतीत स्मिताने म्हटले होते, या गाण्याचे शूटिंग करताना मी खूप घाबरले होते. मात्र प्रोफेशनलिझम दाखवत गाण्याचे शूटिंग पूर्ण केले. पण घरी गेल्यावर मी हे काय केले असा विचार करीत मी रडले होते. माझे हे गाणे पाहून माझे जे फॅन्स माझ्या अभिनयावर प्रेम करतात ते काय विचार करतील या प्रश्नाने मला रात्रभर झोपही लागली नाही. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा शूटिंगला पोहोचली तेव्हा माझा चेहरा पाहून अमिताभ बच्चनने ओळखले की काही तरी बिघडले आहे. त्याने मला विचारल्यानंतर मी त्याला माझ्या मनात आलेले विचार सांगितले. तेव्हा अमिताभने मला समजावले. अमिताभने सांगितले, जास्त विचार करू नकोस. तू अभिनेत्री आहेस आणि हे गाणे तुझ्या भूमिकेची गरज आहे. जे फॅन्स तुझ्यावर प्रेम करतात त्यांना हे गाणे वावगे वाटणार नाही उलट त्यांना ह गाणे आवडेलच. आणि तसेच झाले. सिनेमा रिलीज झाल्यानंतर हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले असेही स्मिता पाटीलने या मुलाखतीत सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER