मुलीच्या कुल्ल्यावर चापटी मारणे हाही ठरतो ‘पॉक्सो’खालील गुन्हा

  • आरोपीस दया दाखवूनही पाच वर्षांची सक्तमजुरी

मुंबई : अल्पवयीन मुलीच्या कुल्ल्याला  (पार्श्वभाग) स्पर्श करणे किंवा त्यावर चापटी मारणे हादेखिल  बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (POCSO ACT) कलम १० अन्वये लैंगिक हल्ला (Sexual Assault) ठरतो, असा निकाल देत येथील न्यायालयाने त्याबद्दल एका २२ वर्षांच्या आरोपीस पाच वर्षांची सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

मुंबईत लोअर परळ येथील शाह अ‍ॅण्ड नाहर इन्डस्ट्रियल इस्टेटमध्ये नोकरी करून तेथेच राहणाºया सहर अली शेख या आरोपीस ‘पॉक्सो’ कायद्याखालील विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती एम. ए. बरालिया यांनी ही शिक्षा दिली. आरोपीने दंड न भरल्यास त्याला आणखी दोन महिने सक्तमजुरी भोगावी लागेल. सहर अली शेखला भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ व ३५४-ए अन्वये  विनयभंगाच्या गुन्ह्यासाठीही दोषी धरले गेले. परंतु ‘पॉक्सो’ कायद्यान्वये शिक्षा दिल्याने या गुन्ह्यासाठी स्वतंत्र शिक्षा ठोठावली गेली नाही.

‘पॉक्सो’ कायद्यान्वये लैंगिक हल्ल्याच्या गुन्ह्यासाठी किमान पाच वर्षे व कमाल सात वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा आहे. परंतु सहर अली शेखचा हा पहिलाच गुन्हा आहे, त्याची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे, त्याच्या घरात तो एकटाच कमावता आहे व तरुण असल्याने ही शिक्षा भोगून आल्यानंतर त्याचे वर्तन सुदारण्याची शक्यता आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला कमीत कमी शिक्षा ठोठावली.

‘पॉक्सो’खालील ‘लैंगिक हल्ल्या’च्या गुन्ह्यासाठी आरोपीने पीडित मुलीच्या गुप्तांगास (Private Parts) स्पर्श करणे अभिप्रेत आहे.‘कुल्ला’ हा गुप्तांग नसल्याने कुल्ल्याला स्पर्श करणे किंवा त्यावर चापटी मारणे हा कलम १० अन्वये गुन्हा होत नाही, असा आरोपीचा बचावाचा एक मुद्दा होता. तो फेटाळताना न्यायाधीश बरालिया यांनी म्हटले की, आरोपीने म्हटल्याप्रमाणे गूगलवर सर्च केले असता ‘कुल्ल्या’चा उल्लेख ‘गुप्तांग’ म्हणून आढाळणार नाही, हे खरे आहे. परंतु कायद्याच्या या कलमात वापरेलेल्या गुप्तांग या शब्दाचा अर्थ भारतीय समाजातील नीतीमत्तेच्या निकषांवर लावायला हवा व तसा तो लावल्यास ‘कुल्ला’ हे नक्कीच ‘गुप्तांग’ ठरते.

याखेरीज आरोपीची ही कृती ‘पॉक्सो’नुसार ‘लैंगिक हल्ला’ कशी ठरते याचे अधिक विवेचन करताना न्यायालयाने म्हटले की, आरोपीने अल्पवयीन व्यक्तीच्या गुप्तांगांना स्पर्श करणे किंवा तिला स्वत:च्या गुप्तांगांना स्पर्श करायला लावणे याखेरीज त्या व्यक्तीला लैंगिक भावनेने अन्य कोणत्याही प्रकारे स्पर्श करणे हाही गुन्हा आहे. प्रस्तूत प्रकरणात मुलगा असलेल्या आरोपीने पीडित मुलीच्या कुल्ल्यावर चापटी मारताना त्याच्या मनात लैंगिक भावना होती हे अगदी उघड आहे. शिवाय ही कृती केल्यानंतर आरोपी व त्याचे मित्र आनंदाने फिदीफिदी हसत होते, हेही लक्षात घ्यायला हवे.

‘डीजीपी’ला झालेल्या शिक्षेचा दाखला

सुमारे २५ वर्षांपूर्वी पंजाबचे माजी पोलीस महासंचालक कन्वरपाल सिंग गिल यांना अशाच प्रकारच्या खटल्यात झालेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयानेही कायम केली होती, याचाही न्यायाधीश बलारिला यांनी आधार घेतला. त्या खटल्यात गिल यांनी एका पार्टीमध्ये एका महिला ‘आयएएस’ अधिकाºयाच्या कुल्ल्यावर चापटी मारली होती.  गिल यांची ही कृती भादंवि कलम ३५४ अन्वये विनयभंग ठरविली गेली होती. तिच कृती ‘पॉक्सो’खाली ‘लैंगिक हल्ला’ ठरते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER