काश्मीरात परिस्थिती सामान्य नाही : राहुल गांधींचा आरोप

rahul-gandhi Delhi Airport

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य नसून शिष्टमंडळासोबत गेलेल्या पत्रकारांना वाईट वागणूक देण्यात आली असून त्यांना मारहाणही करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या राहुल गांधींना श्रीनगर विमानतळावरुनच माघारी पाठवून देण्यात आले. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे आरोप केले.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळाबाहेर येण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यांना तासभरानंतरच श्रीनगर विमानतळावरून दिल्लीला माघारी पाठवण्यात आले. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती तिथे येऊन पाहण्याचे निमंत्रण दिले होते. राहुल गांधी म्हणाले, काश्मीरमधल्या जनतेला नेमक्या कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय ते जाणून घ्यायचे होते. पण आम्हाला विमानतळाबाहेर येऊ दिले नाही.

आमच्या बरोबर असलेल्या पत्रकारांना वाईट वागणूक देण्यात आली. त्यांना मारहाण करण्यात आली. यावरून जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.