सिद्दिक कप्पान ‘बनावट’ पत्रकार, त्याचे ‘सिमी’शी घनिष्ठ संबंध; उत्तरप्रदेश सरकारची सुप्रीम कोर्टास माहिती

siddique kappan & SC

नवी दिल्ली : हातरस येथील बलात्काराच्या घटनेनंतर तेथील परिस्थितीचे  वार्तांकन करण्याच्या नावाखाली तेथे जात असताना अटक केला गेलेला सिद्दिक कप्पान (Siddique Kappan) पत्रकार असल्याचे वरकरणी भासवत असला तरी प्रत्यक्षात तो ‘बनावट पत्रकार’ आहे व त्याचे बंदी घातलेल्या ‘स्टुडन्टस इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (SIMI) या दहशतवादी संघटनेशी घनिष्ठ  संबंध आहेत, असा दावा उत्तरप्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे.

कप्पान याच्या सुटकेसाठी ‘केरळ युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट’ने (KUWJ) सर्वोच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस’ याचिका केली आहे. त्याला विरोध करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने त्यांचे गृह खात्याचे विशेष सचिव सत्यप्रकाश उपाध्याय यांनी जे प्रतिज्ञापत्र केले आहे त्यात वरीलप्रमाणे दावा करण्यात आला आहे. उत्तरप्रदेश सरकार म्हणते की, अटकेच्या वेळी कप्पान याच्याकडे केरळमधील ‘तेजस’ या मल्याळी वृत्तपत्राचा पत्रकार असल्याचे ओळखपत्र मिळाले आहे. पण हे वृत्तपत्र दोन वर्षांपूर्वीच बंद झाले आहे. त्यामुळे कप्पान हा श्रमिक पत्रकार नाही.

त्याचे लिखाण काही मल्याळी वेबपोर्टवर  ‘कॉन्ट्रिब्युटर’ म्हणून प्रसिद्ध होत असते. पण तेवढ्याने काही  पत्रकार होत नाही. प्रतिज्ञापत्र म्हणते की, कप्पान याचे बंदी घातलेल्या ‘सिमी’शी घनिष्ठ संबंध असल्याचे तपासातून उघड झाले आहे. बंदी घातल्यानंतर ‘सिमी’च्याच पाधिकाऱ्यांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (PFI) स्थापन केली आहे. याच फ्रंटचे दोन सदस्य कप्पान याला  अटक केली तेव्हा मोटारीत त्याच्यासोबत होते. आता बंद झालेले ‘तेजस’ या वृत्तपत्राचे मालक व संपादकही या फ्रंटचे कट्टर समर्थक आहेत. याच वृत्तपत्राने ओसामा बिन लादेनचा ‘हुतात्मा’ म्हणून मुखपृष्ठावर गौरव केला होता. केरळ व देशाच्या इतर भागांत याच फ्रंटने अनेक ठिकाणी दंगली घडवून आणल्या व घातपात केले.

त्याबद्दल त्यांच्या काही सदस्यांना शिक्षा झाल्या आहेत तर इतर काही जणांविरुद्ध आरोपपत्रे दाखल केली गेली आहेत. कप्पान याच्याकडे जे कागदोपत्री व इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडले त्यावरून त्याच्या पूर्वीच्या ‘सिमी’शी व आताच्या ‘पीएफआय’शी संबंध स्पष्ट होतो. पत्रकार म्हणून वृत्तांकन करणे हा कप्पान याचा केवळ देखावा होता. तो व त्याचे साथीदार हाथरस व उत्तरप्रदेशात सांप्रदायिक कलह निर्माण करून दंगली घडविण्याचे स्पष्ट निर्देश ‘पीएफआय’कडून घेऊनच आले होते, असाही आरोप उत्तरप्रदेश सरकारने केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER