काश्मीरातील रोप-वे केबल कार अपघातात 6 ठार, एकाच कुटुंबातील 4 जणांचा समावेश

gulmarg-cabin

श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील गुलमर्ग येथील गोंडोला रोप-वे कार केबिन कोसळून झालेल्या अपघातात 6 जण ठार झाले. गुलमर्ग येथे रोप-वे ची तार तुटल्याने ही कार-केबिन शेकडो मीटर दरीत खाली कोसळल्याचे काश्मिर पोलिसांनी सांगितले. मृतकांत दिल्लीतील एकाच कुटुंबातील 4 जण तर दोघा स्थानिकांचा समावेश आहे.

याबात विस्तृत माहिती अस्पष्ट असली तरी मोठे झाड केबलवर पडल्यामुळे तार तुटल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. यामुळे इतर कार केबिनचेसुद्धा नुकसान झाले असून त्या खाली कोसळल्या. मृतकांमध्ये दिल्लीतील जोडपे आणि त्यांची दोन मुले समाविष्ट असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. गोंडोला कार केबल प्रोजेक्टच्या अपघातातील इतर ठिकाणी फसलेल्यांना काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पोलिस अधिका-याने सांगितले.

मृतकांची ओळख पटली असून त्यात जयंत अंड्रसकर आणि त्यांची पत्नी मनीषा तसेच मुली अनघा आणि जान्हवी अशी त्यांची नावे आहे. हे कुटुंब दिल्लीतील शालिमारबाग येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे.

मुख्तार अहमद गनी आणि जावेद अहमद खांडे असे स्थानिक रहिवाशी असलेल्या मृतकांची नावे आहेत. ते टुरिस्ट गाईड असल्याचे समजते. बचाव कार्य करणारी चमू घटनास्थळी पोहचली असून त्याबद्दल विस्तृत माहिती मिळू शकली नाही.

दोन टप्प्यातील गुलमर्ग केबल कार लोकांना समुद्र सपाटीपासून 13,780 फूटाच्या उंचीवरून ने-आण करते. हा जगातील दुस-या क्रमांकाचा सर्वात उंचीचा केबल कार प्रकल्प असून त्याची क्षमता प्रति तास 600 लोकांना ने-आण करण्याची आहे. या रोप-वे प्रकल्पाअंतर्गत 36 केबिन असून 18 टॉवर्स आहेत. जम्मू काश्मिर सरकार आणि फ्रेंच फर्मच्या संयुक्त विद्यामाने हा प्रकल्प राबविण्यात येत असून रोप-वे चा आनंद घेण्यासाठी पर्यटक विशेषकरून गुलमर्गला येतात.

केबल कार ऑपरेटर कंपनीच्या अनुसार पहिल्या टप्प्यातील केबल कार गुलमर्ग रिसॉर्ट येथून 2600 मीटरच्या (8,530 फूट) उंचीवरून कटो-याच्या आकाराच्या कोंगडोरी खो-यातील कोंगडोरी स्टेशनला घेऊन जाते तर दुस-या टप्प्यात 3,747 मीटर(12,293 फूट) उंचीवरील कोंगडोरी पहाडावर घेऊन लोकांना घेऊन जाते.