सिद्धार्थ मितालीचे वर्‍हाड पुणेरी वाड्यात

Mithali Mayekar-Siddharth Chandekar

गेल्या काही वर्षात डेस्टिनेशन वेडिंग (Destination Wedding) हा ट्रेंड जोरात चालू आहे. विवाह हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील हवाहवासा क्षण असतो. ज्यांचा विवाह होणार आहे त्यांच्यासाठी तर हा दिवस अविस्मरणीय असतोच पण या सोहळ्याचे जे साक्षीदार होणार आहेत त्यांच्यासाठीही आनंदाची पर्वणी मिळावी म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि अभिनेत्री मिताली मयेकर (Mithali Mayekar) यांनी एक खास जागा लग्नासाठी ठरवली आहे. पुण्यापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या ऐतिहासिक वाड्यात हे दोघे लग्न करणार असून वर्‍हाडी मंडळी या वाड्यात जमणार आहेत. सिद्धार्थ आणि मितालीने त्यांच्या विवाहाला शाही लूक देण्यासाठी या वाड्याची निवड केली असून अर्थातच या दोघांच्या लग्नाचा लूकही पेशवेकालीन असणार आहे.

सध्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही जोडी नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या घरी केळवणाचा आस्वाद घेण्यात रमली आहे. अर्थातच या दोघांचे या महिन्यातील 24 तारखेला दोनाचे चार हात होणार असल्याने हा केळवणाचा थाट केला जात आहे. खरंतर या दोघांच्याही मालिका छोट्या पडद्यावर सुरू आहेत. त्यातून वेळ काढून ही जोडी लग्नाची तयारीही करत आहेत आणि केळवणाच्या पंगतीलाही बसत आहेत. गेल्या आठवड्यात या दोघांनी केळवणाचे फोटो शेअर करत आली लग्नघटीका समीप अशी चाहूल दिली आहे.

चार वर्षापूर्वी सिद्धार्थ आणि मिताली यांची पहिली भेट कोल्हापुरातील एका कार्यक्रमात 24 जानेवारीलाच झाली . या कार्यक्रमात मितालीने डान्स केला होता तर त्या सोहळ्याचे निवेदन सिद्धार्थ आणि शिवानी रांगोळे यांनी केले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ही कलाकार मंडळी जेव्हा जेवायला गेली तेव्हा रंगलेल्या गप्पांमध्ये सिद्धार्थ आणि मितालीच्या मनाची तार वाजली. मग मैत्री, अधूनमधून भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यानंतर दोन वर्षापूर्वी त्यांचा साखरपुडा झाला. सिद्धार्थ सांगतो, गेल्या वर्षीच आम्ही लग्न करणार होतो, पण कोरोनामुळे आम्ही विचार पुढे ढकलला. आता नव्या वर्षातच लग्न करायचे आहे तर ते आम्ही ज्या तारखेला भेटलो तीच तारीख मुहूर्त म्हणून घेण्याचे आम्ही ठरवले. आमच्या लग्नाला आमच्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी यावे असे आम्हाला वाटत असल्याने आम्हाला कोरोनाकाळात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न करायचे नव्हते. शिवाय लग्नसोहळाही सांस्कृतिक हॉल किंवा हॉटेल, लॉनवर करायचा नव्हता. मग आम्ही वाड्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पुण्यापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या वाडय़ात लग्नाची सजावट सुरू झाली आहे.

सध्या सिद्धार्थ, सांग तू आहेस का या मालिकेत अभिनेता स्वराज ही भूमिका साकारत आहे. मिताली , लाडाची मी लेक गं या मालिकेत कस्तुरीच्या भूमिकेत तिच्या चाहत्यांना पहायला मिळत आहे. अग्निहोत्र या मालिकेतून सिद्धार्थचे छोट्या पडद्यावर पदार्पण झाले. त्यानंतर नुकतीच त्याची जिवलगा ही मालिका संपली. झेंडा, क्लासमेट, दुसरी बाजू यासारख्या सिनेमात सिद्धार्थने केलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. मितालीने उर्फी या सिनेमातील अमृता या भूमिकेतून अभिनयाला सुरूवात केली. या सिनेमात तिचा नायक प्रथमेश परब होता. फ्रेशर्स या मालिकेत मितालीला खरी ओळख मिळाली. एका ऑस्ट्रेलियन सिनेमात मिताली आणि सिदधार्थ एकत्र पहायला मिळणार आहेत. तर सध्या, सांग तू आहेस का आणि लाडाची लेक गं या दोन्ही मालिका लोकप्रिय असल्याने सिद्धार्थ आणि मिताली एकीकडे शूटिंग आणि दुसरीकडे लग्नाची तयारी अशा धावपळीत आहेत. ऐतिहासिक वाडय़ात लगन करण्यासाठी ही जोडी आतूर झाली असून सध्या सुरू असलेल्या सेलिब्रिटींच्या लग्नाच्या मांदियाळीत एक वेगळं लग्न या दोघांच्याही चाहत्यांना पहायला मिळणार आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER