नारायण राणेंकडे दहा वर्ष मंत्रिपद, पण त्यांना शिवसेना संपवता आली नाही ; वैभव नाईकांचा निशाणा

सिंधुदुर्ग : राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांना शिवसेनेच्या विरोधात कोणीही किती ताकद दिली, तरी कोकणात राणेंना शिवसेना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, असा एल्गार शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर नाईक यांनी प्रतिक्रिया दिली.

नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेना संपवू, असं म्हटलं होतं. त्यांनी 10 वर्षे मंत्रिपद घेतलं, मात्र त्यांना ते जमलं नाही. उलट इथून सर्व आमदार शिवसेनेचे निवडून आले, असं वैभव नाईक म्हणाले.

अमित शाहांच्या वक्तव्याचा समाचार घेताना वैभव नाईक म्हणाले की, अमित शाह सांगतात आम्ही समोरुन वार करतो, परंतु मागच्या विधानसभा निवडणुकीत इथे शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात भाजपने उमेदवार उभे केले होते. अशाही परिस्थितीत शिवसेनेने आपला गड कायम राखला आहे, असे नाईक म्हणाले.

तसेच राज्यसभेचे खासदार नारायण राणे आणि अमित शाह यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली असेल. ही युती लाईफटाईम टिको अशी अपेक्षा आहे. भाजपकडून खोटारडेपणाचं राजकारण सुरु आहे. केंद्रात जी सत्ता आली आहे ती निष्ठूरपणे राबवायची हा त्यांचा एकमेव धंदा आहे. जो विरोधात गेला त्याच्या पाठी ईडी लावायची, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER