श्रुतीने घेतला यू टर्न

Shruti Atre

अनेकांच्या आयुष्यात असं एक वळण येतं की जेव्हा त्याला दोन गोष्टींपैकी एक काही तरी निवडावं लागतं. पण ही निवड करिअर म्हणून करायची असेल तर खूप विचाराने करावी लागते. आयुष्यात हा यू टर्न जर योग्य ठरला तर करिअरची गाडी वेगाने धावते. असाच एक यू टर्न अभिनेत्री श्रुती अत्रे (Shruti Atre) हिने घेतला. हा टर्न घेतला म्हणूनच आज श्रुती सी.ए. बनून मोठमोठ्या व्यावसायिकांना जमाखर्चाचे सल्ले देत बसण्यापेक्षा तिच्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या पसंतीचा आलेख चढता ठेवत आहे.

सोशल मीडियामध्ये सध्या वेगवेगळ्या चॅलेंजची चलती आहे. यामध्ये तुमच्या आयुष्यातील यू टर्न सांगा हे चॅलेंज चांगलेच व्हायरल होत आहे. सध्या ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत राजश्री या भूमिकेतून गाजत असलेली श्रुती खरं तर सीएचा अभ्यास करत होती. सीए की नाटक यापैकीच एकच काही तरी निवड करण्याची वेळ तिच्यावर आली तेव्हा खरं तर तिने सीएला झुकतं माप दिलं होतं. पण जेव्हा ती सीए परीक्षेचा अभ्यास करायला लागली तेव्हा तिचं मन काही रमेना. हाच तो तिच्या आयुष्यातील यू टर्न ठरला आणि तिने आपला मोर्चा कायमचा अभिनयाकडे वळवला.

जेव्हा हा किस्सा नेमका काय होता हे सांगायची वेळ तिच्यावर या सोशल मीडिया चॅलेंजने आली तेव्हा ती सीए की अभिनय याची निवड करण्याच्या या वळणावर पोहचली. श्रुती म्हणते, मी मूळची सातारकर. साताऱ्यात माझ्या लहानपणी खूप बालनाट्ये , एकांकिका व्हायच्या. शाळेत असताना मला नाटकात काम करायला आवडू लागलं. कॉलेजमध्येही माझा ग्रुप झाला जो नाटकात काम करायचा. बारावीनंतर जेव्हा मी शिक्षणासाठी पुण्याला आले तिथे तर प्रायोगिक नाटक, एकांकिका, नाट्यस्पर्धा यांचा खजिनाच मला सापडला. बारावीनंतर सीएचा अभ्यास करायचा हे मी ठरवलं होतं. पण अभ्यासाला वेळ द्यायचा म्हणजे साहजिकच मला अभिनयाकडे पाठ फिरवावी लागणार होती. नाटकांची तालीम, स्पर्धेसाठी दौरे, नाट्यप्रयोगाची वेळ यातून कुठेच सीएच्या अभ्यासासाठी वेळ काढणं शक्य नव्हतं. मग मात्र मी अभिनयापासून लांब राहून सीएच्या अभ्यासावरच लक्ष केंद्रित केलं. पण माझ्या असं लक्षात आलं की, हे काम आपलं नाही बॉस. अभिनय करताना मला जितका आनंद मिळत होता तो इथे मिळत नाहीय. असं एका चाकोरीतलं काम मी करू शकणार नाही. पुढच्याच क्षणी मी सीएचा अभ्यास थांबवला आणि नाटकाच्या तालमीकडे वळले. हा निर्णय घेतला म्हणूनच आज मी माझ्या आवडत्या क्षेत्रात काम करत आहे.

‘बाप माणूस’ या मालिकेत श्रुतीने गीता ही व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेत श्रुतीला पहिला ब्रेक मिळाला. रवींद्र मंकणी, पूजा पवार, पल्लवी पाटील, संग्राम समेळ, सुयश टिळक यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांसोबत श्रुतीने स्क्रीन शेअर केली. या मालिकेत तिच्या भूमिकेला कोल्हापुरी मुलीचा टच होता. तर सध्या ती साकारत असलेल्या ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतही कोल्हापुरी भाषेचा लहेजा आहे. श्रुती या भूमिकेत अगदी फिट बसली आहे. या भूमिकेबाबत सोशल मीडियावर एक किस्साही तिने शेअर केला होता. राजश्री ढालेपाटील ही संवादापेक्षा डोळ्यांनी अधिक बोलते. तिची नजर सतत काही ना काही तरी कट करत असते. त्यामुळे राजश्री साकारताना डोळ्यातील कुचकेपणा, घरातील इतर कुणाचे कौतुक होत असेल तर येणारी असूया या भावना राजश्रीला डोळ्यामधूनच दाखवायच्या आहेत. त्यामुळे लांबलचक संवादापेक्षा अशा रिअॅक्श्नन देणे आव्हानात्मक आहे. मुळात श्रुतीचा चेहरा अत्यंत सोज्वळ भूमिकेच्या चौकटीत बसणारा आहे. ‘बापमाणूस’मधील गुणी गीतामधून बाहेर पडत कारस्थानी राजश्री वठवण्यात श्रुतीने बाजी मारली आहे. या मालिकेतील संजीवनी आणि रणजितच्या चाहत्यांच्या गर्दीत राजश्री वहिनीसाहेबांचा एक कटाक्ष पाहण्याची प्रेक्षक वाट पाहतात हेच श्रुतीच्या ठसकेबाजपणाचे यश आहे.

सातारकर श्रुती सध्या लग्नानंतर पुणेकर झाली आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या अश्विन दिवेकर यांच्याशी तिने लग्न केलं आहे. मांजरांसाठी प्रचंड वेडी असलेल्या श्रुतीला सेल्फी काढायला आणि गाणी म्हणायला खूप आवडतं. सोशल मीडियावर ती खूप अॅक्टिव्ह असून तिच्या फॉलोअर्सची संख्याही हजारो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER