महिलेशी हुज्जत, राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख; मनसैनिकांनी कार्यालयातच त्याला चोपला

Mansainiks beat him in the office

ठाणे :  जिल्ह्यातील कल्याण येथे एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने आधी महिलेसोबत अर्वाच्य भाषेत हुज्जत घातली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी थेट फायनान्स कंपनीत जाऊन मुजोर कर्मचाऱ्याला बेदम चोपले आणि त्याला माफी मागण्यास भाग पाडले. कल्याण पूर्व भागातील काटेमानीवली परिसरात आर. एल. बी. या फायनान्स कंपनीची शाखा आहे. या शाखेतून एका महिलेने कर्ज घेतले होते.

कर्जाचे हप्ते भरण्यासाठी या महिलेला वारंवार फोन केला जात होता. महिला आपली व्यथा मांडण्यासाठी फायनान्स कंपनीच्या शाखेत पोहचली. या ठिकाणी तिला कर्मचारी अनिल  भोगे यांनी अरेरावी केली. महिलेशी बोलत असताना या कर्मचाऱ्याने राज ठाकरे आले तरी काही फरक पडणार नाही, असं म्हटलं. महिलेने ही बाब मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितली. मनसेचे पदाधिकारी उदय वाघमारे, विद्यार्थी सेना, महिला सेना पदाधिकारी इतर कार्यकर्ते तिथे पोहचले. त्यांनी अनिल  भोगे  या कर्मचाऱ्याला मस्त चोपले. त्याला उठाबशा काढायला लावून माफी मागायला लावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना २३ फेब्रुवारीला संध्याकाळी घडली होती.

आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनाचा संकटकाळ आहे. या काळात आधीपासूनच सर्व नागरिक त्रस्त झाले आहेत. फायनान्स कंपनीवाले लोकांना नाहक त्रास देत आहेत. संबंधित महिलेने आम्हाला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. राज ठाकरे यांचं नाव घेण्याचं काही कारणच नव्हतं. त्याची लायकीच नाही. त्यामुळे आम्ही त्याला मनसे स्टाईल धडा शिकवला, अशी प्रतिक्रिया मनसे पदाधिकारी उदय वाघ यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER