निद्रायण कथासार

sleep deprivation

मध्यंतरी एक झोपेसंबंधी माहिती देणारा लेख वाचनात आला. ते वाचत असताना मला माझ्या अगदी बालपणीची आठवण आली म्हणजे मला ती गोष्ट आठवतही नाही ,पण कुणीतरी सांगितले म्हणून मला ती लक्षात आहे. मी आणि माझी आतेबहीण एकाच वेळी पाळण्यात होतो. दोघींमध्ये फक्त पंधरा दिवसाच अंतर ! मग आजोबांना तर खूप आनंद! त्यातून ते लेखक-कवी. त्यामुळे त्यांनी आम्हा दोघींवर वेगवेगळे काव्य केलं. मला खूप झोप होती, रात्रंदिवस झोपा काढायचे, आणि बहीण ती मात्र खूप रडायची. आजोबां माझ्या पाळण्याशी यायचे, आणि मला पाहत म्हणायचे, “कुणी निंदा अथवा वंदा , आमचा झोपण्याचा धंदा. “(माझं माहेरचं नाव वंदना ) आणि मग माझ्या आते बहिणीच्या पाळण्याजवळ जायचे आणि म्हणायचे “आमचे नाव पटवर्धन ,आमचा उद्योग आक्रंदन !”आजोबा खूप लवकर गेले. मला ते आठवत सुद्धा नाहीत. तर असो !

बरेच लोक ,आम्हाला कशी गादीला पाठ लागल्या लागल्या झोप लागते, कुठेही सांगा, हवे तिथे झोपू शकणारे स्वतःला खूप भाग्यवान समजतात, व स्वतःवरच खुश असतात. परंतु अति निद्रा आणि घोरत झोपणे ,अर्थात घोरणे फार अभिमानास्पद नाही. तो केवळ त्यांचा गैरसमज असतो.

स्लीप मेडिसिन ही वैद्यकशास्त्राची एक नवीन शाखा आहे .हृदयाचे शास्त्र ,कार्डियोलॉजी किडनीचे शास्त्र नेफरोलॉजी, ही गेल्या दीडशे वर्षांपासून अस्तित्वात आलेली शास्त्रे आहेत .पण निद्राविकार यांचे शास्त्र “सोम्नोलॉजी “हे अलिकडे चाळीस-पंचेचाळीस वर्षापासून विकसित झालेले शास्त्र आहे. जो व्यक्ती घोरतो त्याला एक तर लवकर ते पटत नाही की तो जोरजोरात घोरतो आणि आजूबाजूच्या लोकांच्या झोपेचे मात्र खोबरे होते .अशावेळी त्यांना टेप करून ऐकवावे जरा असेच वाटते.

मध्यंतरी डॉक्टर अभिजित देशपांडे , निद्राविकार तज्ञ यांचा लेख वाचनात आला होता. गाढ झोपेतील घोरणे आणि कुठल्याही कारणाने जर मध्ये जागे झालो तर त्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही, कारण ते स्मरण राहण्यासाठी तो वेळ कमीत कमी एक मिनिट तरी असावा लागतो .आपण जर 20 ते 30 सेकंद जागे झालो तर ते लक्षातही येत नाही. मग भलेही तो शंभरवेळा उठला तरीही ! त्यामुळे त्या व्यक्तीला फ्रेश किंवा ताजेतवाने मात्र वाटत नाही आणि सांगताना मात्र तो मी रात्रभर झोपलो होतो गाढ ! असेच सांगतो.

सानिकाला खूप गाढ झोप लागते असे वाटते पण सकाळी उठून फ्रेश मात्र वाटत नाही याला कारण पण हेच!

या आजाराचे स्वरूप एकूण छुप्या शत्रूसारखे, गनिमी काव्याने हल्ला करणारे ! आपल्या भारतीय वैद्यक शास्त्रात, आयुर्वेदं सगळ्यात प्राचीन समजले जाते .आयुर्वेदात चरक, वाग्भट वगैरे शास्त्रज्ञांचा मानवी शरीराबाबतचा खूप सूक्ष्म अभ्यास आहे. मात्र त्यात कुठेही घोरणे, त्यातून होणाऱ्या शारीरिक दुष्परिणामांचा फारसा उल्लेख नाही .कफ प्रवृत्तीचे प्राबल्य वाढले तर घोरणे संभवते. प्राणवायू उदानवायू यांच्या परस्पर अवरोधाने घोरणे होते असाही उल्लेख आढळतो.

