सिंधूची जादू चालली, ‘ती’ यामागुचीला भारी पडली

Maharashtra Today

पी.व्ही. सिंधू (P.V.Sindhu) विश्वविजेती असली तरी बॕडमिंटनमधील (Badminton) सर्वात प्रतिष्ठेची आॕल इंग्लंड ओपन स्पर्धा (All England Open) अद्याप जिंकू शकलेली नाही. या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या पुढे ती मजल मारू शकलेली नाही. विद्यमान नंबर पाच आणि माजी नंबर वन अकाने यामागुचीविरुध्दच्या (Akane Yamaguchi) मागच्या तीन लढती तिने गमावलेल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री झालेल्या यामागुचीविरुध्दच्या लढतीत पी.व्ही. सिंधूने अफलातून खेळ केला आणि 16-21 अशा पिछाडीवरुन सुरुवात केल्यावरही 16-21, 21-16 आणि 21-19 असा थरारक विजय मिळवला.

याप्रकारे 2018 नंतर प्रथमच सिंधू आॕल इंग्लंड ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचली आणि आता तिचा सामना थायलंडच्या पाॕर्नपावी चोचूवोंग हिच्याशी आहे. चोचुवोंगविरुध्द सिंधूची आतापर्यंतची कामगिरी 4 विजय आणि 1 पराभव अशी आहे. ही आकडेवारी आणि सध्याचा तिचा खेळ पाहता यंदा प्रथमच सिंधू आॕल इंग्लंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचेल अशी चिन्हे आहेत. तसे झाले तर तिची कट्टर प्रतिस्पर्धी नोझोमी ओकुहारा ही विजेतेपदाच्या लढतीत तिच्यासमोर असेल असा अंदाज आहे.

यामागुचीविरुध्दचा हा सामना केवळ विजय- पराभव असा नव्हता तर ज्यापध्दतीने सिंधूने तो जिंकला त्यासाठी दीर्घकाळ लक्षात राहणारा होता. तब्बल 76 मिनिटे म्हणजे सव्वातासापेक्षाही अधिक काळ हा सामना रंगला. त्यात लागोपाठ दोन रॕली 20 पेक्षा अधिक शॉटच्या झाल्या आणि दोन्हीही सिंधूने जिंकल्या. त्यामुळे सामन्यानंतर सिंधू जे म्हणाली की यामागुचीविरुध्दचे माझे सामने नेहमीच ‘मॕरेथॉन’ होतात त्यात तथ्य आहे. या दोघींच्या 2018 पासूनच्या 10 लढतींपैकी आठ लढतीत 50 मिनिटांपेक्षा अधिक संघर्ष बघायला मिळाला आहे. 2018 मध्ये आॕल इंग्लंड ओपन स्पर्धेतच या दोघींचा सामना तब्बल 80 मिनीटे रंगला होता आणि त्यात सिंधूचा निसटता पराभव झाला होता.

उंचपुऱ्या सिंधूचे फटके परतावण्यासाठी तुलनेत बुटक्या (5 फूट 1 इंच) यामागूचीला बरेच कष्ट पडले. वारंवार हवेत झेप घ्यावी लागली. पण तिच्या क्रॉस कोर्ट स्मॕशेस व परतीच्या फटक्यांनी सिंधूचीही परीक्षा घेतली आणि त्यात सिंधू प्राविण्यासह उत्तीर्ण झाली.

पहिला गेम गमावल्यावर दुसऱ्यात सिंधूची सुरुवात जबरदस्त होती. तिसऱ्या गेममध्ये 15-15 बरोबरी झाल्यानंतर अतिशय अटीतटीने फैसला होणार हे स्पष्ट झालेले होते. त्यात सिंधूने संयम राखून बाजी मारली.

सामन्यानंतर सिंधू म्हणाली की, बऱ्याच दिवसानंतर म्हणजे 2019 नंतर मी तिच्यासोबत खेळत होते. पहिल्या गेममध्ये बऱ्याच चुका झाल्या, फटके बाहेर पडले कारण माझ्या बाजूने हवेचा झोत जोरदार होता. दुसऱ्या गेममध्ये दीर्घ रॕली झाल्या. कुणीही सामना जिंकू शकेल अशी स्थिती होती पण मी विजयी ठरले याचा आनंद आहे.

यामागुची म्हणाली की पाहिजे तसा माझा खेळ झाला नाही. प्रत्येकवेळी मी गूण संपविण्याचा प्रयत्न करत राहिले कदाचित म्हणूनच मी हारले. कोणत्याही गुणासाठी मी सुरुवातीलाच विचार करायला हवा होता. गेल्यावर्षापासून फारसे सामने खेळले नाहीत त्याचाही फरक पडला.

सिंधूची कट्टर प्रतिस्पर्धी कॕरोलिना मारिन यंदा सहभागी झालेली नाही. त्यामुळे ही स्पर्धा जिंकायची तिला यंदा चांगली संधी आहे. पी. गोपीचंद यांच्यानंतर एकही भारतीय खेळाडूने ही स्पर्धा जिंकलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER