झोप, नाही तर अण्णा येतील !

Anna Naik

हिंदी सिनेमातील माइलस्टोन असलेल्या शोले सिनेमाचं नाव जरी आलं तरी, सो जा, नही तो गब्बरसिंग आ जाएगा- हा संवाद आठवल्याशिवाय राहात नाही. मग आता, झोप, नाही तर अण्णा येतील- हा नवा भीती दाखवण्याचा बागुलबुवा कुठून आला, असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला? हे आहेत ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale) मालिकेतील शेवंताच्या डोळ्यावर फिदा झालेले अण्णा नाईक. गेल्या वर्षभरापासून खिळवून ठेवणारी ही मालिका संपली असली तरी कानातील अत्तराचा फाया सतत हुंगणारे आणि कानातील बाळीला कुरवाळत गावातील लेकीसुनांकडे वाकड्या नजरेने पाहणारे अण्णा नाईक (Anna Naik) हे पात्र मात्र विसरायला त्यांच्या चाहत्यांना बराच वेळ लागेल. या मालिकेतील अण्णांच्या भूमिकेसाठी आठवणीत राहिलेली प्रतिक्रिया सांगताना अण्णाफेम माधव अभ्यंकर यांनीच एक अफलातून गोष्ट शेअर केली. अण्णा आणि शेवंतावर असंख्य मिम्स आल्या.

त्यातल्याच एका व्हिडीओमध्ये एक आई लहान मुलीला सांगतेय की, झोप लवकर नाही तर अण्णा येतील. ही प्रतिक्रियाच अण्णा या पात्राचा दरारा किती लोकप्रिय झाला आहे सांगते, असंही माधव अभ्यंकर सांगतात. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा पहिला भाग गाजल्यानंतर जेव्हा या मालिकेचा सिक्वेल काढायचा ठरले तेव्हा पुढे काय झाले यापेक्षा भूतकाळात काय घडले होते या संकल्पनेवर मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची कथा बांधण्यात आली. पहिल्या भागात केवळ फोटो फ्रेमपुरते आणि काही फ्लॅशबॅकमध्ये झालेले मालवणी अण्णांचे दर्शन दुसऱ्या भागात मध्यवर्ती भूमिकेत आले. स्वच्छंदी, वाटेत अडसर म्हणून येणाऱ्याचा थेट काटाच काढण्याचा खूनशीपणा, गावातील तरुण बायकांना जाळ्यात ओढणारं प्रस्थ अशी ही अण्णा नाईकांची भूमिका पुणेकर असलेल्या माधव अभ्यंकर यांनी चांगलीच वठवली.

मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग झाले तेव्हा मालिकेत बेफिकीर असलेले, भावनांशी काहीही संबंध नसलेले अण्णांच्या व्यक्तिरेखेपलीकडील माधव अभ्यंकर भावुक झाले. यानिमित्तानेच त्यांनी आठवणीत राहिलेल्या अनेक प्रतिक्रियांपैकी काही प्रतिक्रिया बोलून दाखवल्या. माधव अभ्यंकर यांच्या तोंडी मालिकेत अस्सल मालवणी भाषा ऐकायला मिळाली. ती इतकी त्यांनी आत्मसात केली की, अनेकांना प्रश्न पडायचा की, अभ्यंकर खरंच कोकणातले आहेत का? पण हा समजही अभ्यंकर यांनी खोडून काढला. माधव हे मूळचे पुणेकर. त्यामुळे मालवणी भाषेशी त्यांचा तसा काहीच संबंध नव्हता. नाही म्हणायला त्यांची काकू कोकणातली असल्याने तिच्याशी कधी बोलताना, भेट झाल्यावर तिचं मालवणी हेल काढून बोलणं मात्र माधव अभ्यंकर यांना खूप आवडायचं. त्यात माधव अभ्यंकर यांनी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेपूर्वी जी नाटकं, मालिका केल्या त्यातही कुठेच मालवणी बोलण्याचा संदर्भ आला नव्हता.

जेव्हा या मालिकेसाठी माधव अभ्यंकर यांची निवड झाली तेव्हा पहिला टास्क होता तो वजन कमी करण्याचा आणि दुसरी परीक्षा होती अस्सल मालवणी भाषा ओठी रुळवण्याची. त्यासाठी माधव अभ्यंकर यांनी महिनाभर मालवणी नाटकं यू-ट्युबवर पाहिली. शब्द, हेल यांचा अभ्यास केला. मालवणी कलाकार लीलाधर कांबळी यांनी माधव यांना खूप मदत केली. जेव्हा मालिका सुरू झाली आणि पकड घेऊ लागली तेव्हा माधव यांच्या मालवणी बोलीने कमाल केली होती. तुम्ही मूळचे कोकणातले का, हा प्रश्नही त्यांना अनेकांकडून आला. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकातील नाना फडवणीसांचा इरसालपणा माधव अभ्यंकर यांनी लोकप्रिय केला. त्यानंतर ‘अण्णा नाईक’ या भूमिकेने त्यांना घराघरांत पोहचवलं. मालिकेतील पांडूकडून ‘अण्णा इलं’ हे ऐकण्यात वेगळीच मजा यायची त्यांच्या चाहत्यांना.

कोकणात उतारेधुपारे करण्याची पद्धत आजही आहे. भुताखेताच्या गोष्टी कोकणात अगदी रंजकपणे सांगितल्या जातात. कोकणच्या या जीवनशैलीचे संदर्भ मालिकेत आले होते. अण्णांनी मालिकेच्या कथेत ज्यांना ज्यांना मारून टाकले ती माणसं त्यांना स्वप्नात येऊन त्रास देतात आणि त्याच धक्क्याने अण्णांचा मृत्यू होतो, या नोटवर ही मालिका संपली. त्यामुळे माधव यांच्या खऱ्या आयुष्यात असा अनुभव कधी आलाय का, असं त्यांच्या चाहत्यांनी त्यांना विचारलं होतं. माधव अभ्यंकर कॉलेजमध्ये होते तेव्हा त्यांच्या कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तिकटीवर कुणीतरी लिंबू मिरची टाकली होती. मित्रांची पैज लागली की, त्या लिंबाचं सरबत कोण पिऊन दाखवेल. माधव यांनी ते चॅलेंज स्वीकारलं आणि कॉलेज कँटीनमध्ये त्या उताऱ्याच्या लिंबाचं सरबत पिऊन दाखवलं. या घटनेला ३० वर्षे झाली आणि मी ठणठणीत आहे, असं सांगत पडद्यावरचे अण्णा आणि माधव वेगळे आहेत असं सांगत अण्णा नाईकांना हशा घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER