सूनमुख सोहळ्यात स्मिताने गायले होते आयटम साँग

गेल्या काही दिवसांत सेलिब्रिटी अभिनेत्रींनी त्यांचा आयुष्याचा जोडीदार शोधत असताना अमराठी मुलांची निवड केली आहे. मराठी मुलगी आणि हिंदी मुलगा अशा जोड्या मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटी कलाकारांनी जुळवल्या आहेत. लग्नानंतर या महाराष्ट्रीय अभिनेत्रींपैकी कुणी कर्नाटकची सून झाली आहे तर कुणी उत्तर भारतची. कुणी बिहार सासर म्हणून निवडलं तर कुणी पंजाबीपुत्तरची बायको बनून पंजाबी झाली. आता लग्न केलं म्हणजे अमराठी घरातील सासरच्या चालीरीतीही सांभाळल्या पाहिजेतच ना. अभिनेत्री स्मिता तांबेनेही हेच केले. बुंदेलखंडच्या धीरेंद्र द्विवेदीसोबत लग्न करून सासरी गेलेली अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe) हिने लग्नानंतरची प्रथा म्हणून सूनमुख सोहळ्यात गायचा आग्रह झाल्यावर चक्क मराठी आयटम साँग गात वेळ मारून नेली. सध्या लग्नसराईच्या निमित्ताने स्मिताने ही आठवण शेअर केली आणि परमुलखात सून म्हणून गेल्यावर काय धमाल झाली हेही तिनं सांगितलं.

‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत सध्या मम्मी ही खडूस आईचीभूमिका करणारी स्मिता तांबे तिच्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयाने मनोरंजन क्षेत्रात ओळखली जाते. पडद्यावरही प्रवाहाच्या विरोधातील व्यक्तिरेखा साकारण्याला प्राधान्य देणारी स्मिता खऱ्या आयुष्यातही तितकीच रोखठोक आणि जे तिच्या मनाला पटेल ते करणारी आहे. साताऱ्याच्या या मुलीचे सगळे शिक्षण पुण्यात झाले आणि अभिनयाच्या ओढीने तिने मुंबई गाठली. गेल्या १५ वर्षांत स्मिताने वैविध्यपूर्ण भूमिका साकारत अभिनेत्री म्हणून स्थान कमावलं आहे. अभिनय क्षेत्रात काम करत असताना मराठीसह तिने हिंदीमध्येही अनेक मालिका आणि सिनेमे केले. याच प्रवासात तिला हिंदी नाट्यकलाकार धीरेंद्र द्विवेदी भेटला आणि बुंदेलखंडच्या या मुलाशी स्मिताने दोन वर्षापूर्वी लग्न केलं. या दोघांचे लग्न जरी मुंबईत मराठमोळ्या पद्धतीने झाले असले तरी पुन्हा सासरी गेल्यानंतर उत्तर भारतीय पद्धतीने स्मिताचे लग्न झाले. लग्नानंतर उत्तर भारतीय प्रथेनुसार सूनमुख पाहण्याचा सोहळा असतो. या सोहळ्यात नवीन सून गाण गाते. ही वेळ जेव्हा स्मितावर आली तेव्हा तिने चक्क ‘पहिल्या धारेच्या प्रेमानं साला काळीज केलंय बाद…ही पोरी साजूक तुपातली तिला म्हवऱ्याचा लागलाय नाद… हे गीत म्हणत सासरच्यांची पसंती मिळवली.

स्मिता त्या धमाल अनुभवाविषयी सांगते, धीरेंद्रसोबत मी लग्न करायचे ठरवले तेव्हाच त्याने मला त्याच्या कुटुंबाविषयी सांगितले होते. आमचे बुंदेलखंडचे कुटुंब खूप मोठे आहे आणि अजूनही तिकडे सगळ्या चालीरीती पाळल्या जातात. आमच्या लग्नानंतर जो विधी असतो तिथे मला गायचे होते. अर्थातच अशा वेळी भक्तिगीत किंवा लग्न संकल्पनेवर आधारित पारंपरिक लोकगीताची अपेक्षा असते. माझ्याकडूनही तीच अपेक्षा होती. पण मला त्यावेळी कुठलंच पारंपरिक गीत आठवेना. शेवटी मी पहिल्या धारेच्या प्रेमानं साला काळीज केलय बाद…ही पोरी साजूक तुपातली तिला म्हवऱ्याचा लागलाय नाद… हे गाणं म्हटलं. त्यांना मराठी काहीच कळत नसल्याने मी वाचले. पण जेव्हा माझ्या सासूबाईंनी मला त्या गाण्याचा अर्थ विचारला तेव्हा माझी सुरुवातीला गाळण उडाली. मी तेव्हा त्यांना म्हटलं होतं की, हे गाणं मराठी लग्नातलं आहे. ज्यामध्ये दोन वेगळ्या संस्कृतीतील कुटुंबे एकत्र येतात. अशा लग्नाचा आनंद छान असतो. मुलगी साजूक तुपातली आणि मुलगा म्हवऱ्यासारखा असूनही प्रेम त्यांना एकत्र आणतं. खरं तर मी काहीच खोटा अर्थ सांगितला नाही; पण ते गाणं आयटम साँग असलं तरी त्याचा अर्थ दोन वेगवेगळ्या स्वभावांच्या व्यक्तींना जोडणारा होता हे मी पटवून दिलं. सगळे माझे कौतुक करत होते आणि मी माझ्या हुशारीला दाद देत होते.

स्मिता सध्या मुंबईत धीरेंद्रसोबत संसार करत असली तरी तिचं बुंदेलखंडला वरचेवर जाणं होतं. आता तिला सासरची भाषा बोलायला जमते आणि त्यांनाही स्मिताचे मराठी बोलणे थोडे थोडे कळते; पण आजही तो किस्सा आठवला की, स्मिताला खूप हसायला येतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER