किरकोळ महागाईत किंचित वाढ

दर अद्यापही नियंत्रणात

vegetables

मुंबई :- देशातील मागणी अत्यल्प स्तरावर गेल्याने बाजारात आर्थिक संकट आहे. त्याचे फलित तात्काळ समोर आले असून किरकोळ क्षेत्राच्या महागाईत किंचित वाढ झाली आहे.

देशातील किरकोळ महागाईमध्ये एप्रिल महिन्यात वाढ नोंदवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये किरकोळ महागाई २.९२ टक्क्यांवर पोहोचली. या महागाईचा हा सहा महिन्यांतील उच्चांक आहे. प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे किरकोळ महागाईने नवा स्तर गाठला आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१८मध्ये किरकोळ महागाईचा दर ३.३८ टक्क्यांवर पोहोचला होता.

केंद्र सरकारच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फ सोमवारी ही आकडेवारी घोषित करण्यात आली. मार्चमध्ये २.८६ टक्क्यांवर असणाऱ्या महागाईत एप्रिलमध्ये किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. फळभाज्या, मांस, मासे, अंडी यांच्या दरवाढीचा थेट परिणाम किरकोळ महागाई वाढण्यात झाला आहे.

एप्रिलमध्ये फळभाज्यांच्या किंमतीत मार्चच्या तुलनेत २.८७ टक्क्यांनी वाढ झाली. या खालोखाल इंधनदरांत झालेली वाढही किरकोळ महागाईसाठी मारक ठरली. एप्रिलमध्ये इंधनदर २.५६ टक्क्यांनी वाढले. त्यापूर्वीच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये इंधन दरवाढीचे प्रमाण २.५६ टक्के होते.

देशाचा किरकोळ महागाई दर यूपीए सरकारच्या काळात १३ टक्क्यांच्यावर गेला होता. बाजारात जेवढी मागणी अधिक तेवढी महागाई अधिक, असे सूत्र असते. पण तसे असले तरी महागाईचा दर ४ ते ५ टक्क्यांमध्येच असावा. तसे असले तरच मागणी व पुरवठा संतुलित असल्याचे मानले जाते. सध्या मात्र महागाई दर त्या पातळीपेक्षाही खाली आहे. त्यामुळेच सध्या अर्थव्यवस्था नाजूक असल्याचे मानले जात आहे.