रामायणामध्ये कुंभकर्णाची गोष्ट तर आपण लहानपणापासून ऐकत असतो .तो एकदा झोपला की सहा महिने झोपलेला असतो अशी त्यांची ख्याती पुढे त्यांनी केलेल्या आक्रमणाने रावणाने कुंभ करणाला उठवण्याचा प्रयत्न केला .त्याच्या घोरण्याने अख्खी गुहा हादरत होती असे म्हणतात. ऊठवणार्‍या राक्षसांना आपले पाऊल रोखून स्थिर ठेवणे अवघड वाटत होते .थोडक्यात त्याची अतिनिद्रा व घोरणे यांची ख्याती आहेच.

हे यासाठी बघितले की घोरण्याचेही प्रकार व प्रत ठरवणे आवश्यक असते .आवाजाची तीव्रता डेसीबल मध्ये मोजली जाते .घड्याळाची टिकटिक १०, तर नॉर्मल आवाजातील संवाद चाळीस डेसिबल असतात. मंद घोरणे दहा डेसीबल तर प्रचंड घोरणे ७० डेसिबल इतके जास्त असते. तीव्र प्रतीचे घोरणे ही खोलीचे दार बंद केल्यावरहीं ऐकू येते.

लहान मुलांमधील मध्यम व तीव्र घोरणे हे निश्चितपणे अबनॉर्मल समजले जाते. झोपेच्या गुणवत्तेची चाचणी पॉली सोम्नोनोग्राफी या पद्धतीने केली जाते. माणूस घोरतो म्हणजे काय ? तर घोरणे म्हणजे ध्वनी ! व्हायब्रेशनमुळे निर्माण होणार्‍या लहरी. नाकाच्या पाठच्या भागापासून ते पढजिभेच्या मागेपर्यंत एक स्नायूंची नळी ,म्हणजे फोरेंक्स असे त्याला म्हणतात. ही नळी लवचिक असते. घसा हा त्याचाच एक भाग. श्वासोश्वासा बरोबरीने नळी कंप पावते आणि घोरणे सुरू होते. कुठल्याही कारणाने नळी अरुंद झाली तर घोरणे वाढते. नळीचा व्यास जेवढा कमी , त्याच्याशी घसा बंद होण्या च्या शक्यतेचा खूप संबंध असतो. त्यामुळे वजन वाढ, डोकेदुखी ,बीपी वाढणे ,मधुमेह वाढणे, हृदय विकार, पॅरलिसीस व झोपेत मृत्यु सारख्या घटनांचा संबंध आहे.

भारतातील लोकांना झोपाळूपणा म्हणजे आपण आळशी आहोत असे वाटते. त्यामुळे त्याची कारणे आपण बाह्य गोष्टीत म्हणजे ताणतणाव, चिंता ,कामाचा व्याप ,ठरवतो .मात्र झोपेच्या गुणवत्तेकडे मात्र दुर्लक्ष करतो. त्याचा मानसिकतेवर ,कार्यक्षमतेवर, उत्साहावर, चिडचिडी वर परिणाम होतो.

सुरुवातीला पाठीवर झोपल्यावर सुरु होणारे घोरणे ,कुशीवरही पुढे सुरू राहते. थकवा वाढतो. निर्णय घेण्यावर परिणाम होतो, पटकन राग येतो. एकाग्रचित्त होत नाही. आत्मविश्वास गमावल्याने औदासिन्यही येऊ शकते.

खंडित झोपेमुळे मेंदू जागा होतो .त्यावेळी कॉर्टिसॉल नावाच्या हार्मोन्सचे स्त्रवणे सुरू होते. वास्तविक झोपले असताना हे हार्मोन अतिशय कमी असायला हवे असते, पण तुटक झोपेमुळे ते वाढते. परिणामतः पोटावर चरबी साठते. घ्रेलीन हार्मोनमुळे पिष्टमय पदार्थ आवडतात आणि वजन वाढते. रिफ्लेक्सेस मोजण्याच्या तंत्राने मेंदूची कार्यप्रवणता म्हणता येते ती शक्ती मंदावते. त्यामुळे घोरण्याचा ” घोरच “जास्त असल्याने घोरणे तितक्या सहजपणे न घेतलेले बरे ! एवढंच आपल्या आला बघायला लागेल.

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER