कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत भयाण शांतता

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती

कोल्हापूर : केंद्र सरकारने (Central Government) केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर (Kolhapur) कृषी उत्पन्न बाजार समितीत आज (मंगळवार) सकाळपासूनच शुकशुकाट पाहायला मिळाला. एरवी शेतकरी, व्यापारी, हमाल मापार्यांच्या गर्दीने गजबजणाऱ्या बाजार समितीत आज स्मशानशांतता दिसत आहे.

या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दररोज मध्यरात्रीपासूनच जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शेतकरी शेतमाल घेऊन बाजार समितीत येत असतात. मात्र बंदच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांसह व्यापारी, मापारी, आडते आणि हमाल, मजूर यांनीही बाजार समितीकडे पाठ फिरवत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नेहमी गजबजणाच्या बाजार समितीत मंगळवारी चिटपाखरूही दिसत नव्हते. त्यामुळे बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती आवारात पोलिस प्रशासनाच्या वतीने आरसीपी अधिकारी एक व 21 कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आलेले आहे. मार्केट यार्ड येथे मुख्य प्रवेशद्वारावर बाजार समितीचे सुरक्षारक्षक व कर्मचारी तैनात होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER