खटला वेळेत निकाली काढल्याने सिंधुदुर्ग ‘पॉक्सो’ कोर्टाचे कौतुक

Mumbai Hc - POSCO ACT -maharastra Today
  • तत्परतेने तपास करणार्‍या पोलिसांनाही शाबासकी

मुंबई : एका सात वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याबद्दल ३५ वर्षांच्या आरोपीची १२ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा अपिलात कायम करताना मुंबई उच्च न्यायालयाने हा खटला वेळेत निकाली काढल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ‘पॉक्सो’ विशेष न्यायालयाचे, तपास करणार्‍या पोलीस यंत्रणेचे आणि खटला उत्तम प्रकारे चालविणार्‍या पब्लिक प्रॉसिक्युटरचे तोंडभरून कौतुक केले.

विशेष ‘पॉक्सो’ न्यायालयाचे न्यायाधीशा व्ही. व्ही. गिरकर, विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर ए. एस. सामंत आणि पोलीस उपअधीक्षक व तपासी अधिकारी पद्मजा चव्हाण या सर्वांच्या पाठीवर शाबाससकीची थाप देताना न्या. रेवती मोहिते डेरे यांनी म्हटले की, खटला शक्यतो एक वर्षात निकाली निघावा, असा ‘पॉक्सो’ कायद्याचा दंडक आहे. या सर्वांनी तत्परतेने आणि समर्पित भावनेने काम करून कायद्याची ही अपेक्षा प्रत्यक्षात पूर्ण करून दाखविली हे खरोखरच कौतुकास्पद आहे. तपास, अभियोग व न्यायालयीन प्रक्रिया या सर्वच दृष्टीने हा खटला इतरांसाठी आदर्श ठरावा, असा आहे. मुलीच्या आईने फिर्याद नोंदविल्यानंतर सर्व तपास एक महिन्यात पूर्ण करणाऱ्या कुडाळ पोलिसांना न्यायालयाने विशेष शाबासकी दिली.

न्या. मोहिते-डेरे यांनी असेही म्हटले की, त्वरेने न्याय केला जाणे हा सामाजिक न्यायाचाच एक भाग आहे. कारण गुन्हेगाराला लवकरात लवकर अटक होऊन शिक्षा होणे किंवा तो निर्दोष असेल तर त्याची लवकारात लवकर सुटका होणे यात एकूण समाजाचेच हित असते. म्हणूनच या खटल्यात आरोपीला अटक करण्यात आणि जबाबदार नागरिक म्हणून कोर्टापुढे येऊन साक्ष देणारे सर्वच जण अभिनंदनास पात्र आहेत.

या खटल्यातील आरोपीचे नाव जितेंद्र राजमोहन माझी असे असून तो मूळचा बिहारचा आहे. तो कोकण रेल्वेचे एक कंत्राटदार अजित काजवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. या कंत्राटदाराचे काम कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्ग नगरी स्टेशनजवळ सुरू होते व कामाच्या जवळच कामगारांना राहण्यासाठी पत्र्याची शेड बांधलेली होती.

ही घटना ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर, २०१५ दरम्यानच्या रात्री घडली. पीडित मुलीचे कुटुंब जवळपासच्या गावात राहणारे आहे. मुलीच्या आजारी वडिलांना कुडाळ येथे दवाखान्यात नेण्यासाठी त्यांना घेऊन तिची आई दोन मुलांना बरोबर घेऊन रात्री सिंधुदुर्ग नगरी स्टेशनवर आली. परंतु दिवा-सावंतवाडी पॅसेंजर चुकल्याने त्यांना प्लॅटफॉर्मवरच मुक्काम करावा लागला. मुले पेंगुळल्यावर या कुटुंबाने बुकिंग ऑफिसपाशी उजेड होता तेथे पथार्‍या टाकल्या. आरोपी जितेंद्र हाही रात्रीचे जेवण झाल्यावर कामगारांच्या पत्र्याच्या शेडमधून बाहेर येऊन या कुटुंबाच्या समोरच सिमेंटच्या बाकावर झोपला होता. मध्यरात्रीच्या सुमारास जितेंद्रने या मुलीला तोंड दाबून उचलले आणि स्टेशनच्या बाहेर पडून जवळच असलेल्या झाडीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हे राक्षसी कृत्य उरकल्यावर मुलीला तेथेच सोडून जितेंद्र गुपचूप पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन इतर कामगारांसोबत जाऊन झोपला. रक्तबंबाळ झालेली मुलगी स्टेशनच्या दिव्याच्या रोखाने चालत परत आली व तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यांची रडारड ऐकून स्टेशन मास्तर अरुण शेट्ये आले व त्यांनी पोलिसांना बोलावले.

हायकोर्टात मात्र ‘स्लो मोशन’
खालच्या कोर्टाने एक वर्षात खटला संपविला म्हणून त्याचे कौतुक करणार्‍या हायकोर्टात मात्र अपिलाला ‘स्लो मोशन’ची बाधा झाली. २६ नोव्हेंबर, २०१६ रोजी ‘पॉक्सो’ कोर्टाचा निकाल झाल्यावर अडीच महिन्यांत आरोपीने तुरुंगातून अपील दाखल केले. त्याने कोणीच वकील केलेला नसल्याने विधी सेवा प्राधिकरणाकडून पुढील काही महिन्यात दोन निरनिराळे वकील नेमले गेले. पण त्यांनी काहीच केले नाही. सहा महिन्यांनी अपील सुनावणीसाठी दाखल केले गेले व खटल्याचे रेकॉर्ड खालच्या कोर्टातून मागविले गेले. पुढील दोन वर्षे तारखा मागणे व त्या देणे याखेरीज काहीच झाले नाही. यंदाच्या फेब्रुवारीत आरोपीने स्वत:चा वकील नेमला व त्यानंतर अपील वेगाने पुढे जाऊन महिनाभरात त्यावर निकाल झाला.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button